Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 19
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
इलेक्ट्रॉनिक सिगारेटचं
उत्पादन, आयात, वितरण आणि विक्रीवर बंदी घालणारा अध्यादेश केंद्र सरकारनं आज जारी केला.
केंद्रीय मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत या अध्यादेशाला मंजूरी दिली. ई सिगारेट्सचा
तरुणाईवर होणारे संभाव्य दुष्परिणाम पाहता हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. या नियमाचा भंग केल्यास पहिल्या वेळेस एक लाख
रुपये दंड आणि एक वर्ष कारावास तर दुसऱ्या वेळेत तीन वर्ष कारावास आणि पाच लाख रुपये
शिक्षेची तरतूद या अध्यादेशात आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक
इथं समारोप होत आहे, या निमित्तानं नाशिक इथं होत असलेल्या जाहीर सभेला पंतप्रधान संबोधित
करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक मान्यवर या सभेला उपस्थित
असतील.
****
आदिवासींच्या आरोग्यविषयक
संशोधना संदर्भात पहिल्या राष्ट्रीय परिषदेला आजपासून अहमदनगर जिल्ह्यात लोणी इथं प्रारंभ
झाला. पद्मश्री डॉक्टर अभय बंग आणि पद्मश्री डॉक्टर एच सुदर्शन यांच्या हस्ते अभिमत
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वाय. एम. जयराज, आणि डॉक्टर राजेंद्र विखे-पाटील यांच्या उपस्थितीत
या परिषदेचं उद्घाटन झालं. आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्यांचा उहापोह करून त्यावर
योग्य उपाययोजना करता याव्यात तसेच आदिवासी आरोग्य संदर्भात शासकीय पातळीवर धोरण निश्चिती
करता यावी, हा या राष्ट्रीय परिषदेचा उद्देश आहे. या परिषदेला २० राज्यांचे सुमारे
तीनशे प्रतिनिधी उपस्थित आहेत. येत्या शनिवारी २१ सप्टेंबरला या परिषदेचा समारोप होत
असून, शेवटच्या दिवशी भंडारदरा परिसरात प्रत्यक्ष आदिवासींना भेट देऊन त्यांच्या समस्या
जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक
विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य
शासन पत हमी देणार आहे. आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ ७ हजार ८६६ जणांना मिळाला
असून बँकेमार्फत ४०० कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं असून उर्वरीत लाभार्थींना
व्याज परतावा देण्याचं काम सुरु आहे.
****
विकासकांशी संगनमत करुन
सरकारचं चाळीस हजार कोटी रुपयांचं नुकसान केल्याच्या आरोपावरुन म्हाडा अर्थात, महाराष्ट्र
गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे
निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. पुनर्विकासानंतर अतिरिक्त ठरलेली
एक लाख ३७ हजार चौरस मीटरची जागा विकासकांकडून म्हाडानं परत घेतली नाही, असा दावा करत
कमलाकर शेणॉय यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी करताना
न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एस के शिंदे यांच्या खंडपीठानं काल
हे निर्देश दिले. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं येत्या पाच दिवसात प्रथम माहिती
अहवाल नोंदवावा, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्याचे मुख्य सचिव
अजोय मेहता यांचा कार्यकाळ सहा महिने वाढवण्यात आला आहे. मेहता येत्या ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते,
आता ते मार्च २०२० अखेरपर्यंत मुख्य सचिवपदी कार्यरत राहतील.
****
सांगली जिल्ह्यातल्या
अंकलखोप आणि करुनगली या २ ग्रामपंचायतींना केंद्रशासनाचा पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायतराज
सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतींचा दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात
गौरव करण्यात येणार आहे. सांगलीमधल्या पलूस आणि शिराळा तालुक्यातल्या या २ ग्रामपंयतींच्या
कामाचं मूल्यमापन करुन ही निवड करण्यात आली आहे. राज्यातल्या एकूण १४ ग्रामपंचायतींची
निवड या पुरस्कारासाठी झाली आहे.
****
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री
योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्व निवडक लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे गोल्डन
कार्ड बनवून घेणे आवश्यक आहे. सदरील योजनेशी संलग्नित रुग्णालयांमध्ये गोल्डन कार्ड
मोफत बनवून दिलं जातं, आपले सरकार सुविधा केंद्रांमध्ये तीस रुपये शुल्क आकारले जाते.
सर्व लाभार्थींनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयांमध्ये जाऊन
गोल्डन कार्ड मोफत बनवून घ्यावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
औरंगाबाद शहर परिसरात
पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उस्मानाबाद इथं नुकत्याच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मोसमी पावसाचा
परतीचा प्रवास आजपासून सुरू होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment