Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 21 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
ठाणे जिल्ह्यातल्या मीरा भाईंदर
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपनं ९५
जागांपैकी ६१ जागांवर विजय मिळवला तर शिवसेनेला २२, काँग्रेसला दहा जागा मिळाल्या,
दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
****
तामिळनाडूच्या ऑल इंडिया अण्णा
द्रमुक मुनेत्र कळघम - एआयएडीएमकेच्या ओ. पनीरसेल्वम आणि मुख्यमंत्री इ. पलानीसामी
गटांचं विलिनीकरण झालं आहे. या विलिनीकरण्याच्या घोषणेनंतर ओ. पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्री
म्हणून मंत्रीमंडळात सामिल करण्यात आलं असून त्यांना अर्थ खातं दिलं जाणार आहे. याशिवाय
पक्षाचे निमंत्रक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पलानीसामी
हे सह निमंत्रक असणार आहेत. याशिवाय अन्य एका सदस्याला मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात
आलं आहे. तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना गोपनियतेची
शपथ दिली. जयललितांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही गट एकत्र येत असल्याचं मुख्यमंत्री
ई पलानीसामी यांनी विलिनीकरणाची घोषणा केल्यानंतर सांगितलं. माजी मुख्यमंत्री जयललिता
यांच्या निधनानंतर या पक्षाचे दोन गट पडले होते. पक्षाच्या सचिव शशिकला यांना पक्षात
ठेवायचं की नाही, यावर पक्षाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी
सांगितलं. यानंतर या दोन्ही नेत्यांनी चेन्नईतल्या मरिना बीचवरच्या जयललिता यांच्या
समाधीचं दर्शन घेतलं.
****
गुजरातमधल्या राज्यसभेच्या निवडणुकीत
पराभूत झालेले उमेदवार बलवंतसिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं
निवडणूक आयोग आणि काँग्रेसचे विजयी उमेदवार अहमद पटेल यांना नोटीस बजावली आहे. या निवडणुकीत
आयोगानं काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांचं मत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, या
निर्णयाला बलवंत सिंह यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. या निवडणुकीतले अन्य दोन विजयी
उमेदवार भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मंत्री स्मृती इराणी यांनाही न्यायालयानं नोटीस
बजावली असून, २१ सप्टेंबर पर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
****
माती परिक्षणासाठी नमुना यंत्र
आणि विविध माती परिक्षण प्रयोगशाळांची वेळोवेळी तपासणी होणं आवश्यक असून, यामुळे मातीची
गुणवत्ता सुनिश्चित करण्यास मदत होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते आज नवी दिल्ली इथं मृदा आरोग्य पत्रिका आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आढावा
बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका सहजतेनं वाचता याव्यात, यासाठी
त्या प्रादेशिक भाषांमध्ये छापल्या पाहिजे, असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.
माती परिक्षण हातांनी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांच्या माध्यमातून करता आलं पाहिजे,
यात अधिकाऱ्यांनी नवीन उद्योजकांना सहभागी करुन घ्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
दरम्यान, पंतप्रधान येत्या २७
ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या श्रृंखलेचा हा ३५ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी
११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि
विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी
ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवाव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी
केलं आहे.
****
भारत आणि चीन दरम्यान असलेल्या
डोकलाम मुद्यावर लवकरच तोडगा निघेल, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं
आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत तिबेट सीमा पोलिस दलाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
डोकलाम मुद्यावर चीनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशाच्या
सुरक्षेसंबंधी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, तसंच जगातली कोणतीही शक्ती भारतावर हल्ला
करु शकणार नाही, असं सिंग यांनी यावेळी नमूद केलं.
****
देशाच्या विकासासाठी संसद आणि
राज्य विधीमंडळांना अधिक सक्रियपणे काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. हैदराबाद इथं आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत
होते. सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकत्र येऊन देशाला पुढे नेण्याचं आवाहन त्यांनी
यावेळी केलं.
****
औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात
आलेल्या दोन दिवसीय दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन दिव्य मराठी वृत्तपत्राचे संपादक
प्रशांत दीक्षीत यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या प्रदर्शनात तीन हजार दुर्मिळ ग्रंथ
मांडण्यात आले आहेत.
*******
No comments:
Post a Comment