Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 AUG. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
****
औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाचा आज ५९ वा वर्धापन दिन साजरा होत असून या निमित्त विद्यापीठात
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्यावतीनं देण्यात येणारे जीवन
गौरव पुरस्कार, प्रशासकीय सेवेसाठी भुजंगराव कुलकर्णी, शिक्षण आणि समाज कार्यासाठी
डॉ. विश्वनाथ कराड, विधी सेवेसाठी न्यायमूर्ती सी. एल. थुल, पत्रकारीतेसाठी मुरलीधर
शिंगोटे, शिक्षण आणि संशोधनासाठी जगन्नाथ पाटील यांना कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्या
हस्ते आज समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आले.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथल्या भवानी
अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेच्या मुख्य शाखेचे प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक
आदिनाथ घाडगे यांच्या घरावर आज पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून घाडगे आणि त्यांच्या
पत्नीची हत्या केली. तसंच लाखोंचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी घाडगे यांच्या दोन्ही
मुलींनाही धारदार शस्त्रानं मारहाण केली असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे.
****
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीतला नवी
मुंबईतल्या तळोजा तुरुंगातून आज जामिनावर मुक्त करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं
त्यांना २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी जामीन दिला आहे. ते गेल्या नऊ वर्षांपासून
तुरुंगात होते.
***
उत्तर प्रदेशातल्या
औरीया जिल्ह्यात आज पहाटे दिल्लीला जाणाऱ्या कैफियत एक्सप्रेसचे दहा डबे रुळावरुन
घसरले. या अपघातात ७४ जण जखमी झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं राज्याच्या
गृह विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांनी सांगितलं. जखमींना जवळच्या रुग्णालयात
दाखल करण्यात आलं आहे. अजमगढहून येणारी ही गाडी अछलादा आणि पाता स्थानकांदरम्यान एका
डंपरला धडकल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य पूर्ण झालं असून, प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी
अछलादा स्थानकावर आणण्यात आलं आहे.
दरम्यान, उत्तरप्रदेशात
सलग दोन रेल्वे अपघात घडल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल
यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
****
स्कॉटलंड मधल्या
ग्लासगो इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला
एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरीत सिंधुनं कोरियाच्या
किम ह्यो मिनचा पराभव केला.
पुरुष एकेरीत भारताच्या
बी साई प्रणितनं हाँगकाँगच्या वाय नान चा पराभव करत, दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मिश्र
दुहेरीतही प्रणय जेरी चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी यांनी भारताची प्राजक्ता सावंत आणि
मलेशियाच्या योगेंद्रन क्रिश्नन या जोडीचा पराभव केला. सायना नेहवालचा या स्पर्धेतला
पहिला सामना आज होणार आहे.
****
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री
आणि पहिल्या लोकसभेचे सदस्य रिशांग किशिंग यांचं काल इम्फाळ मध्ये निधन झालं, ते ९६
वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते
असलेले किशिंग हे १९८० ते १९८८ आणि १९९४ ते
१९९७ या काळात मणिपूरचे मुख्यमंत्री होते. मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला, केंद्रीय
गृहमंत्री राजनाध सिंह, गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल
गांधी यांनी किशिंग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
दरम्यान, मणिपूर
सरकारनं तीन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला असून, आज राज्यातले सर्व कार्यालयं आणि
शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.
****
बिहारमध्ये आलेल्या
पुरात मृत्यूमुखी पावलेल्यांची संख्या ३६१ एवढी झाली आहे. १८ जिल्ह्यातल्या दिड कोटींहून
अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. सात लाख साठ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात
आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी राज्यातल्या पूरग्रस्त भागाची हवाई
पाहणी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं.
****
मुलींच्या जन्माचं
प्रमाण कमी असलेल्या आणि गर्भलिंग निदान चाचण्यांसाठी संवेदनशील असणाऱ्या जिल्ह्यात
तसंच अन्य राज्यांच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गर्भधारणा पूर्व आणि प्रसूतीपूर्व
गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधात्मक - पी सी पी एन डी टी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकरता
विशेष अधिकारी नेमण्यात यावा, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले
आहेत. मंत्रालयात पीसीपीएनडीटी कायद्याच्या राज्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आंतरराज्य
सीमाभागात सोनोग्राफी करतेवेळी रुग्णाच्या वास्तव्याचा पुरावा घेण्याबाबत विचारविनिमय
करावा, असंही सावंत यावेळी म्हणाले.
****
राज्य महिला आयोगाला
सध्या असलेले अर्ध न्यायिक अधिकार वाढवण्याची मागणी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर
यांनी केली आहे. त्या पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. यासंदर्भात आयोगाचा अभ्यास
सुरु असून, येत्या तीन महिन्यात त्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल, असं
त्या म्हणाल्या. मुस्लिम धर्मातल्या तिहेरी तलाक संदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्णयाचंही रहाटकर यांनी स्वागत केलं.
****
No comments:
Post a Comment