Sunday, 20 August 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.08.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असतानाच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कालपासून पाऊस सुरु असून, आज कोठेही सूर्यदर्शन झालं नाही. लातूर, नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, रस्ते जलमय झाले, तसंच ठिकठिकाणी घरात आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातही आज सकाळपासून काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १८३ मिलीमीटर, तर लातूर जिल्ह्यात १०४ पूर्णांक ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

****

बिहार आणि उत्तर प्रदेशात पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. बिहारमधल्या २० जिल्ह्यातल्या २३ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुराशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत २०५ नागरिकांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलातर्फे बचावकार्य सुरु असून, आतापर्यंत चार लाख ३० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बिहारमधून पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी नवी दिल्ली इथं याबाबत आढावा बैठक घेऊन मदत आणि बचाव कार्याबाबत निर्देश दिले.

****

उत्तर प्रदेशात पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस रेल्वे गाडीला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी, रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांना आजच्या आज प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आहे. परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन असून रेल्वे रुळ पूर्ववत करण्यास प्राथमिकता देत असल्याचंही प्रभू यांनी सांगितलं. प्रभू यांनी मृतांच्या नातेवाईकांना साडे तीन लाख रुपये, जे गंभीर जखमी झाले आहे त्यांना ५० हजार रुपये तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. काल सायंकाळी झालेल्या या अपघातात २३ प्रवासी ठार तर, शंभराहून अधिक जण जखमी झाले.

****

रस्त्यांवर दिवे लावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत देशभरात ५० हजार किलोमीटर रस्त्यांवर ३० हजार एल ई डी बल्ब लावण्यात आले आहेत. एल ई डी बल्बमुळे सुमारे ३९ हजार किलोवॅट तास ऊर्जेची बचत होण्यासाठी मदत होत आहे. तसंच या उपक्रमामुळे तीन पूर्णांक २९ दशांश लाख टन कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये कमी प्रमाणात सोडण्यासही मदत होत आहे.

****

२०२२ पर्यंत देशाला महाशक्ती बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्त पूर्ण करण्यासाठी समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांनी आपलं योगदान द्यावं, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. लखनऊ इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वांचं सहकार्य असेल, तर देशाला महाशक्ती बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असं ते म्हणाले.

****

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी कोणतीही जनजागृती केली नसल्यामुळे मंडळाचे सदस्य आणि सचिवांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रीय हरीत लवादाच्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चूकीचा सिद्ध झाल्यामुळे ३० सप्टेंबर २०१६ रोजी स्थगिती दिली आहे. मात्र यानंतरही कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणं सुरुच असल्यामुळे याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे शिवाजी वटकर यांनी दिला आहे. कागदाच्या लगद्याच्या मूर्तींवर त्वरीत बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

****

एसकेएफ आणि एसयुएल या खासगी कंपन्यांच्या ‘उडान’ या कार्यक्रमाअंतर्गत मराठवाड्यातल्या ४० मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातल्या पात्र मुलींना संपूर्ण आर्थिक मदत देऊन उच्च शिक्षण घेण्यास मदत करणं, हा उडान शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश आहे. या मुलींच्या आवडीचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीचा सर्व खर्च या योजनेअंतर्गत करण्यात येतो.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार असून, पहिला सामना दांबोला इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधी झालेली तीन कसोटी सामन्यांची मालिका भारतानं तीन - शून्यनं जिंकली आहे.

****

No comments: