Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ जुलै २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
सरपंचाची
थेट जनतेमधून निवड करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी; सातवी उत्तीर्णतेचीही
अट लागू
·
मोटार
वाहन करामध्ये दोन टक्के वाढ
·
उस्मानाबाद
आणि लातूरसह राज्यातल्या आणखी १५ जिल्ह्यांत एकात्मिक बालविकास सेवा योजना राबवण्यास
मान्यता
·
आषाढी
एकादशी निमित्त राज्यभरातून शेकडो दिंड्या पंढरपुरात दाखल; अखंड हरीनामाच्या गजरानं
अवघी पंढरी दुमदुमली, शेतकरी कर्जमुक्त करण्याची
शक्ती देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विठ्ठलाला साकडं
आणि
·
ज्येष्ठ
अभिनेते मधुकर तोरडमल अनंतात विलीन
****
ग्रामपंचायत सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याच्या निर्णयाला
राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायतींच्या येत्या निवडणुकांपासून या
निर्णयाची अंमलबजावणी होईल. सरपंचावर वारंवार येणाऱ्या अविश्वास ठरावाची संख्या कमी
व्हावी, आणि ग्रामपंचायतीचा कारभार कार्यक्षमपणे चालू राहावा या उद्देशाने हा निर्णय
घेण्यात आला आहे.
सरपंच पदाच्या निवडणुकीत एक जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या
उमेदवारासाठी सातवी इयत्ता उत्तीर्ण असणं अनिवार्य करण्यासह सरपंच पद अधिक सक्षम करण्याचा
निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करुन तो ग्रामसभेतून
मंजूर करुन घेण्याचा अधिकार सरपंचांना राहणार आहे. त्याशिवाय ग्राम विकास समित्या या
सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गठीत होणार आहेत. सध्याच्या वार्ड रचनेत तसंच सरपंच आरक्षणावर
या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही.
सरकार या संदर्भात लवकरच वटहुकूम काढणार असून त्यानंतर
कायदा मंजूर करण्यात येणार असल्याचं, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळ
बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं.
****
राज्यात गेल्या एक जुलैपासून जकात आणि स्थानिक संस्था
कर रद्द झाल्यामुळे निर्माण होणारी महसुलाची हानी टाळण्यासाठी वाहन नोंदणी करताना एक
रकमी आकारण्यात येणाऱ्या मोटार वाहन करामध्ये सर्वसाधारणपणे दोन टक्के वाढ करण्याचा
निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे.
****
राज्यातल्या देशी, विदेशी, हातभट्टीच्या दारूसारख्या अवैध
धंद्यांना ग्रामरक्षक दल तसंच लोकसहभागातून आळा घालण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र दारुबंदी
अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्याच्या मसुद्यालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
****
एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्यातल्या आणखी १५ जिल्ह्यांत
राबवण्यास मंत्रिमंडळानं कालच्या बैठकील मान्यता दिली. एप्रिल २०१४ पासून ही योजना
राज्यभरातल्या २० जिल्ह्यांत राबवली जाते, यामध्ये आता उस्मानाबाद आणि लातूरसह आणखी
१५ जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. महिला तसंच बालकांचं आरोग्य, शिक्षण आणि पोषणाकडे
लक्ष पुरवणाऱ्या या योजनेसाठी या वर्षापासून २१० कोटी ९६ लाख रुपये निधी उपलब्ध करून
दिला जाणार असून, यापैकी ५० कोटी ५२ लाख रुपये वाटा राज्यशासन उचलणार आहे.
****
आषाढी एकादशी आज सर्वत्र भक्तीभावानं साजरी होत आहे. संत
ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह राज्यभरातून लहानमोठ्या
शेकडो दिंड्या पंढरपुरात काल दाखल झाल्या. अखंड हरीनामाच्या गजरानं संपूर्ण पंढरपूर
दुमदुमलं आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून तसंच शेजारच्या राज्यातूनही भाविकांचा
महापूर लोटला असून, आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता
फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल तसंच रुख्मिणीची महापूजा करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्याच्या
सिंदखेडराजा इथले परसराम मेरत आणि अनसुया मेरत या वारकरी दाम्पत्याला मानाचे वारकरी
म्हणून विठ्ठलाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याची संधी मिळाली.
महापूजेनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, पांडुरंगाच्या
कृपेने राज्यात चांगला पाऊस होऊन कृषी विकास दर २० टक्क्यांपर्यंत वाढल्याचं सांगत,
शेतकरी कर्जमाफीनंतर शेतकरी कर्जमुक्त करण्याची शक्ती देण्याचं साकडं विठ्ठलाला घातल्याचं
सांगितलं. ते म्हणाले…
विठ्ठलाला आज हेच माझं मागणंय की कर्जमाफी झाली पण
जोपर्यंत आमचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा शेतकरी सुखी
होऊ शकत नाही आणि म्हणून पांडुरंगा आम्हाला एवढाच आशिर्वाद दे की या शेतकऱ्याला आम्हाला
कर्जमुक्त करता यावं आणि मला विश्वास आहे की हे देखील मागणं पुरं होईल आणि तशा प्रकारची
शक्ती ही पांडुरंग आम्हाला देईल.
पंढरपूर विकासासाठी कॅनडा सरकारनं अर्थसहाय्याचा प्रस्ताव
दिला असून, लवकरच यासंदर्भात बोलणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विठ्ठल
रुख्मिणी मंदीर समितीवर अद्याप सदस्य नियुक्ती पूर्ण व्हायची असून, यासंदर्भात सर्वांशी
चर्चेनं निर्णय घेणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली
स्थापन झालेल्या या समितीवर राजकीय लोकांचा भरणा असल्यानं, ही समिती बरखास्त करण्याच्या
मागणीसाठी काल वारकरी दिंडीकरी संघटनेच्या वतीनं पालखी सोहळा थांबवून ठिय्या आंदोलन
करण्यात आलं, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे
घेण्यात आलं होतं.
"पर्यावरणाची वारी - पंढरीच्या दारी" या आळंदी
ते पंढरपूर मार्गावर आयोजित पर्यावरण दिंडीचा काल सायंकाळी पंढरपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत समारोप झाला. वृक्ष लागवड मोहिमेत वारकरी संप्रदायानंही योगदान द्यावं, असं
आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यात इतरत्रही विठ्ठल
मंदिरात भाविकांनी आज पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
औरंगाबाद नजिक प्रती पंढरपूर इथंही आजूबाजच्या अनेक जिल्ह्यातून
भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात आषाढी एकादशीनिमित्त आज स्थानिक
सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांच्या पार्थिव देहावर
काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी तोरडमल
यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन घेऊन, राज्य शासनाच्या वतीनं श्रध्दांजली अर्पण
केली. तोरडमल यांचं परवा मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं होतं.
****
अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी काल
उस्मानाबाद न्यायालयानं आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास आणि आर्थिक दंडाची शिक्षा
सुनावली. विशाल नन्नवरे असं या आरोपीचं नाव असून, त्यानं सात एप्रिल २०१५ रोजी तुळजापूर
इथं राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीला पळवून नेत, लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं होतं.
****
थकीत पगार आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी नांदेड महापालिकेच्या
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी काल महापालिकेसमोर निदर्शनं केली. चार महिन्यांपासून थकलेलं
वेतन तत्काळ अदा करावं, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्या मान्य
न केल्यास, येत्या १० जुलै रोजी संपाचा इशारा कामगारांच्या संघटनेनं दिला आहे.
****
लातूर जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसानं
दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात यंदा खरिपाच्या ऐंशी टक्के पेरण्या
पूर्ण होत आल्या आहेत. मात्र पावसाअभावी पिकाची वाढ खुंटली आहे.
जिल्ह्यात कालपर्यंत वार्षिक सरासरीच्या २५ टक्के पाऊस
झाला असला तरी, त्यात सातत्य नाही, येत्या दोन दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीच
संकट उभं राहण्याची भीती वर्तवली जात आहे.
उंदीर तसंच डुकरांचा त्रास वाढल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत असून, वनविभागानं डुकरांचा
बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
****
राज्य शासनानं जाहीर केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज
कृषी स्वावलंबन कर्जमाफी योजनेअंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एक
लाख ७६ हजार २९८ शेतकऱ्यांना २९५ कोटी ९४ लाख रुपयांचा लाभ होणार आहे. बॅंकेचे अध्यक्ष
विधीज्ञ श्रीपती काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या महिनाभरात जिल्ह्यातल्या
५८२ सोसायटीच्या सदस्यांची निकषानुसार तपासणी केल्यानंतर पात्र थकबाकीदाराच्या याद्या
तयार होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
शेतकरी कर्जमाफीसाठीचे नियम आणि अटी रद्द कराव्या आणि
सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या जालना जिल्हा
शाखेच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात
काल जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून, संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवर तत्काळ निर्णय
न घेतल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४८ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची
६८ कोटी रुपये थकबाकी मिळावी, या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं
काल औरंगाबाद इथं समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. अनुसूचित जाती-जमाती,
इतर मागासवर्ग, भटके विमुक्त प्रजातीतल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षापासून शिष्यवृत्ती
मिळाली नसल्यानं, शैक्षणिक अडचणी येत आहेत, वारंवार मागणी करूनही शिष्यवृत्ती न मिळाल्यानं,
आंदोलन करत असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं.
****
अखिल भारतीय पेट्रोल वितरक संघटनेनं ५ जुलै रोजी पेट्रोल
खरेदी न करण्याचा तसंच १२ जुलै रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. संघटनेचे प्रवक्ते
अली दारुवाला यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment