Wednesday, 30 August 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.08.2017 17.25


आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

इतर मागासवर्गीयांच्या नॉन क्रिमीलेयर वर्गासाठीचे लाभ सार्वजनिक कंपन्या, विमा कंपन्या आणि बँकांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही लागू होणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं या निर्णयाला मान्यता दिली. वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्न असलेले अशा कंपन्या तसंच वित्तीय संस्थांमधले कर्मचारी या लाभासाठी आता पात्र असतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत लक्झरी कारवर वस्तू सेवा करांतर्गत अधिभार वाढवण्यासही मंजूरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित वार्ताहर परिषदेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. वस्तू आणि सेवाकर राज्य मोबदला विधेयक २०१७ मध्ये उपयुक्त सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे

****

काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नौशेरा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. नौशेरा भागात सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबारास सुरूवात झाली. भारतीय सैन्यानं गोळीबारास चोख प्रत्युत्तर दिलं. यंदाच्या वर्षात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होण्याचं प्रमाण वाढलं असून एक ऑगस्टपासून तब्बल २८५ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.

****

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव विजय मुलगुंद यांच्या बंगळुरू इथल्या निवासस्थानावर आज आयकर विभागानं छापे टाकले. ऊर्जा मंत्री डी.के. शिवकुमार यांचे ते निकटवर्तीय असून गुजरात राज्यसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेस खासदारांना बंगळुरू इथं थांबवण्यात त्याची प्रमुख भूमिका होती. ऊर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांच्या निवास्थानांनंतर आता मुलगुंद यांच्या निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले आहेत.

****



नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून जिल्ह्यातील तब्बल ११ धरणं १०० टक्के भरली असून सात धरणातील पाणी साठा ९० टक्क्याहून अधिक झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर ९२ टक्के, पालखेड ८५, तर दारणा धरण ९९ टक्के भरलं आहे. गेल्या महिनाभरात नाशिक जिल्ह्यात सरासरी २८१ पुर्णांक ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरणातून चार हजार घनफूट प्रतिसेकंद तर दारणा धरणातून आठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून साडे १२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाचं छत कोसळून झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानांच आज पहाटे श्रीगोंदा तालुक्यात घारगाव इथं जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्ग खोल्यांची इमारत कोसळली. दुर्घटना पहाटेच्या वेळी घडल्यानं, कोणीही जखमी झालं नाही. या शाळेच्या नवीन इमारतीचं काम तातडीनं सुरू करावं, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी दौंड-नगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं.

****

बालक आणि गरोदर मातांना आजारापासून संरक्षित करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ऑक्टोबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत ‘इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य’ ही विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितलं. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. या मोहिमेत सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असं आवाहन डोंगरे यांनी केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामं फक्त समन्वयाअभावी रखडली असून शासनानं मंजूर केलेल्या कामांना गती देऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्याची सूचना शिवसेना उपनेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनीही परवानग्यांअभावी मूलभूत कामं थांबवू नका, असे आदेश दिले आहेत.

****

ठाण्याजवळ आसनगाव ते वासिंद दरम्यान दुरांतो एक्सप्रेसच्या काल झालेल्या अपघातानंतर या मार्गावरची रेल्वेवाहतुक अद्यापही सुरळीत झालेली नाही. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं काही रेल्वे गाड्या अंशत:  तर काही गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली असून, उद्या मुंबईहून सुटणारी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. जालना - दादर जनशताब्दी एक्स्प्रेस आज दादर पर्यंत न जाता नाशिक रोडपयर्यंत धावली, तिथूनच ही गाडी परतणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड ही गाडी आज तर, नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी उद्यासाठी रद्द करण्यात आली आहे.

****

भारताचा मुष्टीयोद्धा गौरव बिधुडीनं जर्मनीतील हॅम्बर्ग इथं सुरू असलेल्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयानंतर बिधुडीनं भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे.

*****




No comments: