Monday, 17 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 17.07.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 17 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

जम्मू काश्मीर मधल्या पूंछ जिल्ह्यात बालाकोट इथं पाकिस्तानकडून आज घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला, तर एका स्थानिक मुलीचा मृत्यू झाला. पाकिस्ताननं घुसखोरी करत लष्करी चौक्या आणि रहिवासी भागांना लक्ष्य केलं.

****

भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांमध्ये आज शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत चर्चा झाली. जम्मू काश्मीरच्या सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडून दोन्ही सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचं म्हटलं जातं. भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या गोळीबारात चार पाकिस्तानी जवान ठार झाल्याचा आरोप पाकिस्तानचे लष्करी कारवायांचे महासंचालक मेजर जनरल साहीर शमशाद मिर्जा यांनी केला. यावर बोलताना, प्रत्येक शस्त्रसंधी उल्लंघन हे पाकिस्तानी सैन्याकडूनच केलं जातं, भारतीय जवान फक्त त्याला प्रत्युत्तर देतात, असं भारताचे लष्करी कारवायांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए के भट यांनी सांगितलं.

****

राज्य विधानसभेत आज सर्व आमदार आणि काही खासदरांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे आदी सदस्यांनी मतदान केलं. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही मतदान केलं. मतदानासाठी त्यांना तुरुंगातून एका तासाची सुट्टी देण्यात आली होती. देशातल्या सर्व राज्य विधानसभांमध्येही राष्ट्रपती पदासाठी मतदान झालं. मतमोजणी २० जुलैला होणार आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं हैदराबाद - नांदेड - जयपूर या विशेष रेल्वेगाडीच्या २२ फेऱ्या वाढवल्या आहेत. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान ही गाडी धावणार आहे. ही गाडी हैदराबाद इथून दर शुक्रवारी संध्याकाळी चार वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि नांदेडला मध्यरात्री बारा वाजून दहा निमिटांनी पोहोचेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, अकोल्यामार्गे रविवारी सकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी ही गाडी जयपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी दुपारी तीन वाजता जयपूरहून सुटेल आणि अकोला, नांदेड मार्गे मंगळवारी सकाळी दोन वाजता हैदराबादला पोहोचेल.

दरम्यान, ओडीशातल्या संबलपूरजवळ मुसळधार पावसानं रेल्वे पटरी वाहून गेल्यानं संबलपूर ते नांदेड ही गाडी रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे उद्या नांदेडहून सुटणारी नांदेड संबलपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या काही जिल्ह्यात पावसानं आज थोडी उसंत घेतलेली असली तरी मुंबई, ठाणे, नाशिक, सातारा, पालघर जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. यवतमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव तालुक्यात शेतात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. नाशिक मध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणात पाच वर्षातला सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणात २६ हजार ९९५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. जायकवाडी धरणात सध्या २१ पूर्णांक ३७ टक्के इतका पाणीसाठा असून, सहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.

नांदूर मधमेश्वर मधूनही जायकवाडीत पाणी सोडण्यात आलं आहे.

****

लातूर शहर अतिक्रमणमुक्त करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याला प्राधान्य दिलं असून, त्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती लातूरचे महापौर सुरेश पवार आणि उपमहापौर देविदास काळे यांनी केली आहे. ते आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाणी वितरण व्यवस्था चांगली करण्यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचं महापौर पवार यांनी सांगितलं.  

****

आषाढी एकादशीनंतर पंढरपूर इथून शेगावकडे परतणारी संत श्री गजानन महाराज यांची पालखी बीड शहरात दाखल झाली. शहरात पालखीचं भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आज पालखी जालन्याकडे मार्गस्थ झाली.

****

नांदेड इथं आज महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महिलांच्या समस्यांचं निराकरण, त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा क्षतिसहाय्य आणि पुनर्वसन मंडळाची बैठकही आज घेण्यात आली. यावेळी पिडीत महिला आणि बालकांना अनुदान मंजूर करण्यात आलं.

****

चिनी वस्तू विक्रीवर बंदी घालावी यासाठी अहमदनगर इथल्या पुणे बस स्थानकाजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं चिनी मोबाइल कंपन्यांच्या जाहिरातींचे फलक काढून आंदोलन करण्यात आलं. भारतातल्या ग्राहकांनी चिनी वस्तूवर बहिष्कार घालावा आणि सरकारनं चिनी वस्तूवर बंदी घालावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला अहमदनगर मोबाइल असोसिएशननंही पाठिंबा दिला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...