Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** संसदेचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन; आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
**
महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या मासिक
मानधनात वाढ
** औरंगाबाद इथं रिमोटच्या मदतीनं
वीज
चोरी करणाऱ्या सात जणांना अटक; वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांविरूद्धही कारवाई
आणि
**
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडवर विजय मिळवत भारत उपांत्य फेरीत
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन
उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा
महाजन यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. सभागृहातलं
कामकाज सुरळीत
व्हावं, यासाठी महाजन यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहेत.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे
राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी काल मुंबईत राज्यातले खासदार तसंच आमदारांशी
संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून पाठिंबा
दिल्याबद्दल, कोविंद यांनी त्यांचे आभार मानले.
****
राज्यातल्या
महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा शासन
निर्णय काल जारी करण्यात आला. या निर्णयानुसार मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांना पंचवीस
हजार रुपये, तर अन्य अ वर्ग महानगरपालिकेच्या नगरसेवकांना वीस हजार, ब वर्ग महानगरपालिकेच्या
सदस्यांना पंधरा हजार तर क आणि ड वर्ग महानगरपालिकेच्या नगरसेवकांना दहा हजार रुपये
मानधन मिळणार आहे. दूरध्वनी, लेखनसामुग्री आणि टपाल यासंदर्भातला खर्च आणि महागाई विचारात घेऊन ही वाढ करण्यात आली असल्याचं
या निर्णयात म्हटलं आहे.
****
शिवसेनेचा समृध्दी महामार्गाला
विरोध नाही, परंतू शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये या भूमिकेवर ठाम असल्याचं, शिवसेना
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे म्हणूनच शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढे जात आहेत, शेतकऱ्यांची
संमती असेल
तरच खरेदी खत होत आहे असंही ठाकरे म्हणाले.
****
राज्यातल्या एक हजार उपसा जलसिंचन योजना सोलर पार्कच्या
माध्यमातून सौर ऊर्जेवर आणण्यासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री
पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं राज्यातल्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विविध
उपक्रमांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांनी आढावा घेतला, त्यावेळी
ते बोलत होते. या संदर्भातला प्रकल्प अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी महावितरण
आणि ऊर्जा विभागाच्या ई ई एस एल या कंपनीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करारही यावेळी करण्यात
आला.
****
सुलभ पीक कर्ज अभियानाद्वारे राज्यभरात सोळा जिल्ह्यातल्या ४४ हजार ७९० शेतकऱ्यांना
३२० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलं आहे. सहकार मंत्री
सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली,
जालना, बीड, उस्मानाबाद,
आणि नांदेड यासह सोळा जिल्ह्यांमध्ये या अभियानांतर्गत एक हजार ६५१ मेळावे घेऊन,
कर्जवितरण करण्यात आलं. सहा जूनपासून सुरू झालेलं हे अभियान ३१ जुलैपर्यत
गावपातळीवर राबवलं जाणार होतं. मात्र शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता, हे अभियान ३१
ऑगस्टपर्यंत राबवणार असल्याचं, सहकार मंत्री देशमुख यांनी सांगितलं.
****
राज्य
सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसनं केली
आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काल पक्षाकार्यकर्ता मेळावा झाला. माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी यावेळी शिवसेना आणि भाजपमधला वाद म्हणजे एक नाटक असल्याचं सांगितलं.
गोरक्षकांमुळे अल्पसंख्यांक समाजामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं प्रदेशाध्यक्ष
सुनील तटकरे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं वीज चोरी करणारं उपकरण बनवणाऱ्या टोळीतल्या सदस्यांसह सात जणांना
अटक तर अन्य पंधरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांविरोधात
गुन्हा नोंदवण्यात आला आहे. किशोर राईकवार असं या प्रकरणातील मुख्य आरोपीचं
नाव आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव आणि महावितरण सहव्यवस्थापकीय
संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी काल पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. याप्रकरणात
थेट मीटरमध्ये फेरफार न करता चिनी बनावटीच्या रिमोट कंट्रोलद्वारे मीटर नोंद गती कमी
करण्यात येत होती. आरोपीनं आपल्या घरातच हे उपकरण बनवण्याचा कारखाना सुरु केला होता
तसंच गेल्या २०१० सालापासून याची विक्री सुरु होती अशी माहिती समोर आली आहे.
****
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल
भारतानं न्यूझीलंडवर १८६ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. न्युझीलंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला,
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघानं, कर्णधार मिताली राजची शतकी खेळी आणि वेदा कृष्णमूर्तीच्या
सत्तर धावांच्या जोरावर ५० षटकांत सात बाद २६६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला न्युझीलंडचा संघ, सव्वीसाव्या षटकात एकोणऐंशी
धावांवर सर्वबाद झाला. पंधरा धावा देत पाच बळी घेणाऱ्या राजेश्वरी गायकवाड हिची कामगिरी उल्लेखनिय ठरली. कर्णधार मिताली राजनं सामनावीर पुरस्कार पटकावला. येत्या गुरुवारी, उपांत्यफेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना
होणार आहे.
****
परभणी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनं गेल्या वर्षी
डिसेंबर महिन्यात, पालिकेच्या मालकीचे गाळे आणि ओट्यांचे भाडे तसंच अनामत रक्कम या
विषयी पारित केलेला ठराव महानगरपालिका अधिनियमात बसत नसून तो महापालिकेस अहितकारक असल्याचं
कारण सांगत राज्य शासनानं रद्द केला आहे. महानगरपालिकेच्या मालकीचे गाळे आणि ओटे हे
भाडे तसंच बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावर व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या गाळे आणि ओट्याची करारनाम्याची मुदत संपली असून कराराचं नूतनीकरण करण्यात आलेलं
नाही. ज्यावेळी हे गाळे आणि ओटे वाटप करण्यात आले, त्यावेळी नगरपालिकेने ते नियमाप्रमाणे
केले नसल्याचं सांगून या सर्व गाळ्यांच्या
भाड्याचं आणि अनामत रकमेचं मूल्यांकन करून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २ डिसेंबर २०१६
रोजी ठराव घेण्यात आला. या ठरावात रेडी रेकनरच्या ३५ टक्के रक्कम भाडे आणि अनामत म्हणून
आकारण्याचा तसंच दरवर्षी दहा टक्के दरानं यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र हा ठराव नियमानुसार नसल्याचं सांगत आयुक्तांनी तो शासनाकडे पाठवून विखंडित करण्याची
शिफारस केली होती.
****
अल्पसंख्याक मंत्रालयातले उपसचिव एस.सी.तडवी यांनी राज्य
वक्फ मंडळाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. तत्कालीन मुख्य
कार्यकारी अधिकारी ए.आर.कुरेशी यांची अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे
हे पद रिक्त होतं. या निवडीस औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आल्यामुळे पुढील आदेश
येईपर्यंत पदभार स्वीकारू नये, असे आदेश खंडपीठानं दिले होते.
****
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यानं,
गोदावरी आणि तिच्या उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून काल
रात्रीही सुमारे २२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून, जायकवाडी
धरणात ३० हजार १६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या
पाणी पातळीत कालच्या तुलनेत सुमारे एका टक्क्यानं वाढ झाली असून, धरणात सध्या ३९६ दशलक्ष
घनमीटर एवढा पाणी साठा असून, तो एकूण साठवण क्षमतेच्या १८ पूर्णांक २५ टक्के एवढा आहे.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तसंच परभणी इथं काल रात्री पावसाची रिमझिम
सुरू होती, मात्र नांदेड इथं दुपारच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याचं, आमच्या
वार्ताहरांनी कळवलं आहे.
औरंगाबाद शहर परिसरातही काल दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
****
बीड जिल्ह्यात आतापर्यंत खरीपाची ९७ टक्के क्षेत्रावर
पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरीपाचं साडे सहा लाख हेक्टर एवढं क्षेत्र असून तूर,उडीद,
मूग आणि कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून
पाऊस गायब झाल्यानं शेतकरी पावसाची वाट पाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं क्ळवलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या भाटेपुरी इथल्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार
केल्याप्रकरणी आरोपीला सात वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा
आणि सत्र न्यायालयान काल सुनावली. गेल्या वर्षी ही घटना घडली होती.
****
No comments:
Post a Comment