Tuesday, 22 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 22.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

मुस्लिम धर्मातली तिहेरी तलाक पद्धत सर्वोच्च न्यायालयानं असंवैधानिक, अवैध आणि अमान्य ठरवली आहे. तीन विरूद्ध दोन अशा बहुमतानं निर्णय देतांना न्यायालयानं ही पद्धत कुराणाच्या मूळ तत्त्वाविरूद्ध असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात केंद्र सरकारन सहा महिन्यांत संसदेत कायदा करावा, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी असेल, असा महत्वपूर्ण निर्णयही न्यायालयानं दिला आहे. जर सहा महिन्यात सरकारने कायदा केला नाही, तर ही बंदी पुढे कायम राहिल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.  तिहेरी तलाकचा निर्णय सुनावताना पाच न्यायाधीशांच्या पीठात तीन न्यायाधीशांनी ही प्रथा घटनाबाह्य असल्याचं सांगत त्याविरुद्ध मत दिलं. राजकीय पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवत यासंदर्भातला कायदा तयार करण्यास केंद्र सरकारला मदत करावी, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तिहेरी तलाकबद्दल सर्वोच्च न्यायालयात ११ ते १८ मे दरम्यान सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता.

****

पारपत्र बनवण्यासाठी पुढच्या वर्षापासून पोलिस पडताळणीची आवश्यकता राहणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. सरकार या प्रक्रियेला गुन्हे आणि गुन्हे संशोधन प्रणाली - सीसीटीएनएसशी जोडणार असल्यामुळे वेगळ्या पोलिस पडताळणीची आवश्यकता राहणार नाही. सीसीटीएनएस प्रणाली एका वर्षाच्या आत परराष्ट्र मंत्रालयाच्या पारपत्र सेवेला जोडण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षि यांनी नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात सांगितलं.      

****

बँकांचं विलिनीकरण तसंच अन्य मागण्यांसाठी देशभरातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँक कर्मचाऱ्यांच्या शिखर संघटनेच्या नेतृत्वात हा संप सुरु आहे. यामुळे बँक सेवेवर परीणाम झाला असून सरकारी बँकां जवळपास बंद असल्याचं दिसून आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा बंद असून, जिल्ह्यातले ८०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ३०० कोटींचे व्यवहार ठप्प असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

लातूरमधल्याही सगळ्या बँका बंद असून, बॅंक कर्मचाऱ्यांनी गांधी चौकात मानवी साखळी आंदोलन आणि बँक ऑफ महाराष्ट्रसमोर निदर्शनं केली. आजचा संप हा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी नसून तो ग्राहकांच्या हितासाठी असल्याचं बॅंक कर्मचारी समन्वय समितीचे नेते धनजंय कुलकर्णी यांनी सांगितल. औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी इथंही बँकांचं कामकाज ठप्प असल्याचं आढळून आलं.

मात्र संपात सहभागी नसलेल्या आयसीआयसीआय, ॲक्सिस, कोटक महिंद्रा,  आणि एचडीएफसी या खासगी क्षेत्रातल्या बँकांचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. 

****

नांदेड इथलं शंकरराव चव्हाण विष्णुपुरी धरण ९० टक्के भरलं असून, धरणाचा एक दरवाजा काल उघडण्यात आला. सध्या या धरणातून ३९५ दशलक्ष घन फूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या कापशी बुद्रुक इथला एक इसम शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेला असता पुरात वाहून गेला.

****

जालना जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता बाळगण्याचे आदेश, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यातल्या नदीकाठच्या ज्या गावांना पुराचा धोका आहे, तिथले नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही लोणीकर यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या चांगल्या पावसाचा फायदा खरीप पिकांना होईल अशी अपेक्षा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्या बीड इथं पीक परिस्थितीचा आढावा घेताना बोलत होत्या. पीक परिस्थितीचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५३ पूर्णांक ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

****

प्रदूषण थांबवण्यासाठी आगामी गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य जमा करुन त्यातून खत निर्मिती करण्याचा निर्णय लातूरच्या निर्माल्य ग्रुप आणि लातूर महानगरपालिकेनं घेतला आहे. १२ वाहनांतून हे निर्माल्य जमा करण्यात येणार आहे.

****

ग्लासगो इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत, समीर वर्मा आणि तन्वी लाडनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतनं पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत रशियाच्या सरगे सिरंतचा २१-१३, २१-१२ असा पराभव केला. समीरनं स्पेनच्या, तर महिला एकेरीत तन्वीनं इंग्लंडच्या खेळाडूचा पराभव केला.

****

No comments: