Tuesday, 5 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ नोव्हेंबर २०१दुपारी .०० वा.
****

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यासाठी वेळ मागितल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पीकांच्या नुकसानीसंदर्भात पक्षांची मागणी या भेटीवेळी मांडण्यात येईल, असं त्यांनी नमुद केलं. ते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दोघंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भातील पेच कायम असल्याच्या पार्श्र्वभूमीवरही ही भेट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ही राज्यातील नेत्यांची आज भेट घेणार आहेत.
****

 दरम्यान, राज्यातील राजकारण बदलत असून मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होईल, अशी प्रतिक्रीया राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नोंदवली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आपला पक्ष न्यायाच्या लढाईत विजयी होईल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याचा निर्णय राज्यातच होईल,  राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल, असंही त्यांनी सांगितलं. शपथ ग्रहण कोणाची मक्तेदारी नाही, राज्यातील जनतेच्या मनाप्रमाणेच होईल आणि अपक्षांची यात महत्त्वाची भूमिका असेल, असं राऊत यांनी यावेळी म्हटलं.
****

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर असून अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसाणीची ते पाहणी करत आहेत. ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यात लोहा आणि कंधार इथं पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तसंच बीड जिल्ह्यात माजलगाव आणि गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची उद्धव ठाकरे पाहणी करत आहेत.
****

 अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पीकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देऊन उद्यापर्यंत ते पूर्ण करण्याचे निर्देश, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हानिहाय कृषीक्षेत्राचं किती नुकसान झालं आहे याची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावं, अशी सूचना मुख्य सचिवांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच्या वाटपासाठी पंचनामे वेळेत होणे आवश्यक असल्याचं मुख्य सचिवांनी म्हटलं आहे.
****

 भारतानं आरसीईपी अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बँकॉक इथं आरसीईपी शिखर परिषदेतल्या भाषणात सांगितलं. या कराराच्या सध्याच्या रुपरेषेत मार्गदर्शक तत्वांची मुलभूत भावना पूर्णपणे प्रतिबिंबीत होत नाही, असं मोदी म्हणाले. भारत अधिक प्रादेशिक एकात्मता आणि मुक्त व्यापार तसंच नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं समर्थन करतो, असं ते म्हणाले. आरसेपमध्ये सहभागी न होण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची अनेक नेत्यांनी प्रशंसा केली आहे.
****

 आर्थिक मंदी, बरोजगारी, शेतीवरचं संकट आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी काल नवी दिल्ली इथं बैठक घेतली. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव, द्रमुकचे टी. आर. बालू इत्यादी नेते या बैठकीला उपस्थित होते. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, स्थूल राष्ट्रीय उत्पादनातली घट चिंताजनक आहे, असं आझाद यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. खाजगी गुंतवणूक आणि औद्योगिक वाढही घटली असल्याचं आझाद यावेळी म्हणाले.
****

 अरबी समुद्रात घोंघावत असलेलं महा चक्रीवादळ वायव्य दिशेकडे सरकलं असून गुरुवारपर्यंत दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. यावेळी  वाऱ्यांचा वेग ताशी ऐंशी ते शंभर किलोमीटर राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****

 आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघानं  भारत आणि पाकिस्तान दरम्यान डेविस चषक टेनिस स्पर्धेत येत्या एकोणतीस, तीस तारखेला होणारी लढत तटस्थ देशात खेळवायला मान्यता दिली आहे. ही लढत सप्टेंबर महिन्यात इस्लामाबादमध्ये होणार होती. काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांतील राजकीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर खेळाडुंच्या सुरक्षेच्या मुद्दावरून लढत टाळण्यात आली होती. स्वतंत्र सुरक्षा सल्लागारांचं मत घेतल्यानंतर अ गटातील ही लढत आता तटस्थ देशात होईल, असं डेव्हीस चषक समितीनं म्हटलं आहे.
****

 कार्तिकी एकादशीनीमीत्त पंढरपूरला जाण्यासाठी नांदेड दक्षीण मध्य रेल्वे विभागातून आदिलाबाद ते पंढरपूर आणि पूर्णा ते पंढरपूर अशा दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. आदिलाबाद ते पंढरपूर गाडी सात तारखेला दुपारी दोन वाजता आदिलाबादइथून नांदेड, परभणी, परळी मार्गे पंढरपूरला पोहोचेल. पूर्णा पंढरपूर ही रेल्वे अकरा तारखेला रात्री आठ वाजून दहा मिनीटांनी पूर्णा इथून सुटून परभणी, परळी मार्गे पंढरपूरला पोहचेल.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...