Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 01 September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
देशातल्या पाच राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या
नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मान्यता दिली आहे. उत्तराखंडचे माजी
मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली
आहे. माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान हे केरळचे, कलराज मिश्र हे राजस्थानचे,
तर माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असतील. तेलंगणाच्या
राज्यपालपदाची जबाबदारी डॉक्टर तमिलीसाई सुंदरराजन यांच्यावर सोपवण्यात आल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे स्वतंत्र उत्तराखंड राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिले
आहेत. २०१४ साली ते खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून आले होते.
****
निवडणूक आयोग आजपासून देशभरात मतदार पडताळणीची
भव्य मोहीम सुरू करणार आहे. या कार्यक्रमांतर्गत १५ ऑक्टोबरपर्यंत मतदार याद्या अद्ययावत
केल्या जातील. या अंतर्गत, प्रत्येक कुटुंबातील कोणत्याही एका मतदारांना युजर नेम आणि
पासवर्ड देण्यात येईल. तो सदस्या मतदार नोंदणीशी संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करणे
आणि स्वतःचे तसचं कुटुंबातील सदस्यांचे तपशील भरु शकेल. त्यानंतर या तपशीलांची विभाग
स्तरीय अधिकाऱ्याद्वारे पडताळणी केली जाईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर शहराच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी
तो़डगा काढण्याचे नियोजन सुरू आहे. उजनीचे पाणी लातूर पर्यंत आणले जाईल, असं आश्वासन
देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मराठवाड्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी
सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त
लातूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. वॉटर ग्रीड योजनेच्या औरंगाबाद
आणि जालना जिल्ह्याच्या निविदा निघाल्या आहेत. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आचारसंहितेच्या
आत निविदा काढण्याचा आपला प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या
टप्प्याचा समारोप आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार
आहे.
****
मुंबईहून चिपळूणकडे जाणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या
धावत्या बसला आग लागल्याची घटना आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर घडली. रायगड जिल्हयातील
लोणेरे जवळ लागलेल्या या आगीत ही बस पूर्णतः जळून खाक झाली. बसच्या बॉनेटमधून धूर येत
असल्याचं लक्षात आल्यामुळे सावध झालेल्या चालकानं बस रस्त्याच्या कडेला लावून सर्व
प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवलं, त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही.
महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं ही
आग विझविली. मात्र यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती, असं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबईतल्या मालाड इथं गॅस सिलिंडरच्या
स्फोटात एक जण ठार, तर चार जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी मालवणी भागात ही घटना
घडली. जखमींवर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात रसायन कारखान्यात झालेल्या स्फोटाप्रकरणी
व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सकाळी झालेल्या या
स्फोटात १३ जण ठार, तर ६४ जण जखमी झाले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार
पाऊस झाला. मुदखेड, अर्धापूर व नायगाव तालुक्यांसह १९ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद
झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४८ पूर्णांक ६३ मिलिमीटर पावसाची नोंद
झाली आहे.
जालना जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाला आहे.
सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात १७ पूर्णांक ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात
अंबड तालुक्यातील अंतरवली टेम्बी मंडळात तब्बल १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
****
पंतप्रधान मुद्रा योजनेत छोट्या आणि गरजू
व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने बँकांकडून खेळते भांडवल
देण्यात येणार आहे. यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नुकतीच बँकर्सची
बैठक घेतली. या उपक्रमात प्रशासनाला छोट्या व्यवसायिकांकडून ९८८ अर्ज प्राप्त झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment