Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
जम्मू काश्मीरमधल्या त्राल परिसरात सुरक्षा
बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला.
या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरु केली. या
मोहीमेत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले असून, अद्यापही चकमक सुरु आहे.
****
जम्मू
काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर
झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं एका विशेष चौकशी पथकाची स्थापना केली
आहे. या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तय्यबा जबाबदार असल्याचं पोलिसांचा
प्राथमिक तपास आहे.
****
चीनसोबतच्या
तणावाबाबत भारताच्या भूमिकेला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचं परराष्ट्र व्यवहार
विभागाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं झालेल्या सर्व पक्षीय
नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत केंद्र सरकारच्या वरिष्ठ
मंत्र्यांनी चीन आणि जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत माहिती दिली.
****
विमुद्रीकरणानंतर सुमारे साडे पाच लाख
लोकांनी केलेले रोख व्यवहार आणि त्यांचे प्राप्तीकर विवरणपत्र यात विसंगती आढळून आल्याचं
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच एक लाख जणांनी आपल्या सर्व बँक खात्यांचे
तपशील दिलेले नाहीत असंही काळ्या पैशाविरोधातल्या मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात स्पष्ट
झालं आहे. विमुद्रीकरणाच्या काळात झालेल्या मोठ्या रकमांच्या व्यवहारांचं ई व्हेरीफीकेशन
करण्याची मोहीम प्राप्तीकर विभागानं गेल्या ३१ जानेवारी पासून सुरु केली आहे.
****
लोकसभा
अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी उद्या सर्व
पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. सभागृहातलं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी
महाजन यावेळी सभागृहातल्या सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहेत.
पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे.
****
केंद्रीय
दक्षता आयोगाचे आयुक्त के व्ही चौधरी यांनी, सरकारी संस्थांमधला भ्रष्टाचार
आणि अनियमितता रोखण्यासाठी भ्रष्टाचार उघड करण्यासाठीची यंत्रणा मजबूत करण्याची गरज
व्यक्त केली आहे. ते हैदराबाद इथं दक्षता अभ्यास मंडळाच्या १४ व्या स्थापना दिनाच्या
निमित्तानं बोलत होते. दक्षता विभागातल्या प्रकरणांमध्ये अधिक प्रमाणात दोषींवरील गुन्हे
सिद्ध झाल्यास भ्रष्टाचार रोखण्यास अधिक मदत होईल, असं ते
यावेळी म्हणाले.
****
उत्तर
प्रदेशमध्ये विधानसभेतून शक्तीशाली पी ई टी एन स्फोटक सापडल्यानंतर विधानभवन परिसरात
सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, सर्व दरवाजांवर जलद कृती दलाचे जवान तैनात
करण्यात आले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकानं या प्रकरणामध्ये तपासाला सुरूवात
केली आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या चौंडी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी त्यांचं राष्ट्रीय
स्मारक उभारावं, अशी मागणी जलसंधारण मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम
शिंदे यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री महेश शर्मा यांच्याकडे केली आहे.
नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत शिंदे यांनी या मागणीचं निवेदन सादर केलं. राज्य शासनाकडून
तसंच भारतीय पुरातत्व विभागाकडून अहवाल मागवून याबाबत विचार केला जाईल, असं आश्वासन
शर्मा यांनी यावेळी दिलं.
शिंदे
यांनी केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांचीही भेट घेतली. राज्यातले पाझर तलाव,
साठवण तलावांचं नुतनीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्राकडून निधी मिळणार असल्याचं उमा भारती
यांनी यावेळी सांगितलं.
****
उघड्यावर शौचापासून मुक्तीसंदर्भात अधिक
व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यासाठी राज्यात येत्या नऊ ऑगस्ट क्रांति दिनापासून ते
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत ‘उघड्यावर शौचापासून स्वातंत्र्य’ या जनजागृती सप्ताहाचं
आयोजन करण्यात आलं आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती
दिली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आतापर्यंत ११ जिल्हे निर्मल झाले असून, मार्च २०१८
पर्यंत संपूर्ण राज्य निर्मल होण्याची अपेक्षा लोणीकर यांनी व्यक्त केली.
****
राज्यात आजही अनेक ठिकाणी सकाळपासून मुसळधार
पाऊस सुरु आहे. मुंबई, रायगड परिसरात पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं
आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र परवा पासून सुरु असलेल्या पावसानं आज विश्रांती घेतली.
जिल्ह्यातलं गंगापूर धरण ५० टक्के भरलं असून, दारणा धरण ७१ टक्के भरलं आहे. नांदूर
मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणात सुमारे २२ हजार पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग
सुरू आहे. जायकवाडी धरणात सध्या ३७३ दशलक्ष घनमीटर अर्थात एकूण साठवण क्षमतेच्या १७
पूर्णांक १८ टक्के जिवंत पाणी साठा शिल्लक आहे.
मराठवाड्यात मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात
आजही पावसाचं वृत्त नाही.
****
No comments:
Post a Comment