Sunday, 27 August 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 27.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

कोणत्याही प्रकारच्या श्रद्धेच्या नावावर देशात हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते आज बोलत होते. या मालिकेचा आज ३५वा भाग प्रसारित झाला. एकीकडे देशात सण उत्सवांचं वातावरण आहे, तर दुसरीकडे हिंसेच्या घटना घडत असल्यामुळे चिंता निर्माण होणं स्वाभाविक असल्याचं ते म्हणाले. जे कोणी कायदा हातात घेतील, त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

      देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह असून, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १२५ वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली असल्याचं नमूद करत, पंतप्रधानांनी, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाच्या गणोशोत्सवात पर्यावरणपूरक - इको फ्रेंडली गणपतीचं प्रमाण वाढलं असून, ही एक सकारात्मक बाब असल्याचं ते म्हणाले.  

      जैन समाजातला पर्युषण पर्व, केरळमधला ओणम सण, आगामी ईद - उल - जुहा, नवरात्र या सणांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, हे सगळे सण सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतिक असल्याचं सांगितलं.

      या सर्व सणांबरोबर स्वच्छतेलाही तेवढंच महत्व असून, स्वच्छता हा सणांचा अविभाज्य भाग बनला पाहिजे, असं ते म्हणाले.

      प्रधानमंत्री जनधन योजनेला उद्या तीन वर्ष पूर्ण होत असून, ही योजना जगभरातल्या अर्थतज्ञांमध्ये चर्चेचा विषय बनली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशभरातल्या ३० कोटी नवीन कुटुंबांना या योजनेशी जोडण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

      मन की बात या कार्यक्रमात लाखो लोक त्यांचे विचार, सूचना मांडतात, त्याबद्दल पंतप्रधानांनी नागरिकांचे आभार मानले.

****

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला विशेष सीबीआय न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर उद्ववलेलं हिंसक वातावरण आता निवळलं असल्याचं हरियाणाचे पोलिस प्रमुख बी एस संधू यांनी सांगितलं. डेरा सच्चा सौदाचे राज्यातले ३० हून अधिक केंद्र बंद करण्यात आल्याचं ते म्हणाले. लैंगिक शोषणप्रकरणी दोषी आढळल्यानंतर उद्या गुरमित राम रहीमला शिक्षा सुनावण्यात येणार असून, पुन्हा हिंसा भडकू नये, म्हणून सीबीआय न्यायाधिशच तुरुंगात जाऊन त्याला शिक्षा सुनावणार असल्याचंही संधू यांनी सांगितलं.

****

बिहारमधल्या अररिया, किशनजंग, कटिहार आणि पूर्णिया जिल्ह्यात पूर परिस्थितीत सुधारणा होत आहे.  पुराशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या ४४२ झाली आहे. मुजफ्फरपूर आणि समस्तीपूर जिल्ह्यात अद्यापही पूर परिस्थिती गंभीर असून, एक कोटी ७० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांना तीन मनुष्यबॉम्बला निष्क्रीय करण्यात यश आलं आहे. या तिघांपैकी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. काल पहाटे दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, त्याला सुरक्षा जवानांनीही प्रत्युत्तर दिलं. मात्र, या हल्ल्यात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आठ जवान शहीद झाले.

****

म्यानमारमधल्या रखीन राज्यात नव्यानं दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या हिंसाचारबाबत भारतानं चिंता व्यक्त केली आहे. तसंच भारतानं म्यानमारला या हिंसाचाराचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्यानमारमधल्या या हिंसाचारामुळं सुरक्षा रक्षकांचे बळी गेल्यामुळे भारताला दु:ख झालं असल्याचं म्हटलं आहे. रोहिंग्या दहशतवाद्यांनी म्यानमारच्या सुरक्षा रक्षकांवर काल हल्ला केल्यामुळे म्यानमारमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे.

****

पालघर जिल्ह्यातल्या डहाणूमध्ये मेफेड्रोन या अंमली पदार्थाचं उत्पादन करत असताना चार जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संबंधित विभागानं या फॅक्टरीवर छापा टाकून सुमारे अठरा लाख रुपयांचा पक्का माल तर ४१ लाख रुपयांचा कच्चा माल जप्त केला.

****

स्कॉटलंड मधल्या ग्लासगो इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूचा आज महिला एकेरीचा अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामन्यात सिंधुसमोर जपानच्या नोझोमी ओकुहाराचं आव्हान असेल. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधुनं चीनच्या चेन युफेईचा २१-१३, २१-१० असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

दरम्यान, उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहाराविरुद्ध झालेल्या सामन्यात सायना नेहवालचा १२-२१, २१-१७, २१-१० असा पराभव झाला. त्यामुळे आता सायनाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागेल.

****

भारत-श्रीलंकेदरम्यानच्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज खेळला जाणार आहे. श्रीलंकेतल्या पलैकेले इथं दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याचं थेट धावतं वर्णन आकाशवाणीवरुन प्रसारित होणार आहे. मालिकेत भारत दोन शून्यनं आघाडीवर आहे.

****


No comments: