Wednesday, 18 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.09.20196 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१८ सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****   

Ø मराठवाड्यातल्या प्रत्येक गावाला ३६५ दिवस पाणी पुरवठा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा
Ø  कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ
Ø  गेल्या पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र बदलण्याचं काम केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
आणि
Ø  पक्ष बदलणारे नेते आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं आवाहन
****

 मराठवाड्यातल्या प्रत्येक गावाला ३६५ दिवस पाणी पुरवठा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यासाठी मराठवाडा जलसंजाल-वॉटरग्रीड योजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. ७२ व्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त काल औरंगाबाद इथं ध्वजारोहण तसंच हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. ही योजना झाल्यानंतर मराठवाड्याला कधीच दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले...  
मराठवाड्याच्या प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये स्वच्छ पाणी ३६५ दिवस मिळेल. आणि कधीही पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडणार नाही.  हा निर्णय आपल्या सरकारने घेतला, आणि केवळ हा घेऊन आपण थांबला नाही, तर आपण चार जिल्ह्यातील टेन्डर देखील काढले आहेत. आणि आजून आपण चार जिल्ह्यातील टेन्डर काढतो आहोत. आणि मला असा विश्वास आहे की, येत्या काळामध्ये २० हजार कोटी रूपये खर्च करून ही ग्रीड तयार झाल्यानंतर आमच्या मराठवाड्याला पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळाला कधी सामोर जावं लागणार नाही.

 मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा झाला.

 जालना इथं, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते, नांदेड इथराज्य मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते तर उस्मानाबाद इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

 लातूर इथं जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, हिंगोली इथं जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, बीड इथं जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय तर परभणी इथं, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाड्यात सर्वत्र हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
****

 औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगूरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक प्रवीण बर्दापूरकर यांचं 'मराठवाडा इथं कमी पडतो' या विषयावर व्याख्यान झालं. औरंगाबाद शहरातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दोन हजार २२२ फूट लांबीच्या तिरंग्याची पदयात्रा काढण्यात आली.
****

लातूर इथं श्री त्रिपुरा महाविद्यालयात त्रिपुरा व्याख्यान मालेच्या पहिल्या पुष्पात ‘‘मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान’’ या विषयावर प्राध्यापक डी. एम. रणदिवे यांचं व्याख्यान झालं. जालना इथं या दिनानिमित्त गझल लेखन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात शून्य पूर्णांक दहा दशांश टक्का वाढ करण्यास निधीच्या विश्वस्त मंडळानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या निधीवर आठ पूर्णांक ६५ टक्के व्याज मिळणार आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

 भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र बदलण्याचं काम केलं असून, विविध क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल कोकणात दाखल झाली. कणकवली इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर इथं झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी, नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याची ग्वाही दिली.

 दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी, आपला भाजप प्रवेश नक्की असल्याचं सांगितलं.   
****

 पक्ष बदलणारे नेते आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या सरकारला मतांचा अधिकार वापरून धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं काल पक्षाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. बेरोजगारी, आर्थिक मंदी यासारख्या अनेक समस्यांमध्ये अडकलेल्या जनतेला दिलासा देण्याऐेवजी हे सरकार इतर पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात घेण्यास जास्त उत्सुक असल्याचं ते म्हणाले.  

सोलापूर इथंही पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं.
****

 उपेक्षित समाजास सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी राज्यात बदल घडवणार असल्याचं रिपब्लीकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी नाही, मात्र राज्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता निश्चित येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****

 औरंगाबाद शहरात महानगरपालिकेनं औरंगपरा भागात उभारलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पर्णाकृती पुतळ्याचं नावरण उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल झालं. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भावत कराड, महापालिका आयुक्त निपुण विनायक, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****

 आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात दोन हजार रूपये वाढ केल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आशा कार्यकर्त्यांचं राज्यव्यापी आंदोलन  स्थगित करण्यात आल्याचं आशा संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा नेत्रदिपा पाटील यांनी सांगितलं. मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन तारखेपासून आशा कार्यकर्त्यांनी ठिय्या आणि काम बंद आंदोलन सुरू केलं होतं.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...