आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ ऑक्टोबर २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय
मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुंबईत सक्तवसुली संचालनालयातर्फे चौकशी सुरू आहे. सक्तवसुली
संचालनालयानं पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात काल नोटीस बजावली होती. पटेल
आज सकाळी या कार्यालयात हजर झाले. कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्याशी कथित व्यवहाराप्रकरणी
ही चौकशी सुरू आहे.
****
भाजप अध्यक्ष अमित शाह आज जालना
इथं विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेणार आहेत.
शाह यांच्या आज गडचिरोली, यवतमाळ इथंही प्रचारसभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज मुंबईत प्रचारसभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री
नितीन गडकरी त्याच बरोबर काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे तसंच मल्लीकार्जून
खरगे, आनंद शर्मा आदींच्याही राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा नियोजित आहेत.
****
शिवसेनेचे माजी आमदार आणि कन्नड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन
जाधव यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगानं पिशोर पोलिस ठाण्यात आचारसंहिताभंगाचा गुन्हा
दाखल केला आहे. जाधव यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एका प्रचारसभेत
कथित अवमानकारक वक्तव्य केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
काँग्रेस पक्षानं मुंबई काँग्रेसचे
अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख इब्राहिम शेख यांच्यासह पंधरा पदाधिकाऱ्यांना पक्षविरोधी
कारवाया केल्याच्या कारणावरून निलंबित केलं आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड
यांनी याबाबतचं पत्रक काल प्रसिद्ध केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या
दहावीच्या शिक्षकांची कार्यशाळा काल घेण्यात आली. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी यावेळी
केलेल्या भाषणात शिक्षकांनी विद्यार्थी विकासाची खूणगाठ मनाशी बांधावी, असं आवाहन केलं.
****
जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यात
पासोडी इथं एका शेतात लावलेली गांजाची सुमारे दोन क्विंटल झाडं पोलिसांनी छापा मारून
जप्त केली आहेत. जप्त केलेल्या गांजाच्या झाडांची किंमत सुमारे २० लाख रुपये असून,
शेतमालक भालचंद्र काकरवाल याला अटक करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment