Wednesday, 30 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 30.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

दुरांतो एक्सप्रेसच्या काल झालेल्या अपघातानंतर या मार्गावरची रेल्वेवाहतुक अद्यापही सुरळीत झालेली नाही. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं काही रेल्वे गाड्या अंशत:  तर काही गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली असून, उद्या मुंबईहून सुटणारी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. जालना - दादर जनशताब्दी एक्स्प्रेस आज दादर पर्यंत न जाता मनमाड इथूनच परतणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड ही गाडी आज तर, नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी उद्यासाठी रद्द करण्यात आली आहे.

****

काल रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानं मुंबईचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरळीत होत आहे. रस्त्यावर कालपासून बंद पडलेल्या वाहनांची गर्दी असल्यानं, रस्ते वाहतूक पूर्णतः सुरु होऊ शकलेली नाही. दरम्यान, हवामान खात्यानं आजही अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्यानं, मुंबईकरांनी आजही घराबाहेर पडू नये, असं आवाहन, राज्य सरकारनं केलं आहे.

****

उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडयात आज आणि उद्या अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला, तर  गोदावरी पात्रात अतिरिक्त पाणी सोडलं जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी पुरापासून सावधगिरी बाळगावी तसंच नदीकाठाच्या गावांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ७१ टक्के झाली असून, धरणात २६ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

****

केंद्र सरकारनं आधार कार्ड बनवण्याच्या मुदतीत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारतर्फे याबाबत स्पष्टीकरण दिलं. याप्रकरणाची सुनावणी तीन ऐवजी पाच न्यायाधीशांच्या पीठाद्वारे केली जावी अशी मागणी वेणुगोपाल यांनी केली. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आधार प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे.

****

गेल्या एक जुलैपासून लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवाकर-जीएसटीच्या माध्यमातून एका महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक महसूल जमा झाला असल्याचं अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. करसंकलनाचं पहिलं विवरण प्रसिद्ध करताना त्यांनी ही माहिती दिली. जेव्हा सर्व करदाते आयकर परतावा भरतील तेव्हा भरपाई शुल्क घटल्यानंतरही अपेक्षित लक्ष्यापेक्षा अधिक महसूल जमा होईल असं ते म्हणाले.

****

औरंगाबाद शहरालगतच्या २६ गावांच्या झालर क्षेत्र विकास योजनेची मागील अकरा वर्षांपासून मंदावलेली प्रक्रिया गतिमान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यासंबंधी दाखल याचिका मागे घेतल्यानं आता विकास आराखडा प्रसिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरालगतच्या १५ हजार २४५ हेक्टर जागेच्या विकासाला हिरवा कंदील मिळाला आहे. विकास आराखडा संपूर्णतः तयार असून केवळ खंडपीठाच्या आदेशामुळे जाहीर करण्यावर बंधन होतं.

****

अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयातील सहशिक्षक डॉ. कमलाकर कोंडिबा राऊत यांना सन २०१६ चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली इथं विज्ञान भवनात हा पुरस्कार दिला जाणार आहे. पन्नास हजार रुपये रोख,  रौप्य पदक आणि गुणवत्ता प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कमलाकर राऊत यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

****

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या प्रक्रियेअंतर्गत औरंगाबाद तालुक्यातील १४ गावांचा अंतिम मोजणी अहवाल आगामी तीन दिवसांत प्राप्त होणार असून यानंतर सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शशिकांत हतगल यांनी दिली. कर्जमाफीच्या अनुषंगानं राज्य रस्ते विकास महामंडळानं नुकत्याच जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. यात शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कर्जाची रक्कम शिल्लक ठेवत उर्वरित रक्कम संबंधितांना देत जमिनीचं संपादन करण्याचं सांगितलं आहे. यामुळे समृद्धी महामार्गाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

****

केरळ येथील प्रसिद्ध ओणम फेस्टिवल करता दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड ते एर्नाकुलम दरम्यान विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १५ डब्यांची ही विशेष गाडी नांदेड इथून परवा एक सप्टेंबरला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि काचीगुडा, रेनिगुंटा, एरोड मार्गे एर्नाकुलम इथं २ सप्टेंबरला दुपारी २ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी एर्नाकुलम इथून ४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि नांदेड इथं ६ सप्टेंबरला सकाळी साडेसहा वाजता पोहोचेल.

****

वार्षिक हज यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. यादरम्यान जगभरातून लाखो मुस्लिम बांधव सौदी अरेबियातील मक्काची यात्रा करतील. यंदा भारतातून एक लाख सत्तर हजारांवर भाविक हज यात्रेला गेले आहेत.

****
















No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...