Tuesday, 17 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 17.12.2019 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 December 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १७ डिसेंबर २०१सकाळी ७.१० मि.

****

** राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापहिल्या दिवशी सोळा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

** सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधीमंडळात मंजूर

** विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई तर विरोधी पक्ष नेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड

** राज्यात शिवसेनेची सत्ता  आहे, हा विश्वास निर्माण करण्यासाठी नम्र राहण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

आणि

**  औरंगाबाद महानगरपालिकेचं प्रभागरचनेनुसार वॉर्डांचं आरक्षण काढण्यास राज्य निवडणूक आयोगाची स्थगिती

****

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काल पहिल्या दिवशी सोळा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी साडेसातशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

विधीमंडळानं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव काल संमत केला. विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर विधान परिषदेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव मांडला. दोन्ही सदनांनी हा अभिनंदनाचा प्रस्ताव एकमुखानं मंजूर केला.

दिवंगत सदस्यांनाही काल विधीमंडळाच्या दोन्ही सदनात शोक प्रस्तावाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं.

दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मुद्दा विधानसभेत मांडताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं कामकाजात न घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली, त्यावरून विरोधी पक्षानं जोरदार घोषणाबाजी करून निषेध दर्शवला. या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आलं.

सदनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपनं याच मुद्यावरून राहुल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

****

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांनी निवड झाली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल ही घोषणा करत, या दोन्ही नेत्यांचं अभिनंदन केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरेकर यांचं अभिनंदन करत, त्यांना विरोधी पक्षनेत्यांच्या आसनावर बसवलं. दरेकर यांचं अभिनंदन करताना, सभागृह नेते देसाई यांनी, दरेकर यांच्या सामाजिक, क्रीडा क्षेत्रातल्या योगदानासोबतच मुंबईत सहकार चळवळीतल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

दरेकर यांनी अभिनंदनपर भाषणांला उत्तर देताना, सभागृहाचं कामकाज शांततेत जास्तीत जास्त काळ चालावं, यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहण्याचं तसंच. कष्टकरी, कामगार आणि वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.

****

राज्यात शिवसेनेची सत्ता  आहे, हा विश्वास निर्माण करण्यासाठी नम्र राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यापूर्वीच्या सरकारसारखं वागणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार असा प्रश्नही सध्या विचारला जात आहे याबाबत बोलतांना ठाकरे यांनी आम्हाला आमच्या वचनांची आठवण करुन देण्याची गरज नाही, असं सांगत आम्ही जे बोलतो तेच करतो, असं सांगितलं.

***

कोट्यवधी रुपयांच्या विदर्भ सिंचन घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय कडून चौकशी करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे, या याचिकेवर न्यायालयानं राज्य सरकारला येत्या पंधरा जानेवारीपर्यंत शपथपत्र सादर करण्यास सांगितलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळातल्या या सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा तसंच प्रकल्पांचे आकडे फुगवल्यानं हा घोटाळा सत्तर हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं, या बातमीत म्हटलं आहे.

****

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची नवे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. विद्यमान लेफ्टनंट जनरल बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक प्रभागरचनेनुसार घेण्यास आणि प्रभागरचनेनुसार वॉर्डांचं आरक्षण काढण्यास राज्य निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाचं पत्र काल महापालिका आयुक्तांना प्राप्त झालं. महापालिका निवडणुकीकरता सोडत काढणे, प्रभागरचना प्रसिद्ध करणे, हरकती आणि सूचना मागवणे, ही प्रक्रिया रद्द करत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारच्या प्रस्तावित नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण क्षेत्रात स्वायत्तता आणि मुलभूत-उपयोजित ‘संशोधन संस्कृती’ विकसित करण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती दिल्लीच्या शिक्षण संस्कृती न्यासचे सचिव डॉक्टर अतुल कोठारी यांनी दिली. औरंगाबादमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण‘ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. जगातल्या दर्जेदार २००  विद्यापीठात भारतातलं एकही विद्यापीठ नसल्याचं लक्षात घेऊन हे धोरण ठरवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्याचे तहसीलदार अनिल हेळकर यांच्यावर वाळूमाफियांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, तसंच जिल्हा तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवत धरणे आंदोलन केलं.

****

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करत हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं काल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. काही आंदोलकांनी बस स्थानकात घुसून मानव विकास बसच्या काचा फोडल्या. या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

****

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडून दुसऱ्या टप्प्यात २४० कोटी, ८४ लाख, ७९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.  हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ११७ कोटी ४८ लाख रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी काल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.

****

जम्मू काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या उंबरवाडी इथले जवान जोतिबा चौगुले शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

परभणी जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या कारणावरून काल परभणी शहरातल्या महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं. अधीक्षक अभियंता डी. आर. बनसोडे यांनी रोहित्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

****

राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेत वापरलं जाणारं महापोर्टल पूर्णपणे बंद करण्यात यावं, या आणि अन्य मागण्यांसाठी काल नांदेड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीनं मोर्चा काढला. या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना मागण्यांचं निवेदन दिलं.

****

दिल्लीत जामिया मिलिया इस्मालिया विद्यापीठातल्या घटनेचे पडसाद औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उमटले. काल काही विद्यार्थी संघटनांनी या घटनेचा निषेध करत, शैक्षणिक विभाग आणि अभ्यासिका बंद ठेवण्याचं आवाहन केलं. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रमुख आंदोलक विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावत, जमाव करण्यास मज्जाव केला.

****

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड दरम्यान धावणारी राज्य राणी एक्सप्रेस ही रेल्वे नांदेडपर्यंत वाढवण्याला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मंजुरी दिली आहे. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यासदंर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

****

बीड जिल्ह्यातल्या ११ पंचायत समित्यांच्या सभापती पदाचं आरक्षण काल जाहीर करण्यात आलं. प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. शिरूर -अनुसूचित जाती महिला, परळी- इतर मागासवर्गीय, माजलगाव आणि आष्टी- इतर मागासवर्गीय महिला, गेवराई, धारूर आणि बीड सर्वसाधारण तर केज, अंबाजोगाई, पाटोदा आणि वडवणी पंचायत समितीचं सभापती पद  सर्वसाधारण प्रवर्गातला महिलांसाठी आरक्षित झालं आहे.

****

केंद्र सरकारच्या सोलापूर इथल्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि उस्मानाबाद नगरपालिकेच्या वतीनं काल उस्मानाबाद इथं ‘नो टू सिंगल युज प्लास्टिक’ हा विशेष संवाद कार्यक्रम घेण्यात आला. देशभरातली पंधरा राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशांनी एकदा वापरायाच्या प्लास्टिक वर बंदी घातली असून, नागरिकांनीही या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी यावेळी केलं.

****

महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्याचं तसंच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदतीचं आश्वासन पूर्ण करावं, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं काल परभणी-गंगाखेड रस्त्यावरील खळी पाटीजवळ रस्तारोको आंदोलन करण्यात आलं.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...