Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 18
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
अयोध्येतल्या रामजन्मभूमी
बाबरी मशीद वाद प्रकरणातले युक्तिवाद येत्या अठरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयानं या खटल्यातल्या सर्व पक्षांना दिले आहेत. या प्रकरणी न्यायालयात
घटनापीठासमोर दररोज सुनावणी सुरू आहे, आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, युक्तिवाद
पूर्ण करण्यासाठी १८ ऑक्टोबर ही मुदत निश्चित केली. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी
नेमलेल्या मध्यस्थ समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एफ एम आय खलिफुल्ला यांनी, या खटल्यातल्या
काही पक्षकारांनी, चर्चेतून तोडगा काढण्याबाबत आपल्याला पत्र लिहिल्याची माहिती न्यायालयाला
दिली. या प्रश्नावर सौहार्दपूर्ण वातावरणात सामोपचारानं तोडगा काढण्यास सर्व पक्ष तयार
असतील, तर हा मार्ग अजूनही खुला असल्याचं, न्यायालयानं सांगितलं. ही चर्चा पूर्णपणे
गोपनीय असेल, असंही न्यायालयानं नमूद केलं आहे.
****
आंध्रप्रदेशात गोदावरी जिल्ह्याच्या देवीपट्टनम
मंडल इथं रविवारी झालेल्या नौका दुर्घटनेत मृतांची संख्या २८ झाली आहे. गोदावरी नदी धोक्याच्या
पातळीवरुन वाहत असतांना पर्यटकांनी भरलेली
खासगी नाव गोदावरी नदीत बुडून ही दुर्घटना झाली होती. आंध्रप्रदेशचे
मुख्यमंत्री वाय एस जगन
मोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
दिले आहे.
****
भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज नाशिक जिल्ह्यात
पोहोचत आहे. महाजनादेश यात्रेचा हा शेवटचा टप्पा असून आज दुपारी तीन वाजता नाशिक शहरातील
पाथर्डी फाटा इथून दुचाकी फेरीनं या यात्रेचं स्वागत होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या महाजनादेश यात्रेचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या नाशिक इथं समारोप होणार आहे. त्या
निमित्तानं पंचवटी भागात तपोवन इथं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर
सभा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था
ठेवण्यात आली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
****
राज्य पोलिस दलात विविध वाहतुक शाखांसाठी सुमारे
दोन हजार एकशे चव्वेचाळीस पदनिर्मितीला शासकीय मान्यता देण्यात आली असून, या पदांची
भरती लवकरच केली जाणार आहे. याबाबतचा शासननिर्णय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आला.
****
मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत लातूर आणि उस्मानाबाद
जिल्ह्यात प्रस्तावित कामांना शासकीय मंजूरी देण्यात आली आहे. या संदर्भातला शासननिर्णय
जारी करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यात एक हजार सातशे बारा कोटी तर
उस्मानाबाद जिल्ह्यात एक हजार चारशे नऊ कोटी रुपयांची काम केली जाणार आहेत. यासाठी
निविदा प्रक्रिया राबवण्यास शासनानं मंजूरी दिली आहे.
****
बीड, लातूर, आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनेक गावांना
मांजरा धरणातून होणारा पाणी पुरवठा येत्या एक ऑक्टोबर पासून बंद करण्यात येणार आहे.
मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणारे लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यासंदर्भात
एक बैठक घेऊन, हा निर्णय जाहीर केला. गेल्या वर्षभरापासून मांजरा धरणातला पाणी साठा
शून्य पातळीच्या खाली आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं, यावेळी सांगण्यात
आलं. यापुढे प्रति घर फक्त २०० लीटर पाणी टँकरच्या माध्यमातून पुरवण्यात येईल, त्यादृष्टीने
सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
अंबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप हे या बैठकीला उपस्थित होते.
या पध्दतीने पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी नगर परिषदेची स्वतंत्र बैठक घेऊन, निर्णय
घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतला
दुसरा सामना आज मोहाली इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. या सामन्यात
नाणेफेक देखील झाली नसल्यानं प्रेक्षकांना उद्यापासून तिकिटांचे पैसे परत दिले जाणार
असल्याचं हिमाचल क्रिकेट संघटनेनं सांगितलं.
****
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीतलं
भारताच्या सायना
नेहवालचं आव्हान आज संपुष्टात
आलं. सायनाला सलामीच्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबाम रुनगफान कडून पराभव पत्करावा
लागला. पी.व्ही.सिंधूचा सामना आज चीनच्या
ली ज्युराई बरोबर होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment