Thursday, 24 August 2017

Text-AIR NEWS BULLETIN AURANGABAD 24.08.2017 5.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 24 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्तिगत गोपनियता मुलभूत अधिकार असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत, हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं कायदा करुन आधार लागू केला असल्याचं त्यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. व्यक्तिगत गोपनियतेचा अधिकार हा स्वातंत्र्याच्या अधिकाराचाच एक भाग असला तरी, कोणताही अधिकार पूर्ण नसतो, त्यात वाजवी निर्बंध असतात, असं ते म्हणाले.

आधार कार्ड वरची माहिती पूर्णपणे सुरक्षित असून, विहित उद्देशाव्यतिरिक्त अन्य कामासाठी  या माहितीचा उपयोग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.    

****

२०० रुपयांची नोट उद्यापासून चलनात येणार असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. २०० रुपयांची नोट चलनात आल्यामुळे नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलन तुटवडा भरुन काढण्यात मदत मिळणार असून, २०० रुपयांच्या सुमारे ५० कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

****

भारत नेपाळचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा भारत दौऱ्यावर असून, पंतप्रधान मोदी आणि देउबा यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली, त्यानंतर वार्ताहर परिषदेत पंतप्रधान बोलत होते. यावेळी उभय देशांदरम्यान आठ सामंजस्य करार करण्यात आले. यात गृहनिर्माण सहाय्य, अंमली पदार्थांवर प्रतिबंध, आरोग्य आणि शिक्षण आदी करारांचा समावेश आहे.

****

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग यांच्या विरोधातल्या लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालय उद्या निकाल सुनावणार असून, या पार्श्वभूमीवर हरियाणा आणि पंजाब राज्याला अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गृह मंत्रालयानं निमलष्करी दलाच्या एकशे सदूसष्ठ तुकड्या पाठवल्या आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या पंजाबमधल्या सर्व शाळा आणि महाविद्यालये तसंच इंटरनेट सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही ‘मिशन मोड’वर करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिलेली बायोमेट्रिक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत राहील याची दक्षता घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यासाठी सेवा केंद्रांना प्रती अर्ज दहा रुपये शुल्क सरकारकडून देण्यात येणार असून, शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेण्याच्या तक्रारी आल्यास अशा सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालू देणार नाही, तसंच लासलगाव इथं कांदा हब निर्माण केलं जाईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं विंचूर इथं कांदा लिलावाचा शुभारंभ करताना ते आज बोलत होते. सरकारनं कांद्याची पस्तीस लाख मेट्रिक टनाची होणारी आयात कमी करून ती दोन लाख टनावर आणली असल्याचं त्यांनी सांगितलं. कांदा हब निर्माण करताना मोठ्या प्रमाणावर गोदामं, तसंच रेल्वे सुविधांवर भर दिला जाईल, असं ते म्हणाले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं आज केंद्र शासनाच्या ‘संकल्प से सिद्धी’ या कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे संचालक सचिन सुर्यवंशी यांनी, सन २०२२ पर्यंत कृषी उत्पादन दुप्पट करण्यासाठी सात सुत्रं सांगितली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिक भाव देण्यासह शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारुन शेती मालाला जास्त भाव देण्यावर सरकारचा भर असल्याचं ते म्हणाले.

****

सातारा जिल्हा रुग्णालयातला नेत्र चिकित्सक विजय निकम याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाच लुचपत विभागानं रंगेहात अटक केली. नेत्र चिकित्सा करुन अपंगत्वाचं प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

मालमत्ता पत्रावर मालमत्ताधारकाचं नाव लावण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच घेतांना धुळे शहरातल्या नगर भूमापन अधिकारी कार्यालयातला भूमापक आनंद ठाकूर यालाही आज दुपारी रंगेहात अटक करण्यात आली.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान पल्लेकेले इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या पाच बाद १८९ धावा झाल्या होत्या. भारताकडून यजुवेंद्र चहलनं दोन, जसप्रित बुमराह, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक बळी घेतला.

****

No comments: