Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** व्यक्तिगत गोपनीयता हा मुलभूत अधिकार : सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
** २०० रुपये मूल्याची नोट आजपासून
चलनात येणार
**
गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ
** श्रीलंकेविरुद्धच्या
दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा तीन गडी राखून विजय
आणि
** विविध
शाळांच्या २६२ बोगस तुकड्या प्रकरणी लातूर इथं ३१५ जणांविरुध्द गुन्हा दाखल
****
व्यक्तिगत गोपनीयता हा मुलभूत अधिकार
असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय घटनापीठानं काल हा निर्णय
दिला. सरकारी योजनांसाठी आधार क्रमांकाच्या
सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग होतो असा दावा करणारी याचिका
न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवर दोन ऑगस्टला
सुनावणी पूर्ण झाली होती, त्यावर काल हा निर्णय देत, न्यायालयानं, आधार पत्राच्या वैधतेबाबतचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला जाईल, असंही स्पष्ट केलं.
केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या
निर्णयाचं स्वागत करत, हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं आहे.
काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना प्रसाद यांनी, आधार पत्रावरची माहिती पूर्णपणे सुरक्षित असून, विहित
उद्देशाव्यतिरिक्त अन्य कामासाठी या माहितीचा उपयोग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,
असं सांगितलं.
****
देशाच्या विकासासाठी शेतकऱ्यांची समृध्दी
गरजेची असल्याचं मत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त
केलं आहे. पुण्याच्या भारती ॲग्रो इंडस्ट्रीज
फाऊंडेशनच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संबोधित करताना, पंतप्रधानांनी, देशानं हरित आणि धवल क्रांती पाहिली असून, आता मच्छीमारांसाठी निळी तर मधाच्या अधिक उत्पादनासाठी गोड क्रांती करण्याची वेळ
आली असल्याचं नमूद केलं.
****
२०० रुपये मूल्याची नोट आजपासून चलनात येणार असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. विमुद्रीकरणानंतर
निर्माण झालेला चलन तुटवडा भरुन काढण्यास यामुळे मदत मिळणार असून, २०० रुपयांच्या सुमारे ५० कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार असल्याची माहिती,
सूत्रांनी दिली आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरुन
घेण्याची कार्यवाही ‘मिशन मोड’वर करण्यात यावी,
अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना
दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातले सर्व जिल्हाधिकारी
आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून संवाद साधत, अर्ज भरण्यासाठीची बायोमेट्रिक यंत्रणा
योग्य प्रकारे कार्यरत असेल, याची दक्षता घेण्यास सांगितलं.
हे अर्ज भरून घेण्यासाठी सेवा केंद्रांना प्रती अर्ज दहा रुपये शुल्क
सरकारकडून देण्यात येणार असून, शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेण्याच्या
तक्रारी आल्यास, अशा सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्याची कारवाई
करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या नगरपरिषदांमध्ये
गेल्या २० वर्षांपासून रोजंदारीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना विविध नगरपालिकांमध्ये सामावून घेण्याचा
निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नगरपरिषद तसंच नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी
मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासंदर्भात
राज्य शासन सकारात्मक विचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. करांची
वसुली करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तसंच त्यांच्या संघटनांनी पुढाकार घ्यावा, असं
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालू देणार नसल्याचा निर्वाळा, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्यात
विंचूर इथं कांदा लिलावाचा शुभारंभ करताना ते काल बोलत होते. लासलगाव इथं कांदा हब निर्माण केलं जाईल, अशी घोषणा त्यांनी
केली. सरकारनं कांद्याची पस्तीस लाख मेट्रिक टनाची होणारी आयात
कमी करून ती दोन लाख टनावर आणली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. सकाळी घरोघरच्या
गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना होईल.
यंदा अनंत चतुर्दशी पाच सप्टेंबर रोजी असल्यानं, गणेशोत्सव दहा ऐवजी बारा दिवस साजरा होणार आहे. नागरिकांनी
हा उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीनं साजरा करावा, असं आवाहन विविध
पर्यावरणवादी तसंच सामाजिक संघटनांकडून केलं जात आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान
सुरू असलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला कालचा दुसरा सामना भारतानं
तीन गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेनं २३६ धावा केल्या, मात्र
पावसामुळे खेळात व्यत्यय आल्यानं, भारताला ४७ षटकात २३१ धावांचं आव्हान देण्यात आलं. महेंद्रसिंग
धोनी च्या नाबाद ४५ आणि भुवनेश्वरच्या नाबाद ५३ धावांच्या बळावर भारतानं ४५ व्या षटकात
विजय मिळवला.
****
ग्लासगो
जागतिक बॅडमिंटन अजिक्यंपद स्पर्धेत भारताच्या के श्रीकांत आणि पी.व्ही सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत
प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात
श्रीकांतनं डेन्मार्कच्या अँडर्स अँटनसनवर २१-१४, २१-१८ नं
तर
सिंधूनं हाँगकाँगच्या चुंग येंग गेन ई वर १९-२१, २३-२१ आणि २१-१७ अशी
मात
केली.
****
लातूर जिल्ह्यातल्या
२६२ बोगस तुकड्या प्रकरणी शासनाची ६ कोटी अट्ठावन्न लाख सत्त्याण्णव हजार नऊशे रूपयांची
फसवणूक केल्याच्या कारणावरून लातूर जिल्हा परिषदेचे तत्कालिन शिक्षणाधिकारी विलास जोशी
यांच्यासह १८ अधिकारी, कर्मचारी आणि संस्थाचालक मुख्याध्यापकासह ३१५ जणांविरुध्द
काल गुन्हा दाखल करण्यात आला. २०१०-११ ते २०१२-१३ या कालावधीत विलास जोशी यांनी जिल्ह्यातल्या
९९ खाजगी प्राथमिक शाळांमध्ये २६२ तुकड्यांना शासनाचे नियम डावलून मंजूरी दिली होती. या
९९ शाळांमध्ये उर्दू माध्यमांच्या ११ तर मराठी माध्यमांच्या ८८ शाळांचा समावेश आहे. त्यानंतर
या शाळांमध्ये तीनशे एकोणसत्तर शिक्षकांची भरती केली होती.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या
स्पॉट ॲडमिशन प्रकियेत नियोजनाच्या अभावाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यापीठाच्या
विविध अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी काल स्पॉट ॲडमिशन प्रक्रिया राबवण्यात येणार
होती, यासाठी औरंगाबादसह अनेक जिल्ह्यातले विद्यार्थी दाखल झाले होते. मात्र
प्रवेशासाठी सायंकाळी उशीरापर्यंत ताटकळत बसावं लागल्यानं, या
विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर घोषणाबाजी केली. परिस्थितीवर
नियंत्रण मिळवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला पोलिसांची मदत घ्यावी लागली.
****
जालना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या
तपासात मदत करण्यासाठी पंचवीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह अन्य
एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलं आहे. जालना जिल्ह्यात बदनापूर इथं काल ही कारवाई करण्यात आली. महेबूब खान उस्मान खान पठाण असं या पोलीस उपनिरीक्षकाचं
नाव आहे.
****
परभणी महानगरपालिकेनं पाणीपट्टी आणि
मालमत्ता करात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ आमदार राहूल पाटील यांनी काल एक दिवसाचं
लाक्षणिक उपोषण केलं. गेल्या १८ वर्षात करवाढ न करता, अचानक कराच्या दरात मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ पाटील
यांनी हे उपोषण केलं. या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा
दिला होता.
****
नांदेड जिल्ह्यात खाजगी प्रवासी बस
उलटून झालेल्या अपघातात चार प्रवासी ठार तर अकरा प्रवासी जखमी झाले. नर्सी ते देगलूर रस्त्यावर वनाळी टोल नाक्याजवळ काल दुपारी
ही घटना घडली.
****
No comments:
Post a Comment