Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 November
2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø पावसामुळे
झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक उद्यापासून तीन दिवस राज्याच्या
दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
विनाशर्त संपूर्ण कर्जमाफी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची पंतप्रधानांकडे मागणी
Ø किंमतींवर नियंत्रण
ठेवण्यासाठी एक लाख २० हजार मेट्रीक टन कांद्याची आयात करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
Ø राज्यात
उद्यापर्यंत सरकार स्थापनेचं
चित्र स्पष्ट होईल- काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
आणि
Ø
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड
****
अवकाळी पावसामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानाची पाहणी
करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक उद्यापासून तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे.
पाच सदस्यांचं हे पथक राज्याच्या विविध भागात पाहणी करून, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद
साधून नुकसानीचा आढावा घेणार असल्याचं, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी
सांगितलं. राज्यभरात सुमारे एक कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांचं चौऱ्याण्णव लाखावर हेक्टरवरच्या
पिकांचं नुकसान झालं असून, औरंगाबाद विभागात सोयाबीन आणि कपाशीचं मोठं नुकसान झालं
असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. औरंगाबाद विभागात डॉ. व्ही तिरुपुगल आणि डॉ. मनोहरन
हे अधिकारी पिकांची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
माजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपये
मदत जाहीर केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खरीप पिकांसाठी हेक्टरी आठ हजार
तर फळबागा आणि बारमाही पिकांसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये मदतीचा शासन निर्णय जारी
केला आहे. मात्र राज्य प्रशासनानं केंद्र शासनाकडे सात हजार दोनशे कोटी रुपये मदतीची
मागणी केली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
विनाशर्त संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी, माजी केंद्रीय कृषी मंत्री तसंच राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. पवार यांनी काल दिल्लीत संसद भवनात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं. या पावसामुळे
सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका या धान्य पिकांसह कांदा, टमाटा आदी भाजीपाल्याचंही मोठं
नुकसान झाल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. नवीन हंगामासाठी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज
दरानं कर्जही उपलब्ध करून द्यावं, आणि खासगी सावकारांपासून शेतकऱ्यांची सुटका करावी,
अशी मागणीही पवार यांनी या निवेदनातून पंतप्रधानांकडे केली आहे.
****
अवकाळी पावसानं पिकांचं
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ पाच हजार कोटी रुपये निधी देण्याची मागणी राज्याच्या
मुख्य सचिवांनी केंद्र सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र आकस्मिक निधी कायद्याअंतर्गत
निधी वितरणासाठी सध्याची मर्यादा १५० कोटी रुपये इतकी आहे, मात्र अवकाळी पावसानं पिकांचं
अतोनात नुकसान झालं असून, राज्याला पाच हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्याचं सचिवांनी
म्हटलं आहे.
****
देशात कांद्याची उपलब्धता वाढवणं आणि किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक लाख
२० हजार मेट्रीक टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे.
काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी
वार्ताहरांना ही माहिती दिली.
भारतीय राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरणाद्वारे टोल ऑपरेटर ट्रान्सफर - टी ओ टी मॉडलमध्ये सुधारणा करण्यासही
मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं मान्यता दिली आहे. यामुळे पथकर वसुल करण्याची प्रक्रिया
अधिक सोपी होईल तसंच टीओटी मॉडेलद्वारे प्राप्त महसुलाचा उपयोग महामार्गांच्या विकासासाठी
केला जाईल.
सार्वजनिक क्षेत्रातल्या
पाच केंद्रीय उपक्रमांमधली भाग विक्री करण्याच्या निर्णयलाही समितीनं मंजुरी दिली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन
लिमिटेड, भारतीय जहाज बांधणी महामंडळ, भारतीय कंटेनर महामंडळ, उत्तर पूर्व विद्युत
ऊर्जा महामंडळ आणि टिहरी हायड्रोविकास महामंडळ अशी निर्गुंतवणूक करण्यात येणाऱ्या महामंडळांची
नावे आहेत.
****
राज्यात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी
सरकारने जाहीर केलेली मदत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांनी
काल लोकसभेत शून्य प्रहरात केली. सरकारने खरीप पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये तर
फळबागा आणि बारमाही पिकांसाठी १८ हजार रुपये मदत जाहीर केली आहे, ती अनुक्रमे २५ हजार
आणि ५० हजार रुपये प्रतिहेक्टर एवढी देण्यात यावी, अशी मागणी गावीत यांनी केली.
अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनीही काल लोकसभेत,
ओल्या दुष्काळानं संकटात सापडलेल्या राज्यभरातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति
हेक्टर ५० हजार रूपयांची मदत नुकसान भरपाई म्हणून द्यावी आशी मागणी केली.
****
औरंगाबाद ते शिर्डी द्रुतगती मार्ग तयार करण्याची
मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी काल लोकसभेत
केली. दक्षिण भारताल्या राज्यातून साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक
औरंगाबाद मार्गे शिर्डीला जातात. मात्र या १०० किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली असून
शिर्डीला पोहचण्यासाठी सुमारे साडे तीन तास वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. यासंबंधिची
मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यापूर्वीच केली असल्याचं ते म्हणाले.
****
राज्यात उद्या म्हणजे शुक्रवारपर्यंत सरकार स्थापनेचं
चित्र स्पष्ट होईल, असं काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
नवी दिल्लीत काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेसंदर्भात बैठक झाली,
त्यानंतर चव्हाण वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, राज्यात
लवकरच नवं सरकार स्थापन होईल, असं ते म्हणाले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे
नवाब मलिक यांनी, शिवसेनेसोबत आम्ही दोन्ही पक्ष सरकार स्थापन करु असं स्पष्ट केलं.
दोन्ही
पक्षांची बैठक आजही होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुढच्या महिन्यात
सरकार स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वर्तवला
आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. सरकार स्थापनेबाबतचं चित्र पुढच्या
दोन दिवसांत स्पष्ट होईल, असंही राऊत म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीला आज एक महिना
पूर्ण झाला, मात्र राज्यात नवीन सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. गेल्या
बारा तारखेपासून राज्यात राष्ट्रपती राजवट आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला कालपासून
गोव्यात प्रारंभ झाला. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, केंद्रीय महिती प्रसारण
मंत्री प्रकाश जावडेकर, बाबुल सुप्रियो, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह
अनेक मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्धाटन केलं. या महोत्सवात ७६ देशांचे
प्रतिनिधी सहभागी होत असून, सुमारे ३०० चित्रपट पहायला मिळणार आहेत. सुमारे दहा हजार
प्रतिनिधींनी या महोत्सवासाठी नावं नोंदवली आहेत.
****
शंभराव्या अखिल भारतीय
मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड
करण्यात आली. मुंबईत काल झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत पटेल यांचं नाव एकमतानं
निश्चित करण्यात आल्याचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी
सांगितलं.
****
औरंगाबाद महानगरपालिकेला कायम स्वरूपी आयुक्त देण्याची
मागणी विधान परिषद सदस्य आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी काल मुंबईत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, याबाबतचं निवेदन सादर केलं. मनपा आयुक्त
दीर्घकालन रजेवर असल्यानं, तसंच औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक नजिकच्या काळात होणार
असल्यानं, शहराला कायम स्वरूपी आयुक्त मिळणं, आवश्यक असल्याचं दानवे यांनी या निवेदनात
म्हटलं आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
केंद्रीय युवक महोत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या युवक महोत्सवाचं
उद्घाटन प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता होणार आहे.
विद्यापीठाशी संलग्न सुमारे दोनशे महाविद्यालयांचे संघ आणि तीन हजार कलावंत या महोत्सवात
सहभागी होणार आहेत.
****
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोंधळी समाजाच्या भावना
दुखवल्याचा आरोप करत लातूर इथं गोंधळी समाजाच्या वतीनं शहरातल्या गांधी चौकात संबळ
वादन करुन राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या
वार्ताहर परिषदेत ज्यांच्या मेंदूत गोंधळ तो गोंधळी असा जातीय वाचक उल्लेख करुन समाजाच्या
भावना दुखावल्यानं त्यांनी माफी मागावी अशी मागणी या संघटनेनं केली असून, तशा आशयाचं
निवेदन काल निवासी उपजिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांना सादर केलं.
****
लातूर इथले विश्व हिंदू परिषदेचे जेष्ठ कार्यकर्ते
आणि सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे संचालक सदाशीव दाते यांचं काल लातूर इथं निधन झालं,
ते ७५ वर्षांचे होते. दाते हे विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रीय होते. त्यांच्या पार्थिव
देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
धुळे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातल्या चारही पंचायत
समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची काल घोषणा झाली. या सर्व ठिकाणी येत्या सात जानेवारीला
मतदान होणार असून मतमोजणी आठ जानेवारीला होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment