Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 15 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
अनिवासी भारतीयांना भारतात टपालाद्वारे किवा ई बॅलेट पद्धतीनं
मतदान करायला परवानगी देण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याच्या निर्णयाबाबत माहिती
द्यावी, असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. अनिवासी भारतीयांनी
अशा प्रकारे मतदान करण्याला मंजुरी देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकार तसंच निवडणूक
आयोगानही संमती दर्शवली आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये अशा प्रकारचं मतदान होत असल्याचं
याबाबतच्या याचिकेत म्हटलं आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी २१ जुलैला होणार आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीला दहशतवादी आणि बाहेरील
शक्ती जबाबदार असल्याचं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं
आहे. त्या नवी दिल्लीमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी
बोलत होत्या. अशा परिस्थितीत चीननं देखील राज्यात हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली असल्याचंही
त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहानं पाकिस्तानला संरक्षणविषयक आर्थिक मदत
करण्याच्या अटी अधिक तीव्र करण्यासाठी तीन नवीन सुधारणा विधेयकं पारित केली आहेत. राष्ट्रीय
सुरक्षा अधिकृतता कायदा, २०१८ या नावानं हे विधेयक आवाजी मतदानानं पारित करण्यात आलं.
या विधेयकांनूसार पाकिस्तानला संरक्षणविषयक आर्थिक मदत मिळवण्यासाठी पाकिस्तानमधून
जाणाऱ्या दळणवळणाच्या तारांची सुरक्षा, दहशतवादाचा पाडाव करण्यासाठी ठळक उपाययोजना,
सीमेवरील दहशतवादी हल्ले उधळून लावणे आणि स्फोटकांचा नायनाट करणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहानं भारताला अत्याधुनिक संरक्षण
सहकार्यासाठीही नवं विधेयक पारित केलं आहे. या अंतर्गत सुरक्षेविषयीचे सामूहिक आव्हानं,
भारत-अमेरिका संबंधांमध्ये अमेरिकन मित्र राष्ट्रांची भूमिका आणि सुरक्षेविषयीचं तंत्रज्ञान
आणि व्यापारविषयक धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या एक हजार उपसा जलसिंचन योजना सोलर पार्कच्या
माध्यमातून सौर ऊर्जेवर आणण्यासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री
पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं राज्यातल्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विविध
उपक्रमांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांनी आढावा घेतला, त्यावेळी
ते बोलत होते. या संदर्भातला प्रकल्प अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी महावितरण
आणि ऊर्जा विभागाच्या ईईएसएल या कंपनीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करारही यावेळी करण्यात
आला.
****
अल्पसंख्याक मंत्रालयातले उपसचिव एस.सी.तडवी यांनी राज्य
वक्फ मंडळाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. तत्कालीन मुख्य
कार्यकारी अधिकारी ए.आर.कुरेशी यांची अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे
हे पद रिक्त होतं. या निवडीस औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आल्यामुळे पुढील आदेश
येईपर्यंत पदभार स्वीकारू नये, असे आदेश खंडपीठानं दिले होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रावर २९ आरोग्य अधिकाऱ्यांची पदं अद्यापही
रिक्तच आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत १०९ आरोग्य अधिकाऱ्यांची पदं मंजूर
आहेत, परंतु सध्या त्यापैकी केवळ ८२ आरोग्य अधिकारीच प्रत्यक्ष कार्यरत आहेत. राज्य
शासनानं आरोग्य विभागातले रिक्त पदं भरण्यास स्थानिक पातळीवर परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या
अध्यतेखाली जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर काही सदस्यांच्या
समितीला शासनानं हे अधिकार देऊ केले आहेत. परंतू पद भरतीसाठी आवश्यक असलेली बिंदूनामावलीच
जिल्हा परिषदेला दिलेली नसल्यामुळे भरतीत अडथळा निर्माण झाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
नांदेड आणि परभणी इथल्या चारशेहून अधिक निवृत्तीवेतनधारकांनी
आज औरंगाबादच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढला. निवृत्तीवेतनात साडेसहा
हजारांची वाढ, महागाई भत्ता मिळण्यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता
अभियानाअंतर्गत आज जिल्ह्यातल्या एक हजार ९३ शाळांनी गावांमध्ये स्वच्छता जनजागृती
फेरी काढली. उघड्यावर शौचापासून परावृत्त करण्याच्या उद्देशानं काढलेल्या या फेरीत
शौचालय बांधण्याचं आवाहन करण्यात आलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका वगळता इतर तालुक्यात
पावसाचा प्रमाण अत्यल्प असून अकोले तालुक्यात पावसाचे पुनरागमन झालं आहे. भंडारदरा
धरण ५६ टक्के भरलं असून, धरणातून ८५१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु
आहे.
****
No comments:
Post a Comment