Tuesday, 17 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17  September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ सप्टेंबर २०१९  दुपारी १.०० वा.
****

 मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातल्या चार जिल्ह्यांसाठी निविदा काढण्यात आल्या असून उर्वरित चार जिल्ह्यांच्या निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ७२ व्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज औरंगाबाद इथं ध्वजारोहण तसंच हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. ही योजना झाल्यानंतर मराठवाड्याला दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले...

 मराठवाड्याच्या प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये स्वच्छ पाणी ३६५ दिवस पुरेल. आणि कधीही पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडणार नाही.  हा निर्णय आपल्या सरकारने घेतला, आणि केवळ हा घेऊन आपण थांबला नाही, तर आपण चार जिल्ह्यातील टेन्डर देखील काढले आहेत. आणि आजून आपण चार जिल्ह्यातील टेन्डर काढतो आहोत. आणि मला असा विश्वास आहे की, येत्या काळामध्ये २० हजार कोटी रूपये खर्च करून ही ग्रीड तयार झाल्यानंतर आमच्या मराठवाड्याला पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळाला कधी सामोर जावं लागणार नाही.


 लातूर इथं नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

 हिंगोली इथं जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्यात ११ ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारक परिसरात स्वातंत्र्य संग्रामाच्या सेनानींना अभिवादन करण्यात आलं.

 बीड इथं जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पोलिस दलासह विविध पथकांनी यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

 नांदेड इथं राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते गुजरी माता उद्यानात ध्वजारोहण झालं. यावेळी हुतात्मा स्तभांस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

 जालना इथं, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते, उस्मानाबाद इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते तर परभणी इथं, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****

 हैदराबाद मुक्तीसंग्रमा दिनानिमित्त औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगूरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक प्रवीण बर्दापूरकर यांचं 'मराठवाडा इथं कमी पडतो' या विषयावर व्याख्यान झालं. मराठवाड्यातल्या  विविध क्षेत्रातल्या मागासलेपणावर बर्दापूरकर यांनी भाष्य केलं.
****

 औरंगाबाद इथं, महानगर पालिकेनं औरंगपुरा भागात उभारलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज झालं. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, मनपा आयुक्त निपूण विनायक, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****

 सार्वजनिक परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या लोकांना हटवण्यासंबंधीच्या विधेयकाची अधिसूचना काल जारी करण्यात आली. हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आलं होतं. या विधेयकामुळे शासकीय निवासस्थानांच्या परिसरात राहणाऱ्यांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती येईल तसंच पात्र व्यक्तिंना शासकीय निवासं उपलब्ध होतील असं सूत्रांनी सांगितलं.
****

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते प्रशासकीय तसंच पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन, निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत.
****

 वसई विरार महानगरपालिकेच्या एका शहर अभियंत्यासह दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहात पकडलं. अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एका रहिवाशाकडून या तिघांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती, यापैकी १५ हजार रुपये लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...