Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 05 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - ०५ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø राज्यातल्या पन्नास लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तत्काळ मिळावी - मुख्यमंत्र्यांची
मागणी
Ø ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांनी सरकार बनवावं - शिवसेना नेते
संजय राऊत
Ø पीक नुकसान पाहणीसाठी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर
आणि
Ø ३२व्या राष्ट्रीय
कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या
धावपटूंना दोन सुवर्ण पदकं
****
राज्यातल्या पन्नास लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तत्काळ
मिळावी,
अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल नवी
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन, राज्यात
झालेल्या नुकसानाच्या प्राथमिक आकडेवारीचा अहवाल सादर केला. त्यानंतर पत्रकारांशी
बोलताना, अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीनं मदत
करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ते म्हणाले.....
हि मोठी आपत्ती असल्यामुळे
केंद्र सरकारने मदत करावी अश्या प्रकारची विनंती
केली आहे. माझ्या समोरचं विविध सचिवां सोबत त्यांनी बोलण केलं आहे. लवकर टिम पाठवण्याच्या
संदर्भात देखील निर्दश दिले आहेत. त्यासोबतच विशेषतः ५० लाख शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना विम्याची मदत
जर मिळाली तर एक मोठी मदत मिळू शकते. आणि म्हणून
हि निट मिळावी या दृष्टीनी माननिय, गृहमंत्र्यांनी हे देखील मान्य केलं आहे, कि ते
स्वतः विमा कंपनी सोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अश्या प्रकारचे निर्दश देतील.
हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे.
राज्यात
लवकरात लवकर नवीन सरकार स्थापन होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सत्तेच्या
समीकरणासंदर्भात येणाऱ्या विधानांवर आपण प्रतिक्रिया देणार नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
ते म्हणाले....
त्याच्या समिकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं आहे, याच्यावर मि बिलकूल
रिआक्शॅन देणार नाही. महाराष्ट्राला नविन सरकारची आवश्यकता आहे. आणि ते सरकार महाराष्ट्रात
निश्चित पणे बनेल. पूर्ण पणे आम्ही आशवस्थ आहोत.
****
राज्यात ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांनी सरकार बनवावं,
असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी काल मुंबईत राजभवनात राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पक्षाचे
नेते रामदास कदम यावेळी उपस्थित होते. सरकार स्थापनेबाबत राज्यात सध्या जी संभ्रमावस्था
आहे, त्याला शिवसेना जबाबदार नाही, असंही राऊत यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांनी काल नवी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट
घेतली. राज्यातल्या राजकीय स्थितीबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचं पवार यांनी सांगितलं. राज्यात भाजप महायुतीला बहुमत मिळालेलं असल्यामुळे,
सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे, असंही पवार यांनी नमूद केलं. शिवसेनेने
सत्ता स्थापनेसाठी आपल्याकडे पाठिंबा मागितलेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
****
दोन हजार चौदा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या
शपथपत्रात दोन फौजदारी गुन्हे लपवल्या प्रकरणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
नागपूर न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या संदर्भात चार डिसेंबर पर्यंत उत्तर देण्यास
फडणवीस यांना सांगण्यात आलं आहे.
****
राजकीय नेते आणि पत्रकारांवर
पाळत ठेवल्याप्रकरणी सरकारनं
विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत
होते. या सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.
****
आशियायी देशांच्या प्रस्तावित
प्रादेशिक सर्वंकष आर्थिक सहयोग करार अर्थात आरसीईपी करारावर भारत स्वाक्षरी करणार नसल्याचं, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी सांगितलं आहे. थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरु असलेल्या आरसीईपी परिषदेत काल
भाषण करताना, पंतप्रधानांनी भारताची ही भूमिका स्पष्ट केली. भारताच्या समस्या आणि मुद्यांचं
या करारातून निराकरण होत नसल्याने, भारत या करारात सहभागी होऊ शकत नाही, असं पंतप्रधानांनी
म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रस्तावित कराराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबईत मंत्रालयासमोर दूध ओतून निदर्शनं केली
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी
खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिजर्व्ह बँकेनं कुठली पावलं
उचलली आणि यातून मार्ग काढण्यासाठी आगामी दिशा काय असेल, याबाबत येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात माहिती
सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी पुढची सुनावणी
आता १९ नोव्हेंबरला होणार आहे.
****
मराठवाड्यात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाचे पंचनामे
सुरू असून, पालकमंत्री तसंच नेत्यांचे नुकसान पाहणी दौरेही सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते नांदेड जिल्ह्यात लोहा आणि
कंधार, लातूर जिल्ह्यात अहमदपूर, परभणी जिल्ह्यात गंगाखेड तसंच बीड जिल्ह्यात माजलगाव
आणि गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची पाहणी करणार असल्याचं वृत्त
आहे.
दरम्यान, राज्याचे कृषि
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल नांदेड जिल्ह्यात नायगाव तसंच धर्माबाद तालुक्यात अवकाळी पावसानं
बाधित झालेल्या पिकांची पाहणी आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. आमदार राजेश पवार
यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि तहसीलदारही यावेळी उपस्थित होते.
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी काल भोकरदन आणि अंबड तालुक्यात
नुकसानग्रस्त मका, सोयाबीन, कापूस पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पीकनिहाय
भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं लोणीकर यांनी
यावेळी सांगितलं.
****
अवकाळी पावसामुळे झालेल्या जीवीतहानी, मालमत्ता आणि
जनावरांच्या नुकसानीची माहितीही सादर करावी, असे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार
पाण्डेय यांनी दिले आहेत. काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नुकसान आढावा बैठकीत
ते बोलत होते. खासदार डॉक्टर प्रितम मुंडे यांच्यासह जिल्ह्यातले नवनिर्वाचित आमदार
या बैठकीला उपस्थित होते.
लातूर
जिल्ह्याला राज्यासह केंद्रानेही विशेष पॅकेज द्यावं अशी मागणी आमदार धीरज देशमुख यांनी
केली आहे. देशमुख यांनी काल लातूर इथं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या
अडचणी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामे याबाबत चर्चा केली. त्यानंतर
ते वार्ताहरांशी बोलत होते. जिल्ह्याला एकाच वर्षात पाणी टंचाईमुळे कोरडा दुष्काळ,
आणि आता ओला दुष्काळ अशा दुहेरी संकटाला सामोरं जावं लागत असल्यानं विशेष पॅकेजची मागणी
केल्याचं देशमुख म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर
करुन हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या
हिंगोली शाखेनं केली आहे. यासंदर्भात एक निवेदन पक्षातर्फे काल हिंगोलीचे जिल्हाधिकारी
रूचेश जयवांशी यांना सादर करण्यात आलं. माजी खासदार राजीव सातव यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा धरणातून सुरू असलेल्या
पाणी विसर्गामुळे येलदरी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. धरणात एकूण
पाणी साठा ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने कोणत्याही क्षणी
धरणातून पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर पूर्णा नदीकाठच्या ग्रामस्थांनी
नदीपात्रात जाऊ नये, तसंच सतर्क राहण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे
यांनी केलं आहे.
दरम्यान, आमदार मेघना बोर्डीकर
यांनी काल धरणाच्या सुरक्षेची पाहणी करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
****
लातूर शहराचा पाणीपुरवठा आता १५ दिवसांऐवजी दहा दिवसाआड
करण्यास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मान्यता दिली आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात काल, झालेल्या टंचाई आढावा बैठकीत हा
निर्णय झाला. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा धरणात ४२ पूर्णांक ७४ दशलक्ष घनमीटर
इतका पाणीसाठा झाला असल्यानं हे शक्य होणार आहे. शहराजवळील औद्योगिक वसाहतीला दररोज
सहा दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा करण्याचंही कालच्या बैठकीत सूचित करण्यात आलं आहे.
****
नांदेड शहरात व्यापाऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवून
लुटणारा गुन्हेगार शेरसिंग काल पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. रविवारी रात्री
नांदेडच्या बाजार पेठेत एका दुकानातल्या कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटालूट
केलेला शेरसिंग, अर्धापूर तालुक्यात येळेगाव शिवारातल्या एका आखाड्यावर असल्याची माहिती
पोलिसांना मिळाली, कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर शेरसिंगने गोळीबार केला, पोलिसांनी
प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेशातल्या
विजयवाडा इथं झालेल्या ३२व्या राष्ट्रीय कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादचे धावपटू
साक्षी चव्हाण आणि तेजस शिर्से यांनी सुवर्ण पदकं पटकावली. १८ वर्षीय तेजसनं पुरुषांच्या
११० मीटर अडथळा शर्यतीत, तर साक्षीनं महिलांच्या मिडले रिलेत सांघिक सुवर्ण पदक जिंकलं आहे.
****
कार्तिकी एकादशी निमित्त दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड
विभागातून आदिलाबाद पंढरपूर आदिलाबाद आणि पंढरपूर पूर्णा पंढरपूर या दोन विशेष रेल्वे
गाड्या धावणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर संपर्क साधावा असं
आवाहन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद उर्सनिमित्त औरंगाबाद
शहरातून तीन दिवस जादा शहर बस सोडण्यात येणार आहेत. शहागंज, मध्यवर्ती बसस्थानक, भगवान
महावीर चौक इथून या बस सोडल्या जाणार
आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment