Thursday, 17 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.10.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –17 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑक्टोबर २०१ दुपारी .०० वा.
****
राज्यात भाजपला अनुकुल वातावरण असून महायुती पुन्हा सत्तेत येईल, असा विश्र्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज बीड जिल्ह्यातील परळी इथं पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. राज्यात महायुतीच्या बाजुनं वातावरण तयार झालं असून त्याला गेल्या पाच वर्षांतील सरकारची कामं कारणीभूत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांशी झुंजत आहेत, त्यांचे नेते पक्ष सोडून जात असल्याचं नमुद करताना पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर टीका केली. बीडनं आपल्याला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारखे मित्र दिले असं नमुद करत पंतप्रधानांनी भाजपच्या या दोन दिवंगत नेत्यांची यावेळी आठवण काढली. पंतप्रधानांनी तत्पुर्वी परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं. पंतप्रधान मोदी यांची आज दुपारी तीन वाजता सातारा इथं तसंच संध्याकाळी पुण्यात प्रचार सभा होणार आहे.
****
महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणूकांबरोबरच येत्या २१ तारखेला बिहारच्या समस्तीपूर आणि महाराष्ट्रातल्या सातारा लोकसभा जागेच्या पोटनिवडणूकांसाठीही मतदान होणार आहे. या बरोबरच १७ राज्यातल्या ५१ विधानसभा जागांसाठीही पोटनिवडणुका होणार असून, यात उत्तर प्रदेशातल्या ११, गुजरातमधल्या ६, केरळ आणि बिहारमधल्या प्रत्येकी ५, सिक्किम मधल्या ३, पंजाब आणि आसाममधल्या प्रत्येकी ४, तामिळनाडू, राजस्थान, हिमाचल प्रदेशातल्या प्रत्येकी २ तसचं ओदिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मेघालय, पुदुचेरी आणि अरूणाचल प्रदेशातल्या प्रत्येकी एका जागेसाठी निवडणुका होणार आहेत. या सर्वच जागांसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून फिलिपाईन्स आणि जपानच्या सात दिवसांच्या दौऱ्यावर आज रवाना झाले. फिलिपाईन्स इथं ते १७ ते २१ दरम्यान असतील. त्यानंतर राष्ट्रपती जपानला रवाना होतील. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या राज्यभिषेक सोहळ्यात राष्ट्रपती सहभागी होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे. राष्ट्रपती जपानमध्ये २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान असणार आहेत.
****
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी १९६५ च्या युद्धानंतर भारतात जाणाऱ्या बंद केलेल्या सर्व रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ढाका ते कुरीग्राम या रेल्वेसेवेचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. यामुळे दोन्ही देशांना फायदाच होणार आहे असंही त्या म्हणाल्या. भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन हजार आठ मध्ये ढाका ते कोलकाता ही पहिली मैत्री एक्सप्रेस तसंच २०१७ मध्ये बंधन एक्सप्रेस सुरू केली होती.
****
सोलापूर इथल्या बार्शी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीच्यावेळी अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. यात राजकीय पक्षांचे उमेदवार दिलीप सोपल, निरंजन भुमकर तसंच अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या निवडणूक खर्चामध्येही तफावत आढळून आली आहे. याच वेळी जगन्नाथ निवृत्ती मुंडे या उमेदवारालाही  निवडणूक खर्च बँकेमार्फत करण्यात आलेला नसल्याचं निदर्शनास आल्यामुळं नोटीस देण्यात आली आहे.  या  सर्व उमेदवारांना नोटीस मिळाल्यापासून अठ्ठेचाळीस तासांत खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सोलापूर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
नंदुरबार इथं जिल्हाप्रशासनाच्या वतीनं आज शालेय विद्यार्थ्यांच्या वतीनं मतदान जनजागृती कार्यक्रम राबिवण्यात आला. नंदुरबार शहरातल्या जीटीपी महाविद्यालयाच्या मैदानात बारा शाळांच्या सात हजार विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाच्या मतदान जनजागृतीच्या चिन्हाची मानवी साखळींद्वारे प्रतिकृती तयार केली होती. नंदुरबार जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या उद्देशानं या मानवी साखळीची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
****
ओडेन्स इथं सुरु असलेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, भारताची सायना नेहवाल महिला एकेरीत काल जपानच्या सायका ताकाहाशीकडून पराभूत झाली. समीर वर्मानं मात्र पुरुष एकेरीत जपानच्या कांटा सुनेयामावर २१-११, २१-११ अशी सरळ मात करत दुसरी फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी यांच्या जोडीनं जर्मनीच्या मार्विन सिएडेल आणि लिंडा एफ्लर या जोडीवर २१-१६, २१-११ असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
****


No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...