Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
शासनाची वृक्ष लागवड मोहीम, जलयुक्त शिवार अभियान आणि स्वच्छता
अभियानामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवावा, असं आवाहन विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं आज नगर नाका ते गोलवाडी-वाळूज रस्त्याच्या
बाजूला माहेश्वरी मंडळातर्फे दोन हजार वृक्षांचं रोपण आणि संवर्धनाच्या कार्यक्रमात
ते बोलत होते. वृक्ष लागवडीमुळे प्रदुषणविरहित वातावरण निर्माण होण्यास मदत होते, त्यामुळे
स्वयंसेवी संस्थांनी, तरुणांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असं ते म्हणाले. पाणी संवर्धन
आणि स्वच्छता अभियानाबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
नाशिकमधल्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात आज पहाटेपासून
जोरदार पाऊस सुरु आहे, त्यामुळे सकाळी सहा वाजता धरणात ४० हजार २०० दशलक्ष घनफूट पर्यंत
पाणीसाठा वाढला आहे. धरण ७५ टक्के भरल्यानं दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा
विसर्ग सुरू असून, गोदापत्राची पाण्याची पातळी वाढली आहे. धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात
पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढू शकतो, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी
दिली आहे.
दरम्यान, नाशिक अग्निशामक आणि आपत्ती व्यवस्थापन विभगाला
तसंच नदीकाठावर असलेल्या घरांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
आसाम पाठोपाठ गुजरात मध्येही सुरु असलेल्या मुसळधार पावसानं
जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोरबी, राजकोट, सुरेंद्रनगर आणि बनासकांठा जिल्ह्यांना पावसाचा
फटका बसला असून, पूरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल या परिसरात
बचाव कार्य करत आहे. राज्यात पुढच्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
****
व्यापाऱ्यांना वस्तू आणि सेवा कर - जीएसटीअंतर्गत या महिन्याच्या
३० तारखेपर्यंत नोंदणी करणं आवश्यक असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. वीस लाख रुपयांपेक्षा
कमी उलाढाल असणाऱ्या किंवा ज्यांच्या उत्पादित केलेल्या वस्तू जीएसटीअंतर्गत येत नाहीत,
अशांना नोंदणी करणं बंधनकारक नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या व्यापाऱ्यांचं
उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी वीस लाख रुपयांपेक्षा जास्त झालं,तर त्यालाही
त्यानंतर महिनाभराच्या मुदतीत जीएसटीत नोंदणी करावी लागेल.
****
देशाचा रेल्वे विभाग परिवर्तनातून जात असल्याचं रेल्वेमंत्री
सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या पाच
वर्षात रेल्वेत पूर्ण परिवर्तन होणार असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे मंत्रालय
अनेक बदल करणार असल्याचं ते म्हणाले.
****
भूमी अभिलेखांसंबंधी कागदपत्रांचं संगणकीकरण केल्यानं जमिनीबाबतचे
वाद कमी होतील असं प्रतिपादन मुख्य माहिती आयुक्त राधाकृष्ण माथूर यांनी केलं आहे.
दिल्ली इथं काल आयोजित भूमी अभिलेख आणि माहितीचा कायदा या विषयावरील परिषदेत ते बोलत
होते. माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत बहुतांश विचारणा ही जमिनीसंबंधीत प्रकरणांचीच
होत असल्यानं राज्य सरकारांनी जमिनीबाबतचे दस्तावेज व्यवस्थित राखणं आवश्यक असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
स्वयंपाक तयार करण्यासाठी गरीबांना स्वच्छ इंधन देण्याच्या
उद्देश्यानं सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचं अर्ध उद्दीष्ट पार
झाल्याबद्दल काल कोलकाता इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी यांनी या योजनेअंतर्गत काल अडीच कोटी गॅस जोडणीचं वितरण केलं. या योजनेअंतर्गत
तीन वर्षात पाच कोटी स्वयंपाकाची गॅस जोडणी देण्याचं उद्दिष्ट आहे.
****
राज्यात नव्यानं होणाऱ्या नियोजित मुक्त शाळांमध्ये कृषी
विषयक अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत असल्यामुळे
सरकारनं हा निर्णय घेतला आहे. कृषिविषयक आणि पशुपालन असे विविध विषय अभ्यासक्रमात ठेवण्यात
येणार असून, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही
हे विषय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेशासाठी पाचवी
उत्तीर्ण असा निकष ठेवण्यात येणार आहे.
****
मराठी चित्रपट जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
आणि चित्रपटांची पायरसी थांबवण्याच्या दृष्टीनं काही कायदेशीर पावलं उचलण्याबाबत राज्य
सरकार सहकार्य करेल, असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे.
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मुंबई इथं मराठी चित्रपट
निर्मात्यांना अनुदान प्रदान करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. तावडे यांनी चित्रपट
निर्मात्यांच्या समस्या यावेळी जाणून घेतल्या.
****
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेकडून सुरु करण्यात आलेलं
आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं कृषी विभागाच्या
सहसंचालकांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment