आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२२ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
२०२२ पर्यंत नवभारताच्या कल्पनेला साकार करण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांनी काम
करावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भाजपशासित मुख्यमंत्र्यांच्या
बैठकीत ते बोलत होते. भाजप अध्यक्ष अमित शहा, बारा राज्यांचे मुख्यमंत्री आणि सहा उपमुख्यमंत्री
यावेळी उपस्थित होते. गरीबांसाठी असलेल्या कल्याणकरी योजनांची अंमलबजावणी आणि सरकारी
योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला.
****
शिख
धर्मातला पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबची ४१३वी जयंती आज देशभरात उत्साहात साजरी होत
आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या गुरुद्वाऱ्यांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. अमृतसर इथल्या
सुवर्ण मंदीरात आज सायंकाळी दीपमाला होणार आहे. पंजाबचे राज्यपाल व्ही पी सिंह बडनोर
आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जगभरातल्या शिख बांधवांना शुभेच्छा दिल्या
आहेत. गुरु ग्रंथ साहिबला शिख धर्मातले अकरावे गुरु मानण्यात येतं.
****
मुस्लिम समाजातल्या तिहेरी तलाक पध्दतीवर सर्वोच्च न्यायालय
आज निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं यापूर्वी
मे महिन्यात सलग सहा दिवस या प्रकरणाची सुनावणी घेतली होती.
****
बँकांचं एकत्रीकरण तसंच अन्य मागण्यांसाठी देशभरातले १०
लाख सार्वजनिक क्षेत्रातले बँक कर्मचारी आज देशव्यापी संपावर जात आहेत, याचा परीणाम
आजच्या बँक व्यवहारावर होण्याची शक्यता आहे.
****
भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारींवर तात्काळ योग्य ती कारवाई करुन, अशी प्रकरणं एका महिन्यात निकाली काढावीत, असे निर्देश
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत. विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन
समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. सात प्रकरणांमध्ये भ्रष्टाचारास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी होऊन, फौजदारी गुन्हे दाखल करणेबाबत, या प्राप्त तक्रारींवर समितीनं चर्चा करुन
कारवाई करावी, असं ते म्हणाले.
****
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात शिवसेनेच्या औरंगाबाद
शाखेच्या वतीनं आज आणि उद्या जिल्हा उपनिबंधक, अग्रणी बँक आणि विविध सुविधा केंद्रांवर
जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पत्रक जारी
करुन ही माहिती दिली. यावेळी कर्जमाफीसंदर्भात सगळी माहिती घेण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment