Tuesday, 11 July 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 11 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत १८ विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतिपदासाठी गांधी यांना उमेदवारी देण्यात आली. येत्या पाच ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे.

****

अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अमरनाथ यात्रेकरुंना कडक सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.

जम्मू काश्मीर सरकारनं या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी सहा लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रेकरुंचा नवा जत्था आज पहलगाम आणि बालटाल मार्गावरुन पुढच्या यात्रेसाठी रवाना झाला.

****

अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा, दिल्लीतल्या केंद्र सरकारवरचा हल्ला आहे, त्यामुळे निंदा करण्याची नाही, तर चोख प्रत्यूत्तर देण्याची वेळ आली असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.

दरम्यान, हल्ल्याच्या निषेधार्थ आज नाशिक इथं भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या, तसंच केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरुद्ध ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

****

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीनं आज ही घोषणा केली. आगामी श्रीलंका दौऱ्यापासून ते प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकरणार आहेत.

****

राज्यातल्या नदी, तलाव, कालवे या जलस्त्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी अभियान हाती घेण्याचं आवाहन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे. ते आज मुंबई इथं शेती पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. लहरी हवामान हे शेतीपुढे मोठं आव्हान असून, त्याला सामोरं जाण्यासाठी हवामान बदलावर आधारित कृषी कार्यक्रम राबवले पाहिजे, असं राज्यपाल म्हणाले. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या पुरस्कारांमध्ये पुढच्या वर्षापासून भाजीपाला उत्पादन वाढीसाठी सावता माळी पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी केली.

****

नमामि चंद्रभागा अभियानात लोकांचा सहभाग वाढावा, तसंच लोकांमध्ये नदी शुद्धीकरणाची व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशानं जलतज्ञ राजेंद्र सिंह यांची संस्था येत्या २४ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत जलयात्रा काढणार आहे. भीमाशंकर इथून सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप कर्नाटकातल्या विजापूर इथं होणार असून, त्याठिकाणी नदी पुनर्जीवन या विषयावर एक राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. सिंह यांनी आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन ही माहिती दिली.  

****

राज्यात आज पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली.

नांदेड जिल्ह्यातही काल रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना थोडं जीवदान मिळेल, तसंच आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. जिल्ह्य़ातल्या मुखेड आणि नायगांव तालुक्यात अद्यापही खरिपाची पेरणी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या मुस्तापूर इकळीमोर सज्जाचे तलाठी एसीकर यांना आज एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही कारवाई केली.

****

राज्य शासनानं जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असल्याचं सांगून त्याविरोधात काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर एल्गार पुकारण्यात येणार आहे. उद्या बुलडाणा इथून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे या यात्रेची सुरुवात करणार आहेत. बुलडाण्याचे काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांनी ही माहिती दिली.

****

सेंद्रीय शेतीतल्या समस्या सोडवून ही शेती सोपी व्हावी यादृष्टीनं राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि नाशिकची कृषी सूक्ष्मजीव उत्पादन आणि शेतकरी संस्था यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. जैव उत्पादनांविषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती देऊन, शेतीत त्याचा उपयोग करण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल, असं मत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के पी विश्वकर्मा यांनी व्यक्त केलं.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...