Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 06 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - ०६ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान भागिदारीच्या मुद्यावर चर्चेसाठी
भाजपची तयारी
** प्रत्येक तालुक्यात शेतकरी मदत केंद्र सुरू करा- शिवसेना पक्षप्रमुखांचे
पदाधिकाऱ्यांना निर्देश
** राज्यात सुमारे ७० लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचं नियोजन
आणि
** पीक नुकसान पंचनाम्याच्या कामांना गती
देण्याची राज्याचे मुख्य सचिव
अजोय मेहता यांची सूचना
****
मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान भागिदारीबाबत
शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असा प्रस्ताव आला तर त्यावर विचार
केला जाईल, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे,
काल मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर
पाटील वार्ताहरांशी बोलत होते. फडणवीस यांची भाजप विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड
झाली असून, पक्षाच्या केंद्रीय मंडळानेही मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्या नावावर
शिक्कामोर्तब केलं आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लवकरच महायुतीचं
सरकार स्थापन होईल, असं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजपने हीच भूमिका आधी घेतली असती,
तर आतापर्यंत सरकार स्थापन झालं असतं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
समसमान भागीदारीबाबत भाजपने लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
****
सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत
यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
दरम्यान, भाजप आणि शिवसेना महायुतीला राज्यात सत्ता स्थापन
करण्यासंदर्भात यश आलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पर्याय शोधणं भाग पडेल,
असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यात राष्ट्रपती
राजवट लागू करणं आवश्यक नाही कारण जनता ते सहन करणार नाही, अशी प्रतिक्रियाही पाटील
यांनी दिली.
****
राज्यातला सध्याचा सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी
भाजपा आणि शिवसेनेतला वाद संपवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यावर
सोपवावी अशी विनंती, नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले विदर्भातले शेतकरी नेते किशोर तिवारी
यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केली आहे. तशा आशयाचं
पत्र त्यांनी भागवत यांना लिहिलं आहे.
****
शिवसेना पक्ष
प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नांदेड, लातूर, परभणी तसंच बीड जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त
पिकांची पाहणी केली. शिवसेनेच्यावतीनं प्रत्येक तालुक्यात शेतकरी मदत केंद्र सुरू करण्याचे
आदेश शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिले आहेत.
ठाकरे यांनी
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यात जानापूरी, सोनखेड, कारेगाव इथं, लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या उजना, सुनेगाव,
खंडाळी इथं, परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात राणी
सावरगाव आणि इसाद इथं तर बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी
संवाद साधला. अनेक गावात अतिवृष्टीनं बाधित पिकांची पाहणी केल्यानंतर ठाकरे यांनी शेतकऱ्यांना
सरसकट हेक्टरी २५ हजार रुपयांची तातडीची मदत शासनानं द्यावी अशी मागणी करणार असल्याचं
सांगितलं. कर्ज माफीचा लाभ तसेच शेतकरी सन्मान योजनेचे
पैसे मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितल्यावर, आपण यात लक्ष घालणार असून प्रश्न सुटला
नाही तर आवाज उठवू असं आश्वासन ठाकरे यांनी दिलं.
दरम्यान, ठाकरे
यांनी परळी इथं दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळी गोपीनाथगड
इथं भेट देऊन मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
****
पीक विम्यांच्या
दाव्यांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी विमा कंपन्यांची बैठक घेण्याची सूचना राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांना राज्य सरकारला केली. काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या
नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर दहा हजार
कोटी रुपयांची मदत तोकडी असून, त्यात वाढ करण्याची मागणी केली.
****
राज्यात रब्बीच्या
क्षेत्रामध्ये २२ टक्के
वाढ अपेक्षित असून, सुमारे ६९ पूर्णांक
७२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचं नियोजन करण्यात आल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत काल राज्याच्या रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. या हंगामासाठी दोन लाख तीन
हजार ७७२ क्विंटल अनुदानित बियाणे वाटप करण्यात येणार असून, बियाणे आणि खतांची
टंचाई जाणवणार नाही, अशी
ग्वाही त्यांनी दिली. नाशिक, नागपूर, औरंगाबाद, लातूर या
विभागांमध्ये रब्बीच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होणार असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले.
दरम्यान, राज्यात
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तत्काळ पूर्ण
करुन शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासनानं मिशन मोडवर काम
करावं, असे निर्देशही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री
बाबासाहेब धाबेकर यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ब्याण्णव वर्षांचे होते. बार्शी टाकळी
तालुक्यातल्या धाबा ग्रामपंचायत सदस्य पदापासून बाबासाहेबांनी आपली राजकीय कारकीर्द
सुरु केली. त्यांनी कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक जिंकली. ग्रामविकास,
जलसंधारण तसंच सहकार क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीनं हंगामी भाडेवाढ
रद्द केली आहे. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामातला
महसूल वाढीच्या उद्देशानं ही भाडेवाढ कालपासून लागू होणार होती, मात्र भाडेवाढ रद्द
केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अवकाळी पाऊस आणि
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देऊन उद्यापर्यंत ते पूर्ण करण्याचे निर्देश, राज्याचे मुख्य सचिव
अजोय मेहता यांनी दिले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या
नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे काल संवाद साधला, त्यावेळी
ते बोलत होते. जिल्हानिहाय कृषीक्षेत्राचं किती नुकसान झालं आहे याची त्यांनी माहिती घेतली. पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक
होतील याकडेही लक्ष द्यावं, अशी सूचना मुख्य सचिवांनी यावेळी केली.
****
जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान
झालेल्या एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांच्या सुमारे दोन लाख हेक्टर
क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरीत क्षेत्रांवरचं पंचनाम्यांचं काम प्रगतीपथावर
असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे. नुकसानग्रस्त
पिकांमध्ये कापूस पिकाचं क्षेत्र सर्वाधिक दोन लाख एकोणचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव
हेक्टर इतकं आहे. तर साडेतीन हजार हेक्टरवरील मोसंबी, एक हजार हेक्टरवरील डाळिंब आणि
आठशे हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांनी काल जालना तालुक्यातल्या दरेगाव भागात पीक नुकसानाची पाहणी केली.
नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून जास्तीत जास्त आर्थिक भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी
दानवे यांच्याकडे केली. शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर आर्थिक मदत पोहचवण्याचं आश्वासन
दानवे यांनी दिलं.
****
अवकाळी पावसानं झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी
भारतीय किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
आंदोलन केलं. पीक विमा सरसकट देण्यात यावा, पिक कर्ज तसंच विज बिल हे संपूर्ण माफ करण्यात
यावं, याप्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल जालना जिल्ह्यात नुकसान
झालेले मका, कापूस, बाजरीचं पीक राजूर-औरंगाबाद मार्गावर रस्त्यावर टाकून रस्तारोको
आंदोलन केलं. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी,
बाधित शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के मोबदला द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
मराठी नाट्यसृष्टीतला प्रतिष्ठेचा
विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, रोहिणी हट्टंगडी यांना काल प्रदान करण्यात
आला. सांगली इथं झालेल्या कार्यक्रमात नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी
हट्टंगडी यांना हा पुरस्कार प्रदान केला. कलावंतानी मन लावून काम करावं, प्रसिद्धी
आणि पैशाच्या मागे लागू नये, असं मत हट्टंगडी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद
इथं आज जरजरी जर बक्ष ऊर्स साजरा होत आहे. यामुळे आज स्थानिक सुट्टी असल्यानं औरंगाबादच्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाहरुग्ण विभाग आज बंद आहे. तर
उद्या हा विभाग नेहमीप्रमाणे सुरु राहील, असं घाटीच्या वैद्यकीय अधीक्षकांनी कळवलं
आहे.
****
परभणी महानगरपालिकेच्या वतीनं
नागरिकांना आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी आरोग्य
विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मलेरिया आणि इतर आजारांच्या प्रतिबंधात्मक उपायांची
माहिती देत आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात उद्या
कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पीक नुकसान,
देशाची अर्थव्यवस्था, रोजगार निर्मिती, महागाई, बँकिंग व्यवस्था यासारख्या मुद्यांवरुन
हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही उद्या काँग्रेसच्यावतीनं
आंदोलन केलं जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना
पीक विमा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीनं
केली आहे. या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
//*********//
No comments:
Post a Comment