Monday, 3 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.07.2017 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      कर्जमाफी योजनेच्या निकषांचा फेरविचार करण्याचे सहकार मंत्र्यांचे संकेत तर संपूर्ण कर्जमाफीची मागणी विधीमंडअधिवेशनात लावून धरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार

·      राज्यातल्या दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं मानधन, आजपासून थेट बँक खात्यात जमा होणार

·      ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं निधन

आणि

·      महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ९५ धावांनी विजय, मात्र वेस्ट इंडिजविरूद्धच्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ११ धावांनी पराभव

****

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निकषांवर राज्य सरकार फेरविचार करणार असल्याचे संकेत सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. काल सोलापुरात राज्य शिखर बँकेच्या ४८ व्या शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. कर्जमाफी योजनेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती वर्तवली जात आहे, या पार्श्वभूमीवर योजनेचे निकष शिथील करण्याची मागणी केली जात आहे, या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री विविध गटांसोबत चर्चा करत असून, चर्चेअंती निकषात बदल होण्याची शक्यता देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

****

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मागणी लावून धरणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी कर्जमाफी हे शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याचं श्रेय आहे, असं ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत पक्षाला सत्तेपासून दूर ठेवत जनतेनं आत्मपरीक्षणाची संधी दिली, मात्र आगामी निवडणुकीसाठी पक्षानं आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचं, पवार म्हणाले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते, शिवसेना सत्तेला चिकटून असेपर्यंत राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाण्यास केव्हाही तयार असल्याचं, तटकरे म्हणाले.

****

रेल्वे विभाग लवकरच स्वस्त दरात वातानुकुलित प्रवास सेवा उपलब्ध करून देणार असल्याचं रेल्वे विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. पूर्णपणे वातानुकुलीत असलेल्या या रेल्वेत तृतीय श्रेणीचे वातानुकुलीत डबे असतील, मात्र या रेल्वेचं प्रवास भाडं सध्याच्या वातानुकुलीत तृतीय श्रेणीपेक्षा कमी असेल. या डब्यांना स्वयंचलित दरवाजे असतील. या गाडीचं तापमान २४ ते २५ अंश सेल्सियस दरम्यान असेल, असं या अधिकाऱ्यांनं म्हटलं आहे.

****

देशातले रस्ते अधिक अधिक बळकट करण्यासाठी जीओसिंथटीक अर्थात पॉलिमरच्या सहाय्यानं बनवलेलं कापड, जाळी किंवा इतर तत्सम वस्तूंचा वापर केला जाऊ शकतो, यादृष्टीने या पदार्थांचा वापर करुन रस्ते बनवण्यासाठी खाजगी कंपन्यांनी पुढे यावं, असं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं एका चर्चासत्रात बोलत होते. केंद्र सरकारनं एकात्मिक पूल व्यवस्थापन प्रणाली सुरु केली असून या अंतर्गत देशातले पूल तसंच नाले यावर होणाऱ्या दुर्घटनांबाबतच्या नोंदी ठेवल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुलांच्या सद्यस्थितीबाबत नोंदी अद्ययावत केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

राज्यातल्या दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मासिक मानधन, आजपासून थेट बँक खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत मंत्रालयात, या योजनेचा शुभारंभ होणार आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत, सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे दोन लाख कर्मचाऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट मानधन जमा करणारा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हा देशातला पहिला विभाग आहे.

****

ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. इंग्रजीचे प्राध्यापक असलेले तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनार, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, या नाटकांसह ज्योतिबाचा नवस, सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई, आपली माणसं, आत्मविश्वास, शाब्बास सूनबाई, आदी चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या.

‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांच्या नाटकाचे ५००० प्रयोग झाले होते. ‘तिसरी घंटा’ आणि ‘उत्तरमामायण’ या आत्मकथनांसह तोरडमल यांची २० पुस्तकं, अगाथा ख्रिस्ती यांच्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद, तसंच र.धों.कर्वे यांच्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर, प्रसिद्ध आहे.

तोरडमल यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी समृद्ध करणारं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपण गमावलं, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली, तर रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतला आधारवड हरपल्याची प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

क्रिकेट

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ९५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ५० षटकांत ९ बाद १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला पाकिस्तानचा संघ ३९ व्या षटकात अवघ्या ७४ धावा करून सर्वबाद झाला. भारताच्या एकता बिष्ट हिने पाच तर मानसी जोशीने दोन बळी घेतले. पाकिस्तान विरुद्ध भारतीय महिला संघाचा हा सलग दहावा विजय असून, या विजयामुळे भारतानं विश्वचषक स्पर्धेत ६ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

भारत - वेस्ट इंडीज एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल वेस्ट इंडीजमध्ये अँटिग्वा इथं झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजनं भारतावर ११ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडीज संघानं ५० षटकांत ९ बाद १८९ धावा केल्या, भारतीय संघ दोन चेंडू बाकी असताना, १७८ धावांवर सर्वबाद झाला. मालिकेत भारत दोन एकनं आघाडीवर असून, मालिकेतला अखेरचा सामना सहा जुलै रोजी जमैका इथं होणार आहे.

****

मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात काल चांगला पाऊस झाला. मात्र काही भागात आणखी पावसाची प्रतिक्षा कायम आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास औरंगाबाद शहर आणि परिसरात पाऊस पडला. हिंगोली जिल्ह्यातही नरसी नामदेव, बळसोंड, बासंबा आणि सेनगाव तालुक्यातल्या काही गावांमध्ये पाऊस झाला. नांदेड शहर आणि परीसरातही काल पावसाच्या सरी कोसळल्या.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथांच्या पालख्यांसह बहुतांश लहान मोठ्या दिंड्या काल पंढरपूर नजीक वाखरी इथं एकत्र आल्या असून, त्या ठिकाणी पालख्यांचा भव्य रिंगण सोहळा पार पडला. आज या सर्व पालख्या वाखरीहून पंढरपूरकडे प्रस्थान करतील.

दरम्यान, आषाढी एकादशीसाठी पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत आहेत.

काल भाविकांच्या एका राहुटीवर संरक्षक भिंत कोसळून परभणी जिल्ह्यातल्या एका वारकऱ्याचा मृत्यू झाला, तर जिंतूरच्या दोन वारकरी महिला जखमी झाल्या. 

आषाढी एकादशीच्या निमित्तानं, “पर्यावरणाची वारी - पंढरीच्या दारी” या आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण दिंडीचा आज पंढरपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

आषाढी एकादशीसाठी राज्य महामार्ग परिवहन महामंडळ - एस टी नं तीन हजार ६८७ जादा बस सोडल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी गट आरक्षण, आगाऊ आरक्षण तसंच प्रत्यक्ष बस स्थानकावर थेट तिकिटाची सुविधा दिली आहे.

****

लातूर इथल्या श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीनं साडेसातशे वारकरी काल आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाले. प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत आषाढीवारी उपक्रमाचं हे सतरावं वर्ष आहे. १५ बसेसच्या माध्यमातून या भाविकांनी काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं.

****

वृक्षारोपण अभियानांतर्गत काल औरंगाबाद इथं नगरनाका परिसरात खासदार चंद्रकांत खैरे आणि विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. या वृक्षारोपण सप्ताहात औरंगाबाद जिल्ह्यासाठी बारा लाख दोन हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट असून, पहिल्या दोन दिवसांत दोन लाख तेरा हजार झाडं लावण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यात पहिल्या दोन दिवसात दोन लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. या सप्ताहात हिंगोली जिल्ह्याला सात लाख झाडं लावण्याचं उद्दीष्ट देण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबानं शौचालय बांधून त्याचा वापर करावा असं आवाहन, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. माजलगाव तालुक्यातल्या पवारवाडी इथं देवकृपा उद्योग समूहाच्यावतीनं उभारण्यात आलेल्या ३० स्वच्छतागृहाचं लोकार्पण मुंडे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

****

प्रस्तावित नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्याकरता, राज्य सरकारनं जारी केलेलं दरपत्रक तसंच शेतकरी कर्जमाफीच्या शासननिर्णयाची काल औरंगाबाद जिल्ह्यात गोळवाडी इथं होळी करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनांनतर, येत्या २४ ते २६ जुलै दरम्यान देशभरात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...