Tuesday, 5 November 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 05.11.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यात सत्ता स्थापनेच्या मुद्यावर भाजपच्या राज्यातील नेत्यांची आढावा घेणारी बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला सत्तास्थापनेसाठी जनादेश मिळाला आहे, त्याचा आदर करून लवकरात लवकर राज्यात सत्ता स्थापन करू, असं या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. शिवसेनेनं सत्ता स्थापने संदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, तो ते लवकरात लवकर देतील, त्यांची वाट पाहू आणि त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारं चोवीस तास खुली आहेत, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. संपूर्ण भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठाम असून त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सत्ता स्थापनेसंदर्भातील प्रस्ताव आताच जाहीर करता येणार नाही, असं या संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असं नमूद करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रीया नोंदवली आहे. महायुतीत ठरल्याप्रमाणेच शिवसेनेचा सत्तेतील बरोबरीच्या भागीदारीचा प्रस्ताव असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.
****
दरम्यान, भाजप आणि शिवसेना महायुती राज्यात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात अयशस्वी ठरले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पर्याय शोधणं भाग पडेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं आवश्यक नाही कारण जनता ते सहन करणार नाही, अशी प्रतिक्रियाही पाटील यांनी यावर दिली.  
****
शिवसेना पक्ष प्रमुख ऊद्धव ठाकरे यांनी आज नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या जानापूरी, सोनखेड, कारेगाव शिवारात अतिवृष्टीमूळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी कर्ज माफीचा लाभ तसंच शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळत नसल्याचं सांगितल्यावर आपण यात लक्ष घालणार असून प्रश्न सुटत नसतील तर याविरूध्द आवाज ऊठवू असं आश्वासन ठाकरे यांनी दिलं. शेतकऱ्यांनी संकटाच्या वेळी धिर सोडू नये असं सांगून ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या वतीनं शेतकरी मदत केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात उजना, सुनेगाव आणि खंडाळी या गावांना भेट देऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. 
****
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ब्याण्णव वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. बार्शी टाकळी तालुक्यातल्या धाबा गावचे रहिवासी असलेल्या बाबासाहेबांनी धाबा ग्रामपंचायत सदस्य पदापासून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली. त्यांनी कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक जिंकली.
****
जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चार लाख तेहतीस हजार हेक्टर क्षेत्रापैकी आजपर्यंत एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांच्या एक लाख त्र्याण्णव हजार आठशे नव्व्याण्णव हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरीत दोन लाख एकोणचाळीस हजार एकशे नव्वद हेक्टर क्षेत्रांवरील पंचनाम्यांचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे. नुकसानग्रस्त पिकांमध्ये कापूस पिकांचं क्षेत्र सर्वाधिक दोन लाख एकोणचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव हेक्टर इतकं आहे. तर साडेतीन हजार हेक्टरवरील मोसंबी, एक हजार हेक्टरवरील डाळिंब आणि आठशे हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात आज कांद्याच्या भावाची सुमारे चारशे रुपये भावानं घसरण झाली. या पूर्वी कांद्याला पाच हजार सहाशे रुपये उच्चांकी भाव मिळाला होता तर सरासरी पाच हजार तिनशे रुपये इतका भाव मिळाला होता. आज मात्र अठराशे ते पाच हजार तिनशे रुपये भाव मिळाले. सरासरी भाव चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
****
अयोध्या प्रकरणी लवकरचं निर्णय लागण्याच्या शक्यतेच्या पार्श्र्वभूमीवर औरंगाबाद शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता सर्वांनी घेण्याचं आवाहन औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केलं आहे. जातीय तणाव बिघडवणारी कृती या काळात होऊ नये, अशी सूचनाही त्यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.
****
व्हिडिओकॉन उद्योग समुहाच्या कामगार संघटनेनं थकित वेतनाच्या मागणीसाठी गुरुवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे. औरंगाबाद इथल्या धूत यांच्या निवासस्थानावर यावेळी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेनं आज पत्रकार परिषदेत दिला. या कामगारांचं सहायक कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
****
वाढती महागाई, बेरोजगारीमुळे सामान्य जनता त्रासली असून शेतकऱ्यांवर अतिवृष्टी तसंच अवकाळी पावसामुळे मोठं संकट कोसळलं असताना भाजप सरकार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत धुळे जिल्हा काँग्रेस समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणं आंदोलन करण्यात आलं.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...