Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 11 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर
झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. अशा भ्याड हल्ल्यांपुढे
भारत कधीही झुकणार नाही, असं त्यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री
अरुण जेटली, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा
मुफ्ती यांनीही या हल्ल्याचा कडक शब्दात निषेध केला आहे.
दरम्यान, जम्मू मध्ये अनेक राजकीय संघटनांनी हल्ल्याच्या
निषेधार्थ आज बंदचं आवाहन केलं आहे. तसंच जम्मू क्षेत्रात इंटरनेट सेवाही बंद करण्यात
आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना आज विमानानं दिल्ली इथं आणण्यात येत आहे.
****
परदेशी नागरिकांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या खर्चाचा तपशील
न दिलेल्या सहा हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द होण्याची शक्यता आहे. परदेशी
नागरिकांनी केलेल्या आर्थिक मदतीवर या संस्था चालवण्यात येत असून, या संस्थांनी केलेल्या
खर्चाचा तपशील केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मागवण्यात आला होता. मात्र अद्यापही या संस्थांनी
तपशील सादर न केल्यानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीमुळे या वर्षअखेरीपर्यंत महागाई
एक ते दोन टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल, असं महसूल सचिव हसमुख अढिया यांनी म्हटलं
आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. महागाई वाढणार नाही याकडे सरकारचं
विशेष लक्ष असून, नागरिकांना रोजच्या जीवनात उपयोगात येणार्या वस्तूंवर कमी कर लावला
असल्याचं ते म्हणाले.
****
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या निधनानं
सामाजिक विसंगतीवर रेषांच्या सहाय्यानं प्रभावी भाष्य करणारा कलावंत आपण गमावला
आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर तेंडुलकर
यांच्या निधनानं साध्या, सोप्या चित्र संकल्पनांच्या माध्यमातून बोलकी हास्य
चित्रे रेखाटणारा व्यंगचित्रकार गमावला असल्याचं सांगत सांस्कृतिक कार्य मंत्री
विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे. तेंडुलकर यांचं आज पहाटे पुणे इथं निधन
झालं. त्यांच्या पार्थिव देहावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
दहीहंडीच्या वेळी १८ वर्षांपेक्षा कमी
वयाच्या मुलांना सहभागी होण्यास परवानगी द्यावी, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य
सरकार घेईल, तसंच कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं निवेदन
राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे. दहीहंडी उत्सवात १८ वर्षांखालील
गोविंदांना सहभागी होण्यावर सर्वोच्च न्यायालयानं निर्बंध घातले आहेत. गोविंदांच्या
सुरक्षेसाठी सरकारनं कोणत्या ठोस उपाययोजना केल्या आहेत, त्याचं लेखी स्पष्टीकरण न्यायालयानं
मागितलं आहे.
****
शेतमालाचा बाजारभाव तसंच शासकीय योजनांचा
लाभ थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण
माहितीचा मास्टर डाटाबेस पणन विभागामार्फत तयार करण्यात येत असल्याचं पणनमंत्री
सुभाष देशमुख यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं ते यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते.
या प्रकल्पात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या माहितीचा तपशील कृषी उत्पन्न बाजार
समितीत ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना योग्य
प्रकारे कृषी विषयक मार्गदर्शन उपलब्ध व्हावं, शेतमालाचा
बाजारातला अद्ययावत भाव, प्रमाण या विषयीची माहिती व्हावी यासाठी हा
प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
****
मुस्लिम समाजातल्या इतर मागास वर्गाच्या जात प्रमाणप्रत्रासंदर्भातल्या
विविध समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष
सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलं आहे.
अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संस्थेच्या
शिष्टमंडळानं विविध मागण्यासंदर्भात बडोले यांची मुंबई इथं भेट घेतली, त्यावेळी ते
बोलत होते. जात वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर
देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अध्यक्षाची नेमणूक केली जात असून, मुलाणी समाजातल्या
खाटीक, कसाई, कसाब आदी जातींना एकच प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडे
शिफारस करुन सुधारणा करण्यात येईल, असं आश्वासन बडोले यांनी यावेळी दिलं.
****
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं आज जिल्हा प्रशासनाच्या
वतीनं महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सात हजारांहून अधिक शासकीय कर्मचारी या अभियानात
सहभागी झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
झाला. या पावसामुळे पिकांना थोडं जीवदान मिळेल, तसंच आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल,
अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. जिल्ह्य़ातल्या मुखेड आणि नायगांव तालुक्यात अद्यापही
खरिपाची पेरणी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होईल, असा अंदाज
हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment