आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२० ऑगस्ट २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
राज्यात जवळजवळ पंधरा दिवसांच्या
खंडानंतर पावसाचं पुनरागमन झालं असून, सगळीकडे मुसळधार पाऊस सुरु आहे.
लातूर शहर आणि जिल्ह्यात
कालपासून अतिवृष्टी सुरु आहे. अनके ठिकाणी पाणी साचलं असून, नदी, नाले दुथडी भरुन वाहत
आहेत.
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातही
सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
कालही मराठवाड्यात सर्व ठिकाणी
समाधानकारक पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी
यांची आज जयंती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष
राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी नवी दिल्लीतल्या वीर भूमी इथल्या
राजीव गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहीली. अखिल भारतीय
काँग्रेस कमिटीतर्फे वीर भूमीवर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
तामिळनाडूमधला सत्ताधारी
पक्ष ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुनेत्र कळघम - ए आय ए डी एम केच्या दोन्ही गटांचं लवकरच
विलिनीकरण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री ई पलानीसामी यांनी
व्यक्त केला आहे. दोन गटांमधले असलेले मतभेद लवकरात लवकर दूर केले जातील, असं ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्या गटानेही विलिनीकरणाचे संकेत दिले आहेत.
****
उत्तर प्रदेशात पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस रेल्वे
गाडीचे चौदा डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात २३ प्रवासी ठार तर, शंभराहून अधिक
जण जखमी झाले. मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली इथं काल संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास
हा अपघात झाला.
****
पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल भूकंपाचा धक्का बसला.
रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर चार
पूर्णांक पाच एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू सातारा जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात
ढाकाळे गावाजवळ असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment