आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१२ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातल्या रेडबघ भागात सुरक्षा यंत्रणांनी काल रात्रभर चालवलेल्या मोहिमेमध्ये हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचे जावेद शेख, अकिब गुल आणि दाऊद हे तीन अतिरेकी ठार झाले आहेत.या चकमकीच्या ठिकाणावरून अतिरेक्यांकडे असलेली शस्त्रंही ताब्यात घेण्यात आली आहेत.सुरक्षा दलानं या अतिरेक्यांना घेरल्यानंतर स्थानिक लोकांनी सुमारे एक तास दगडफेक करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांनी या लोकांना पिटाळून लावून मोहीम पूर्ण केली.
*****
महिलांसाठीच्या राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्याला मंत्रीगटानं मान्यता दिली आहे.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे या गटाचं नेतृत्व असून, या धोरणाच्या मसुद्यामध्ये गरीब कुटुंबातल्या मुलींना मोफत शिक्षण आणि सर्व महिलांसाठी आरोग्य कार्ड देण्यासह अन्य काही प्रस्तावांचा समावेश आहे. हा मसुदा आता केंद्रीय मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवला जाईल.
****
प्रधानमंत्री सिंचन योजने अंतर्गत देशभरात 96 सिंचन प्रकल्प साकारले जात असून त्यात 26 प्रकल्प महाराष्ट्रात साकारले जात असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा राज्य मंत्री डॉ संजीवकुमार बलियान यांनी काल नाशिक इथे दिली.
*****
धार्मिक संस्थांच्या अन्नछत्रांमार्फत होणा-या अन्न पुरवठ्याला वस्तू आणि सेवा कर लागू नसल्याचं अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, दर्गे अशा ठिकाणी वितरित केल्या जाणा-या प्रसादावरही कोणताही कर आकारला जात नसल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
*****
राज्यातल्या नदी, तलाव, कालवे या जलस्त्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी अभियान हाती घेण्याचं आवाहन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे.२०१४ च्या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते काल मुंबईत बोलत होते. लहरी हवामान हे शेतीपुढे मोठं आव्हान असून, त्याला सामोरं जाण्यासाठी हवामान बदलावर आधारित कृषी कार्यक्रम राबवले पाहिजेत, असंही राज्यपालांनी म्हटलं आहे.
****
परभणी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदावर गणेश देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. स्थायी समिती सभापती पदासह विविध प्रभाग समितींच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्यानं, या सर्व पदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.
****
No comments:
Post a Comment