Wednesday, 4 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.12.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्यातल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
** नाणार रिफायनरी आणि आरे वृक्षतोडीच्या आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन
** भारतीय जनता पक्ष सोडणार नसल्याचं माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण
** कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत कपात
आणि
** जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमांनी साजरा
****
राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामं वेळेत पूर्ण करावीत, जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असंही ते म्हणाले. कुठलाही विकास प्रकल्प राबवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणं आवश्यक आहे. मात्र कामाची  प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.
****
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या आणि आरे वृक्षतोडीच्या विरोधातल्या आंदोलनादरम्यान, आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या या समितीत पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, गृह आणि कायदा तसंच न्याय विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे. कोणते गुन्हे मागे घ्यायचे यासंदर्भात ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या दोन्ही प्रकरणातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
****
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या काल बोलत होत्या. मी पक्षाची प्रामाणिक कार्यकर्ता असून, पक्षासाठी मोठं काम केल्याचं त्या म्हणाल्या. पक्ष सोडण्याच्या अफवांमुळे व्यथित झाल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या १२ तारखेला गोपिनाथगडावर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत कपात केली आहे. आता किरकोळ व्यापाऱ्यांना पाच टन तर घाऊक व्यापाऱ्यांना २५ टनापर्यंत कांद्याची साठवणूक करता येईल. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काल यासंदर्भातले आदेश जारी केले. साठवणुकीची ही मर्यादा आयात केलेल्या कांद्यासाठी लागू नसल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावाचा दररोज नवा उच्चांक होत असून, काल कळवण बाजार समितीत कांद्यानं क्विंटलमागे १४ हजार रूपयांचा टप्पा पार केला. पिंपळगाव बसवंत बाजारपेठेतही कांद्याला १३ हजार रूपये असा या हंगामातला सर्वाधिक भाव मिळाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या कांदा - बटाटा बाजारात काल नवीन कांद्याला ८० ते १०० रूपये प्रतिकिलो तर जुन्या कांद्याला १२० ते १३० रूपये किलोपर्यंत दर मिळाला. बाजारातली दररोजची कांद्याची साधारण १२० गाड्या आवक घटून ती काल ९० गाड्या झाली. मात्र बाजारात येणारा हा कांदा ओला असून साठवणीचा नाही पुढील पंधरा दिवस ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यात नेप्ती कांदा बाजारात, गावरान लाल कांद्याला उच्चांकी शंभर रुपये भाव  मिळाला. या बाजार समितीमध्ये काल १५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.
****
सरकारनं राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना देशात कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ‘एक देश, एक शिधापत्रिका’ योजनेअंतर्गत आता शिधापत्रिका धारक देशातल्या कोणत्याही दुकानातून धान्य घेऊ शकतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार असल्याचं, पासवान यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं महाराष्ट्राला दिलेले ४० हजार कोटी रुपये केंद्राला परत करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांना अल्पकाळासाठी मुख्यमंत्री करण्यात आलं; या भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाचा मुद्दा काल शिवसेनेनं लोकसभेत उपस्थित केला. यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शून्य प्रहारात केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
जागतिक दिव्यांग दिन काल विविध उपक्रमांनी साजरा झाला.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिव्यांग कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा कुलसचिव डॉ.साधना पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं दिव्यांग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात दिव्यांगाच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नांदेड इथं यानिमित्त शहरातल्या वसरणी इथल्या अंध विद्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते अंधमुलांना फळ वाटप करण्यात आलं. अंध आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं हंबर्डे यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या सिडको एन १ या उच्चभ्रू वसाहतीत काल बिबट्या शिरल्यानं दिवसभर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. सुमारे सहा तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. काल सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना हा बिबट्या दिसला होता. या बिबट्याला सध्या शहरातल्या सिद्धार्थ उद्यानामधल्या प्राणीसंग्रहालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून, उपचार करून चोवीस तासांनंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य हिवताप संघर्ष समितीनं २२ नोव्हेंबरचा प्रशासकीय कामकाजात सुघारणा करण्यासंदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्याच्या आरोग्य भवनासमोर काल एकदिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. हा निर्णय रद्द न केल्यास राज्यातल्या हिवताप विभागातल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला काल सकाळी वर्णी पूजेनं प्रारंभ झाला. दहा डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात मंदिर परिसरात संगीत भजन, कीर्तन, प्रवचनासह विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांसाठी विविध सोयी सुविधा महोत्सवाच्या काळात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार संतोष रूईकर, सचिव भगवानराव शिंदे यांनी दिली.
****
उस्मानाबाद इथं प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताहाला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी एच व्ही वडगावे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून या सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं. ‘आरोग्यदायी राष्ट्राची उभारणी - सुरक्षित जननी विकसित धारिणी’ हे यंदाच्या या सप्ताहाचं घोषवाक्य आहे. या सप्ताहात पात्र गर्भवती तसंच स्तन्यदा मातांना पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये सहाय्य देण्यात येतं. बालमृत्यूच्या प्रमाणात घट आणि महिलांच्या बुडीत रोजगाराची अंशत: पूर्तता, हा या योजनेचा उद्देश आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी सामान्य नागरिकांच्या हत्या केल्याच्या निषेधार्थ काल गडचिरोली इथं पोलिस विभागाच्या वतीनं हुंकार रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी हातात नक्षलविरोधी फलक धरुन नक्षल्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पश्विम विभागीय आंतर विद्यापीठ पुरुषांच्या खो-खो स्पर्धेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघानं दुसरा विजय मिळवून आघाडी घेतली.
****


No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...