Thursday, 19 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –19 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
देवेंद्र फडणवीस सरकारनं महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊन राज्याच्या विकासाला दिशा दिली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिक इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या पाच वर्षात राज्यात गुंतवणूकीला पोषक वातावरण मिळालं, कायदा सुव्यवस्थेत सुधारणा झाली. सामाजिक, समता, तसंच सांस्कृतिक सभ्यतेला मान मिळाल्याचं सांगत, मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं. येत्या विधानसभा निवडणुकीत कोणला निवडून द्यायचं हे जनतेनं ठरवलं आहे. आम्ही दिलेली वचनं पूर्ण करतो, यापुढेही करु, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पाच वर्षाच्या कामांचा आढावा घेतला. युती सरकारवर गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. राज्याची १२ कोटी जनता आपलं दैवत असून, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठीच गेला महिनाभर चार हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून आपण केला असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
भाजप सरकारनं राज्यातले उद्योग, कारखानदारी, सहकार आणि शेतकऱ्यांना संपवण्याचं काम केलं, असा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज नांदेड इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. अशा सरकारला सत्तेच्या बाहेर काढण्याचं काम आजच्या तरुण पिढीचं आहे असं ते यावेळी म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी खासदार गंगाधर कुटूंरकर यांच्यासह अनेक मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठींबा देण्याचा निर्णय लिंगायत महासंघ आणि लिंगायत आरक्षण कृती समितीनं घेतला आहे. लिंगायत महासंघाची काल लातूर इथं बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. गेल्या पाच वर्षांत भाजपा सरकारनं लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचं केवळ आश्वासनच दिलं, प्रत्यक्षात मात्र काहीच केलं नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं महासंघाचे प्रांताध्यक्ष सुदर्शन बिरादार यांनी म्हटलं आहे.
****
राज्य महिला आयोग बचत गटांच्या महिलांसाठी डिजिटल साक्षरता अभियान हाती घेणार आहे. यामध्ये राज्यभरात पाचशे कार्यशाळा घेतल्या जाणार असून महिलांना, विशेषतः ग्रामीण महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं राज्य महिआ आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं. त्या आज मुंबईत बोलत होत्या. या कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
****
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा येत्या ८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावं हा या शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश आहे. शासनमान्य, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतले इयत्ता आठवीतले नियमित विद्यार्थी या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी पात्र ठरतील. या परीक्षेसाठीची ऑनलाईन आवेदनपत्रं परीक्षा परीषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
****
राष्ट्रीय मराठा पार्टी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश पाटील होणाळकर यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सात उमेदवारांची पहिली यादीही त्यांनी यावेळी जाहीर केली. आर्थिक निकषावर आरक्षण जाहीर करावं, ॲट्रासिटी कायदा रद्द करावा यासह अन्य मुद्दे घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. दरम्यान, पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हेलीकॉप्टर हे चिन्ह निवडणूक आयोगानं जारी केलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम ची युती व्हावी अशी आपली इच्छा असल्याचं औरंगाबादचे खासदार आणि एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सद्य स्थितीत मराठवाड्याचा विकास खुंटला असल्याचं ते म्ह्‍णाले. औरंगाबाद ते शिर्डी रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اکتوبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 October-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبر...