Tuesday, 29 August 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.08.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 29 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात विविध क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय हॉकी संघाचे कर्णधार सरदार सिंह तसंच रियो पॅरालिंपिकमध्ये भाला फेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारे देवेंद्र झांझरिया यांना देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच विविध क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट कामगिरीकरता १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार देवून गौरवण्यात आलं.

****

क्रीडा पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत पुढील वर्षापासून बदल केला जाईल असं केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीतल्या ध्यानचंद मैदानावर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आगामी वर्षापासून क्रीडा पुरस्कार निवडीसाठी एका समितीची स्थापना करण्याचा सरकार विचार करीत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

ग्राहकांना रास्त दरात कांदा उपलब्ध व्हावा या हेतूनं कांद्याचे दर कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याचा विचार सरकार करत आहे. रास्त दरात पुरेसा कांदा उपलब्ध होईल या दृष्टीनं उपाय योजना करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिल्या आहेत. केंद्रीय नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याच्या उत्पादन आणि पुरवठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात साखरेच्या किंमती वाढू नयेत म्हणून साखर कारखान्यांना पहिल्या दोन महिन्यांसाठी साठवण क्षमता निश्चित करून देण्यात आली असल्याचं पासवान यांनी सांगितलं.

****

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस अपघातानंतर या मार्गावरची रेल्वे वाहतुक सुरळीत होण्यासाठी किमान एका दिवसाचा अवधी लागेल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार रेल्वे प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीवर नजर ठेऊन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आसनगाव आणि वासिंद स्थानकांच्या दरम्यान मोठा पाऊस झाल्यानं रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने आपत्कालीन ब्रेक लावले. त्यामुळे डबे रुळावरून घसरले, मात्र मोठा अपघात टळला, असं सांगितलं जात आहे. या अपघातामुळे या मार्गावरच्या अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.

****

मुंबई आणि ठाण्यात आज मुसळधार पाऊस झाला. काल रात्रीपासून पावसानं जोर धरला असल्यानं, अनेक सखल भागात पाणी साचलं. उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाली, दृश्यमानता कमी असल्यानं, विमानसेवेवरही याचा परिणाम झाला. रस्त्यावरही अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं, वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन, आवश्यक ते निर्देश दिले.

मराठवाड्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. परभणी जिल्ह्यात आजही जोरदार पाऊस झाला, लातूर जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उस्मानाबाद इथंही मोठा पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

या पावसामुळे जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

****

अवयवदानात महाराष्ट्रानं देशात सहाव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत या अनुषंगानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अवयव दानासंदर्भात जागृती व्हावी आणि अवयव दान मोहिमेत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, असं त्यांनी सांगितल.

****

वैद्यकीय संचालनालय, आयुष विभाग आणि शासकीय आरोग्य विभागाच्या वतीनं नांदेड शहरात आज महाअवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या फेरीत पथनाट्याद्वारे अवयवदानाबाबत जागृती केली.

****




No comments: