Tuesday, 3 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****

 विशेष सुरक्षा समूह एसपीजी सुधारणा विधेयक राज्यसभेनं आज संमत केलं. या विधेयकातल्या सुधारणांनुसार यापुढे फक्त पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळू शकेल. माजी पंतप्रधानांना कार्यकाळानंतर पाच वर्ष ही सुरक्षा मिळेल, त्यांच्या कुटुंबीयांनाही याच काळात या सुरक्षेचा लाभ देण्याची तरतूद या विधेयकात आहे. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी, गांधी कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतलेली नसून, एसपीजी सुरक्षेऐवजी झेड प्लस सुरक्षा दिली असल्याचं सांगितल. या उत्तरानं समाधान न झालेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर आवाजी मतदानानं हे विधेयक संमत झालं. लोकसभेत यापूर्वीच हे विधेयक संमत झालेलं आहे.
****

 सरकारनं या वर्षी छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना पाच लाख कोटी रूपयांहून अधिक अनुदान उपलब्ध करून दिल्याची माहिती वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. देशातल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना आठ लाख ५६ हजार कोटी रूपये देण्यात आले आहेत. सरकारनं शेतकरी आणि उद्योगांना कर्ज देण्यासाठी अनेक उपाय केले असलयचं ते म्हणाले.

 दरम्यान बॅंकांच्या विलीनीकरणासंदर्भात बोलतांना ठाकूर यांनी, बॅंकांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करणं आणि त्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करणं, हा या मागचा उद्देश आहे अशी माहितीही दिली.
****

 देशात कोरोनरी स्टेंटच्या किमती ८५ टक्के तर कृत्रीम गुडघ्याच्या किमती ६९ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं, रसायनं आणि खतं राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय यांनी सांगितलं, ते आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. कोरोनरी स्टेंटच्या किंमती निर्धारित केल्यानंतर जनतेची वर्षाकाठी सुमारे पंचेचाळीस अब्ज सत्तेचाळीस कोटी रुपये बचत होत असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.
****

 दोन हजार रूपयांची चलनी नोट बंद करण्याचा सरकारचा विचार नाही असं वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते. असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही असं ते म्हणाले.
****

 सरकारनं राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत शिधापत्रिका धारकांना देशात कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. एक देश एक राशन योजनेअंतर्गत आता शिधापत्रिका धारक देशातल्या कोणत्याही दुकानातून धान्य घेवू शकतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या शिधापत्रिका धारकांना याचा लाभ होणार असल्याचं, पासवान यांनी सांगितलं.
****

 नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या कांदा - बटाटा बाजारात आज नवीन कांद्याला ८० ते १०० रूपये प्रतिकिलो तर जुन्या कांद्याला १२०-१३० रूपये किलोपर्यंत दर मिळाला. बाजारातली दररोजची कांद्याची साधारण १२० गाड्या आवक घटून ती आज ९० गाड्या झाली. मात्र बाजारात येणारा हा कांदा ओला असून साठवणीचा नाही पुढील पंधरा दिवस ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

 दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावाचा दररोज नवा उच्चांक होत असून आज कळवण बाजार समितीत कांद्याने क्विंटलमागे १४ हजार रूपयांचा टप्पा पार केला. पिंपळगाव बसवंत बाजारपेठेतही कांद्याला १३ हजार रूपये असा या हंगामातला सर्वाधिक भाव मिळाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 औरंगाबाद शहरात सिडको एन १ या उच्चभ्रू वसाहतीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागानं ताब्यात घेतलं आहे. आज सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना हा बिबट्या दिसला. वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहा तासांच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या पकडण्यात आला. या बिबट्याला सध्या शहरातल्या सिद्धार्थ उद्यानामधल्या प्राणीसंग्रहालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून, उपचार करून चोवीस तासांनंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
****

 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात कावी इथं, पाझर तलावासाठीचं भूसंपादन जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २००८ मध्ये प्रत्यक्ष जमीन ताब्यात घेण्यात आली होती, जवळपास एक हेक्टर ६० आर जमिनीचे खोदकाम करून पाझर तलाव बनवण्यात आला आहे. या प्रकरणी संयुक्त चौकशी नंतर कार्यवाही करून जमिनीचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिव्यांग कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा कुलसचिव डॉ.साधना पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिव्यांग लोकांमध्ये देखील प्रचंड क्षमता असून त्यांचा योग्यरितीनं वापर केला पाहिजे, असं यावेळी डॉ.साधना पांडे म्हणाल्या.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...