आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
शिवसेनेचे नेते संजय राऊत आज संध्याकाळी राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट असेल, असं
राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन
दहा दिवस होत आले तरी नव्या सरकारच्या स्थापनेबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार
आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ही आज नवी दिल्लीमध्ये काँग्रेस
अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
****
दहशतवादी कारवायात सहभागी असल्याच्या संशयावरून
उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकानं सांगली जिल्ह्यातल्या वाळवा इथल्या अर्जुन
खराडे या तरूणाला ताब्यात घेतलं आहे. दहशतवादी
कारवायांचा पार्श्वभूमीवर अर्जुन खराडे याच्या खात्यावर मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची
प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन नायजेरियन
तरूण आणि अर्जुन खराडे एकावेळेस दहा कोटींहून अधिक रक्कम दुसऱ्या बँक खात्यात दहशतवादी
कारवायांसाठी वर्ग करत होते.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या पेनटाकळी धरणातून मोठ्या
प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातली वीस
गावं पुरानं बाधित झाली आहेत. या गावांचा इतर गावाशी संपर्क तुटला आहे. या भागातील
साठ हजार हेक्टर वरील शेतीला याचा तडाखा बसला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या चिखली बुद्रुक शिवारात असलेल्या
शेततळ्यात दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. सतरा आणि बारा वर्ष वयाची
ही मुलं काल रविवारी शाळेला सुटी असल्यानं घरी न सांगता शेतात गेली होती.
****
नांदेड शहरातील श्रीनगर बाजारपेठेतलं एक दुकान काल
लुटण्यात आलं. दोन पिस्तुलधारकांनी दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला रात्री साडे
आठ वाजेच्या सुमारास धाक दाखवून रोख बावीस हजार रुपये आणि आठ हजार रुपयाचं सामान लुटून
नेलं. या प्रकारानंतर या भागातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली.
****
अमरावती शहरात अवकाळी पाऊस, वारंवार हवामानात होत
असलेले बदल यामुळे संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरात महिनाभरात २८७
जणांना डेंगू सदृष्य आजाराची लागण झाली आहे.
****
No comments:
Post a Comment