Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात
मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प; मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम
** दहावीच्या फेरपरीक्षेचा
निकाल जाहीर; राज्यभरातून २४ पूर्णांक ४४ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण
** नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे
नऊ डबे ठाण्याजवळ घसरले; या मार्गावरची रेल्वे वाहतुक पूर्णपणे विस्कळीत
आणि
** अवयवदानाबाबत जागृती
करण्यासाठी काल सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात
काल मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. मुंबईत काल दिवसभरात
२९८ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला, ऑगस्ट १९९७ नंतरचा एका दिवसातला पावसाचा हा उच्चांक
आहे. या पावसामुळे अनेक सखल भागांसह रेल्वे मार्गावर पाणी साचल्यानं, उपनगरी रेल्वेसेवा
विस्कळीत झाली, दृश्यमानता कमी असल्यानं, विमानसेवेवरही परिणाम झाला. रस्त्यावरही अनेक
ठिकाणी पाणी साचल्यानं, वाहतुकीची कोंडी झाली होती. विक्रोळीत दोन घरं कोसळल्यानं तीन
जणांचा मृत्यू झाला. ठाण्यातही तीन जण पाण्यात बुडाले, यापैकी दोघांचे मृतदेह सापडल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे उद्भवलेल्या
परिस्थितीचा आढावा घेऊन, आवश्यक ते निर्देश दिले. परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य
सरकार प्रयत्नशील असून, केंद्र शासनामार्फत सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिल्याची
माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नैसर्गिक आपत्ती
प्रतिसाद दलाच्या तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार तर मध्य महाराष्ट्रासह
मराठवाड्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला
आहे.
मराठवाड्यात कालही पावसाचा जोर कायम राहिला. परभणी जिल्ह्यात कालही जोरदार पाऊस
झाला, सेलू, जिंतूर तालुक्यात चांगला पाऊस झाल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या पावसामुळे सेलू पाथरी मार्गावरची वाहतुक काही काळ
ठप्प झाली होती. लातूर जिल्ह्यातही काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या
बहुतेक सर्व तालुक्यात काल दुपारनंतर पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या
63 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. उस्मानाबाद इथंही मोठा पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. या पावसानं भूजल पातळीत वाढ होत असून, जनावरांच्या
चाऱ्याचा प्रश्न सुटला असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात काल सायंकाळी
३१ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा
जोर कायम असल्यानं, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे
जायकवाडी धरणातली पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात उमरी शहराला पाणी पुरवठा
करणारा कुदळे मध्यम प्रकल्प काल पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहत होता. सिध्देश्वर
धरणातला पाणी साठा २४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या निंबोडी शाळा दुर्घटनेतल्या मृत विद्यार्थ्यांच्या
पालकांना राज्यशासनानं पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेच्या या
शाळेचं छत परवा अतिवृष्टीमुळे कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाचव्या वर्गातल्या तीन
विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत जखमी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय
उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असून, शाळेचं संरचनात्मक परीक्षण
करण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत.
****
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयातल्या ७३८ अस्थायी ब गट
वैद्यकीय अधिकाऱ्यांचं रिक्त असलेल्या नियमित पदांवर विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी
एकवेळचे समावेशन करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. सध्या आरोग्य विभागाकडे
नियमित आस्थापनेवर मंजूर एक हजार ६६ पदांपैकी चारशे ४८ पदं रिक्त आहेत.
****
राज्यातल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयासाठी
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या संबंधित कलमांमध्ये धारणेसह अध्यादेक्ष पुनर्रप्रस्थापित
करण्यासही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत राज्यभरातून २४ पूर्णांक
४४ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून सर्वाधिेक ३१ टक्के तर
कोकण विभागातून सर्वात कमी १३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद विभागातून
२७ टक्के तर लातूर विभागातून २६ पूर्णांक १० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती,
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. उत्तीर्ण
विद्यार्थ्यांना लगेचच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे काल सकाळी ठाण्याजवळ
आसनगाव ते वासिंद दरम्यान घसरले. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही,
मात्र या मार्गावरची रेल्वे वाहतुक पूर्णपणे विस्कळीत झाली. अपघातानंतर या मार्गावरून
धावणाऱ्या काही गाड्या अंशत: तर काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या. काही रेल्वेगाड्यांचे
मार्ग वळवण्यात आले. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस पुणे, दौंड मार्गे वळवण्यात आली,
नांदेड ते मुंबई तपोवन एक्स्प्रेस काल औरंगाबाद पर्यंत
तर जनशताब्दी एक्सप्रेस मनमाडपर्यंत धावली, मुंबईहून सुटणारी जनशताब्दी, नंदिग्राम
आणि देवगिरी एक्स्प्रेस रद्द काल करण्यात आल्या. मुंबईहून आज सुटणारी
तपोवन एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे,
नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस तसंच सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस काल औरंगाबाद
पर्यंतच धावल्या, देवगिरी एक्सप्रेस आज औरंगाबादहून नियमित वेळेवर सिकंदराबादकडे प्रस्थान
करेल. मुंबई मार्गावरची रेल्वे वाहतुक सुरळीत
होण्यासाठी किमान एका दिवसाचा अवधी लागेल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान हरियाणात डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या आंदोलनानंतर
उद्भवलेल्या कायदा आणि सुरक्षेच्या समस्येमुळे हिंगोली
अकोला मार्गे जाणारी नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे, मात्र
औरंगाबाद, मनमाड मार्गे धावणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज आपल्या नियमित
वेळेवर धावणार आहे. अमृतसर हून नांदेड कडे येणारी मनमाड औरंगाबाद मार्गे धावणारी सचखंड
एक्सप्रेस काल रद्द करण्यात आल्यानं, ही गाडी आज नांदेडमार्गावर धावणार नसल्याचं, दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
*****
२९ ऑगस्ट
हा दिवस अवयवदान दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री
गिरीष महाजन यांनी केली आहे. ते काल मुंबईत या अनुषंगानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
अवयवदानात महाराष्ट्रानं देशात सहाव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली
असून, लवकरच राज्य पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल संदेश
फेरी काढून अवयवदानाबाबत जागृती करण्यात आली. औरंगाबाद इथं आमदार अतुल सावे यांच्या
उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी इथून या फेरीला प्रारंभ झाला.
या अनुषंगानं जालना इथंही संदेश फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी
शिवाजी जोंधळे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला.
लातूर इथंही या निमित्त संदेश फेरी
काढण्यात आली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थी या संदेश
फेरीत सहभागी झाले होते.
नांदेड
इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी या फेरीला हिरवा झेंडा
दाखवला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या फेरीत पथनाट्याच्या माध्यमातून
अवयवदानाबाबत जागृती केली.
****
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त काल सर्वत्र विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथं सकाळी क्रांती चौकातून शालेय विद्यार्थ्यांनी
अभिवादन फेरी काढून हॉकीपटू ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली.
****
गणपती पाठोपाठ काल सायंकाळी घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन
झालं. पारंपरिक पद्धतीनुसार घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची स्थापना झाली. काल दुपारनंतर
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं, गौरी पुजनासाठी खरेदी
करणाऱ्या भाविकांची तारांबळ उडाली. आज ज्येष्ठा गौरीपूजन. घराघरात उत्सवाच्या वातावरणात
गौरींच्या महाप्रसादाची तयारी सुरू आहे.
****
औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघ महानंदनं दुधाच्या विक्री दरात प्रतिलीटर चार रुपयांनी
कपात केली आहे. परवा एक सप्टेंबरपासून महानंद दूध ४० रुपये प्रतिलीटर दरानं मिळणार
आहे. सणासुदीच्या दिवसात दुधाची मागणी पाहता, दरकपात केल्याचं, दूधसंघाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात मुरूम आष्टा कासार रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार
तर एक जण जखमी झाला. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद नजीक काल खासगी प्रवासी जीप आणि दोन दुचाकीच्या अपघातात
तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
****
No comments:
Post a Comment