Saturday, 1 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.07.2017 - 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जुलै २०१ दुपारी .००वा.
****
सरकारनं रासायनिक खतांवरील वस्तू आणि सेवा कर - जीएसटी १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीमध्ये झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खतांवरील कर कमी करण्यासाठी सरकारला अनेक निवेदनं प्राप्त झाल्यानंतर सरकारला पूर्वीचे खतांचे दर हे शेतकऱ्यांसाठी जास्तीची असल्याचं वाटल्यानं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं जेटली यांनी बैठकीनंतर सांगितलं. त्याचप्रमाणे ट्रॅक्टरच्या काही भागांच्या किंमती देखील १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पूर्णपणे तयारी न करता देशात सुधारणा लागू करण्यात येत असून, जीएसटीची अंमलबजावणी म्हणजे एक प्रकारचा तमाशा असल्याची टीका, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. विमुद्रीकरणाप्रमाणेच कोणत्याही प्रकारची दूरदृष्टी न बाळगता अथवा संस्थात्मक पूर्वतयारी न करता ही अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं गांधी यावेळी म्हणाले. मात्र, याप्रकरणी विरोधी पक्षांमध्ये फूट पडली असून जीएसटी सुरू करण्यासाठी नवी दिल्लीत मध्यरात्री झालेल्या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल युनायटेड, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दल हे पक्ष सामील झाले होते, तर काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, डावे, द्रमुक आणि नॅशनल कॉन्फ्रंस पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला.
****
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेली जीएसटीची ऐतिहासिक सुरुवात म्हणजे देशाच्या सांघिक संरचनेशी असलेल्या प्रतिबद्धतेचा परिपाक असल्याचं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि राज्य सरकारांचं अभिनंदन केलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात आज सीमा सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका स्थानिक महिलेचा मृत्यू झाला. याठिकाणी काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर, जवानांनी शोधमोहीम सुरु केली. आज सकाळच्या सुमारास ही चकमक झाली.
****
चोख सुरक्षेव्यवस्थेमध्ये चार हजार ४७७ यात्रेकरूंचा तिसरा जत्था अमरनाथ यात्रेसाठी जम्मूहून काश्मीरकडे आज सकाळी रवाना झाला. जम्मूतल्या भगवतीनगर तळावरून १३६ हलक्या आणि जड वाहनांमधून या यात्रेकरूंनी पहाटे साडेचार वाजता काश्मीरकडे प्रस्थान केलं.
****
भारताचे महाधिवक्ता मुकूल रोहतगी यांच्याजागी जेष्ठ वकील के के वेणूगोपाल यांची निवड करण्यात आली आहे. रोहतगी यांनी या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, वेणूगोपाल यांची या पदी निवड करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार कायदा मंत्रालयानं काही दिवसांपूर्वीच वेणूगोपाल यांची या पदी निवड करण्यासाठीची फाईल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली होती.
****
सरकारनं जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवर व्याज दरात शून्य पूर्णांक एक टक्का कपात केली आहे. पीपीएफ, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी सारख्या योजनांवरच्या व्याज दरात ही कपात करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. 
****
राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरु असून कोकणात काल अतिवृष्टीची नोंद झाली. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
रायगड जिल्हयात गेले सहा दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून, जिल्हयातल्या सावित्री, पाताळगंगा, काळ, गांधारी आदी प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
****
सातवा वेतन आयोग तातडीनं लागू करावा, यासाह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना १२ ते १४ जुलै दरम्यान संप पुकारणार आहे. या संपात राज्यभरातले १९ लाख कर्मचारी सहभागी होती, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी कोल्हापूर इथं वार्ताहर परिषदेत दिली. बदल्यांमधला भ्रष्टाचार थांबवावा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले थांबवण्यासाठी शिक्षेची तरतूद करावी, चाळीस टक्के रिक्त पदं भरावीत आदी मागण्यांसाठी संप पुकारणार असल्याचं खोंडे यांनी सांगितलं.
****
ग्राम सामाजिक परिर्वतन अभियानात बीड जिल्ह्यातल्या आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये विकासाच्या सर्व योजना राबवण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावाचा विकासात्मक आराखडा तयार करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...