Tuesday, 3 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.12.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०३ डिसेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
देशात परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक सुधार रावबण्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत. आज नवी दिल्लीत भारत स्वीडन व्यापार परिषदेत त्या बोलत होत्या. सरकारनं औद्योगिक करात कपात केली आहे, त्या सोबतच बँकिंग, खनिकर्म, तसंच विमा क्षेत्रात आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं, सीतारामन यांनी सांगितलं. स्वीडनच्या उद्योजकांना भारतातल्या पायाभूत विकास योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी त्यांनी आमंत्रित केलं. स्वीडनच्या व्यापारमंत्र्यांशीही त्यांनी यासंदर्भात चर्चा केली
****
विविध क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत असलेल्या दिव्यांग व्यक्ती या समाजासाठी प्रेरणा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोद यांनी म्हटलं आहे. आज दिव्यांग दिनानिमित्त पंतप्रधानांनी एका ट्वीटद्वारे शुभेच्छा संदेश दिला. दिव्यांग आणि त्यांच्या भविष्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.

जागतिक दिंव्यांग दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.या दिनानिमित्त आज नाशिक इथं दिव्यांग विद्यार्थ्यांची संदेश फेरी काढण्यात आली. अनेक दिव्यांग विद्यार्थी विविध घोषणा देत या संदेश फेरीत सहभागी झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय महामार्गासंबंधीच्या कामांच्या गतीत उल्लेखनीय सुधारणा झाली असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत काल प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. कामाचा वेग सुरुवातीला दिवसाला दोन किलोमीटर होता, त्यामधे १५ पट वाढ होऊन तो ३० किलोमीटरवर पोहोचला आहे; असं ते म्हणाले. विमानतळाला जोडणाऱ्या महामार्गांसह नव्या राष्ट्रीय महामार्गांमुळे दिल्लीतलं वायू प्रदूषण बरंच कमी होईल, असं गडकरी यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
****
ई-सिगारेटचं उत्पादन, व्यापार, वाहतूक, साठा आणि जाहिरात यावर बंदी घालणारं विधेयक काल  संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेत आवाजी मतदानानं हे विधेयक संमत झालं. या विधेयकापाठीमागे कोणताही छुपा हेतू नाही, असं आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी विधेयकावरच्या चर्चेत सांगितलं. लोकसभेत काही दिवसांपूर्वीच हे विधेयक मंजूर झालं आहे.
****
महिलांवरचे लैंगिक अत्याचार आणि निर्भया निधीच्या वापरासंबंधी मानक संचालन प्रक्रियेवरील अहवाल सादर करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं केंद्र, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस बजावली आहे. लैंगिक अत्याचारबाबत माध्यमांमधे आलेल्या वृत्ताची दखल घेत आयोगाच्या समितीनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना निर्भया निधीबाबत सहा आठवड्यात अहवाल सादर करायला सांगितलं आहे.
****
आर्थिक अडचणीमुळे यावर्षीचा ऊस गळीत हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय सांगली जिल्ह्यातल्या महाकाली साखर कारखान्यानं घेतला आहे. त्यामुळं कारखान्यातल्या कामगारांना तात्पुरती सुटी देण्यात आली आहे. ऊस उत्पादकांची देयकं, कामगारांची देणी आणि इतर खर्च यामुळे कारखान्यापुढे आर्थिक अडचण निर्माण झाली होती. या पार्श्श्वभूमीवर कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज सकाळी वर्णी पूजेने नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला,  दहा डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात मंदिर परिसरात संगीत भजन, कीर्तन, प्रवचनासह विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराधी राहणाऱ्या महिलांची सोय करण्यात आली आहे. भाविकांसाठी विविध सोयी सुविधा महोत्सवाच्या काळात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार संतोष रूईकर, सचिव भगवानराव शिंदे यांनी दिली.
****
उस्मानाबाद इथं प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताहाला आजपासून प्रारंभ झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी एच व्ही वडगावे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून या सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं. ‘आरोग्यदायी राष्ट्राची उभारणी - सुरक्षित जननी विकसित धारिणी’ हे यंदाच्या या सप्ताहाचं घोषवाक्य आहे. या सप्ताहात पात्र गर्भवती तसंच स्तन्यदा मातांना पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये सहाय्य देण्यात येतं. बालमृत्यूच्या प्रमाणात घट आणि महिलांच्या बुडीत रोजगाराची अंशत: पूर्तता, हे या योजनेचे उद्देश आहेत.
****
नेपाळमध्ये सुरू असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आज व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची लढत पाकिस्तान संघाशी होणार आहे. महिलांच्या व्हॉलिबॉल स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि नेपाळ संघात होणार आहे. बॅटमिंटन स्पर्धेतही भारताचे महिला तसंच पुरुष संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन सुवर्ण, आठ रौप्य आणि तीन कांस्य पदकं जिंकून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
****


No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...