Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 27 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
देशात तीन वर्षांपूर्वी सुरु
केलेल्या स्वच्छता अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात बोलत होते.
या स्वच्छता अभियानाला येत्या दोन ऑक्टोबरला तीन वर्ष पूर्ण होत असून, आतापर्यंत दोन
लाख ३० हजारांहून अधिक गावं उघड्यावर शौचापासून मुक्त झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
येत्या २९ ऑगस्टला हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून
आपण साजरी करतो, असं सांगून पंतप्रधानांनी, देशातल्या युवा पिढीला खेळात जास्तीत जास्त
सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
****
जॅम अर्थात जनधन, आधार आणि मोबाईल या तीन योजनांनी
देशाला सामाजिक क्रांतीच्या युगात उतरवले असून यामुळे जीएसटी प्रमाणे सर्व देशवासी
व्यावसायिक, आर्थिक आणि डिजिटलपातळीवरही एकत्र येण्यास मदत होईल, असं अर्थमंत्री अरुण
जेटली यांनी म्हटलं आहे. यामुळे १०० कोटी आधार कार्ड हे १०० कोटी बँक खाते आणि १००
कोटी मोबाईल फोनशी जोडले जाण्याचे उद्दिष्ट्ट देशाच्या आवाक्यात आलं असल्याचं म्हटलं
आहे. एकदा की हे उद्दिष्ट्ट गाठलं की सर्व भारतीय हे आर्थिक आणि डिजिटल प्रवाहाचे घटक
बनतील असंही जेटली यांनी म्हटलं आहे.
****
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम याला उद्या
होणाऱ्या शिक्षेच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा आणि पंजाबमध्ये कडक बंदोबस्त
करण्यात आला आहे. राम रहिमला शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयानं बलात्कार प्रकरणी
दोषी ठरवल्यानंतर हरियाणामध्ये उसळलेला हिंसाचारानंतर आता शांतता प्रस्थापित झाली आहे.
तरीही सिरसा जिल्ह्यात अजूनही संचारबंदी कायम असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
राम रहिमला शिक्षा सुनावणीसाठी त्याला बंदीवासात ठेवलेल्या रोहतक इथल्या तुरुंगालाच
उद्या तात्पुरत्या न्यायालयात परिवर्तीत करण्याचे आदेश हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयानं
हरियाणा सरकारला दिले आहेत. उद्याच्या शिक्षेच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर रोहतकमध्ये
३० अर्धसैनिक दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
****
आसाम मधल्या सिक्कीम इथं मृत्यू
झालेले लातूर जिल्ह्यातले जवान रामनाथ हाके यांच्या पार्थिव देहावर आज चाकुर तालुक्यातल्या
मष्णेरवाडी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिक्कीम
इथं समुद्र सपाटीपासून १८ हजार फूट उंचीवर कर्तव्य बजावत असताना त्यांना ऑक्सिजनच्या
कमतरतेमुळे मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
****
चित्रपटांच्या सेन्सॉरशिपमध्ये
नको तिथे वाद घातला जातो, हे वास्तव असल्याचं परखड मत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक चंद्रकांत
कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथल्या एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद
महाविद्यालयातर्फे आयोजित 'सिनेमा, समाज आणि सेन्सॉरशिप' या एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचं
उद्घाटन आज कुलकर्णी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सेन्सॉर बोर्डाची
गरज नाही असं बोलतानाच, घटनेची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असंही
ते म्हणाले.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारे
ग्रंथ पुरस्कार जाहिर झाले आहेत. यामध्ये कविता लेखनासाठी देण्यात येणारा ‘कुसुमताई
देशमुख काव्य पुरस्कार’ औरंगाबादच्या ना तु पोघे यांच्या ‘बिनचेहऱ्यांचे अभंग’ या ग्रंथास,
‘नरहर कुरुंदकर वाङमय पुरस्कार’ केशव वसेकर यांच्या ‘पाऊलवाट’ या ग्रंथास, प्राचार्य
म भि चिटणीस वाङमय पुरस्कार डॉक्टर विलास खोले यांच्या ‘विलोकन’ या ग्रंथास तर, बी
रघुनाथ वाङमय पुरस्कार प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला
जाहिर झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकात ही
माहिती देण्यात आली. हे पुरस्कार येत्या २९ सप्टेंबरला उस्मानाबाद इथं समारंभपूर्वक
प्रदान करण्यात येणार आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी बस स्थानकातल्या
वितरण विभागात मध्यरात्री लागलेल्या आगीत जवळपास ३५ लाखांचा ऐवज जळून खाक झाला. यात
वितरण विभागातल्या तिकीट प्रिंटींगच्या १५० मशीन, चालक वाहकांचे गणवेश, बॅच, सामानाच्या
पेट्या, कॅशबुक आदी सामानाचा समावेश आहे. सुदैवानं यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
या घटनेचा बस वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, परळी डेपोची एकही बस बाहेर पडू शकली
नाही. मात्र, बाहेरच्या डेपोंच्या बसची आवक जावक सुरू आहे. दरम्यान, आगीचं कारण अद्याप
स्पष्ट झालेलं नाही.
****
जर्मनीतल्या हॅम्बर्ग इथं सुरु
असलेल्या १९व्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे मनोज कुमार आणि कविंदर बिष्ट
दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. तर आशियाई खेळांमध्ये कांस्य पदक विजेता सतीश कुमारचा
९१ किलोग्रॅम वजनी गटात पराभव झाल्यानं, तो स्पर्धेतून बाहेर झाला.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान पल्लेकेले
इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या
पाच बाद १६५ धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment