Tuesday, 1 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 01.08.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०१ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

घरगुती वापराचा अनुदानित गॅस -एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याला ४ रुपयांची वाढ होणार आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत गॅस सिलिंडरवरचं अनुदान पूर्णपणे रद्द करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं, सांगण्यात आलं आहे.

****

पिक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी राज्य सरकारनं, पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बैठकीनंतर काल रात्री उशीरा, पिक विमा योजनेचे हप्ता भरण्यासाठी ५ तारखेपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

****

अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबाबात लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त विभागासोबत बैठक घेणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. त्या काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बोलत होत्या. यासंदर्भात वित्त विभागाला जून महिन्यात प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गातल्या रुंदीकरणास अडसर ठरणाऱ्या कन्नड इथल्या औट्रम घाटात बोगदा तयार करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यासाठी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी वनविभाग, राष्ट्रीय महामार्ग तसंच रेल्वे सर्वेक्षण विभागाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी घाटाची पाहणीही केली. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही हे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती खैरे यांनी यावेळी दिली.

****

जायकवाडी धरणातला पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आज सकाळी आठ वाजता धरणातला जिवंत पाणी साठा एक हजार ७४ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला असून, एकूण पाणीसाठा एक हजार आठशे बारा दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचला आहे. हे प्रमाण एकूण साठवण क्षमतेच्या साडे ४९ टक्के एवढं आहे. जायकवाडी धरणात सध्या सोळा हजार सातशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

****




No comments: