Tuesday, 22 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 22.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                                Language Marathi         

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** मुस्लिम समाजातल्या तिहेरी तलाक पध्दतीवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार

** गोरक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला विचारणा

** मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत

आणि

** औरंगाबाद- चाळीसगाव महामार्ग दरड कोसळल्यानं  ७ ऑक्टोबर पर्यंत वाहतुकीसाठी बंद

****

मुस्लिम समाजातल्या तिहेरी तलाक पध्दतीवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं यापूर्वी मे महिन्यात सलग सहा दिवस या प्रकरणाची सुनावणी घेतली होती. त्यानंतर १८ मे रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. मुस्लिम वैयक्तिक कायद्यातल्या या प्रथेच्या वैधानिकतेसंदर्भात न्यायालय निर्णय देईल. त्याचबरोबर मूलभूत अधिकार, स्त्री- पुरूष समानतेचा सिद्धांत आणि मुस्लिम महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा हा निर्णय आहे का? याबाबतही न्यायालय निर्णय देणार आहे. मुस्लिम समाजातली ही तिहेरी तलाकची प्रथा असंवैधानिक असून तिच्याविरोधात न्यायालयात सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

****

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहीतला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातली दुसरी आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहला जामीन मंजूर केल्यानंतर पुरोहीतनं जामीनासाठी अर्ज केला होता.

****

बकरी ईद दरम्यान गोरक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारनं काय प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत  अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. ईदच्या दरम्यान कथित गोरक्षक त्रास देण्याची शक्यता असून याबाबत हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करावा तसंच प्रत्येक पोलिस ठाण्यात हद्दीतल्या गोरक्षकांची यादी ठेवण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी करणाऱ्या जनहीत याचिकेच्या सुनावणी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची असून याबाबतचे कोणतेही निर्देश आपण देणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याबाबत सरकारनं आखलेल्या उपाययोजनांची माहिती न्यायालयाला द्यावी असं सांगत न्यायालयानं राज्य सरकारला शपथपत्र दाखल करायला उद्या पर्यंतची मुदत दिली आहे.

****

बँकांचं एकत्रीकरण तसंच अन्य मागण्यांसाठी देशभरातले १० लाख सार्वजनिक क्षेत्रातले बँक कर्मचारी आज देशव्यापी संपावर जात आहेत, याचा परीणाम आजच्या बँक व्यवहारावर होण्याची शक्यता आहे, मात्र आयसीआयसीआय, ॲक्सिस, कोटक महिंद्रा,  आणि एचडीएफसी या खासगी बँका संपात सहभागी होणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

समृद्धी महामार्ग कथित गैरव्यवहार प्रकरणी, सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या, राधेशाम मोपलवार यांच्या विरुद्ध चौकशी करण्यासाठी माजी मुख्य सचिव, जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षते खाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या पथकानं तपास करून एका महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे.

****

सरपंचपदाच्या थेट निवडणुकीसाठी ग्राम पंचायतींच्या सदस्य संख्येनुसार उमेदवारासाठी ५० हजार ते पावणेदोन लाख रुपये इतकी खर्च मर्यादा निश्चित झाली आहे. सदस्य पदाच्या उमेदवारासाठी २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत सुधारीत खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी काल मुंबईत ही माहिती दिली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या श्रृंखलेचा हा ३५ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार १८ ०० ११ ७८ ००  या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवाव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

ठाणे जिल्ह्यातल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपनं ९५ जागांपैकी ६१ जागांवर विजय मिळवला तर शिवसेनेला २२, काँग्रेसला दहा जागा मिळाल्या, दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.  

****

औरंगाबाद महानगर पालिकेच्या १९ ऑगस्ट रोजी झालेल्या  सर्वसाधारण सभेत, ‘वंदे मातरम’ सुरू असताना, गोंधळ घालत तोडफोड केल्या प्रकरणी, दोन नगरसेवकांच्या विरोधात महानगर पालिकेनं काल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. महानगर पालिकेचे आयुक्त, डी.एम. मुगळीकर यांनी ही माहिती दिली. सर्वसाधारण सभेत ‘वंदे मातरम’ सुरू असताना, मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन-एम.आय.एम.चे नगरसेवक सय्यद मतीन आणि काँग्रेसचे नगरसेवक सोहेल शेख जागेवर बसून राहील्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यानं, तणाव निर्माण झाला होता. या दोन सदस्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणाचे आदेश महापौर भगवान घडामोडे यांनी दिले होते.

****

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे औरंगाबाद- चाळीसगाव महामार्गावरच्या औट्रम घाटात रविवारी दरड कोसळल्यानं  वाहतूक ठप्प झाली होती. यासंदर्भात, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, यशवंत घोतकर यांनी काल या महामार्गाची पाहणी करून, हा महामार्ग ७ ऑक्टोबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले. आता धुळे मार्गे येणारी जड वाहनं नांदगाव- वैजापूर- शिऊर मार्गे औरंगाबादकडे येतील. तर छोटी वाहनं कन्नड तालुक्यातल्या नागदच्या म्हैसघाट मार्गे वळवण्यात आली आहेत, असं घोतकर यांनी सांगितलं.

****

बारावीच्या फेर परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यात राज्याचा निकाल २५ टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल ३७ टक्के लागला असून विभागानं राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. काल दुपारी हा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.  ११ ते २८ जुलै या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यातून ७ हजार १३८ विद्यार्थ्यांनी बारावीची फेरपरीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

****

राज्यात अनेक जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थीती निर्माण झाल्यानं शासनानं शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजपा किसान मोर्चाच्यावतीनं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंडे आणि प्रदेश सदस्य पंजाबराव वडजे पाटील यांनी दिलेल्या या लेखी निवेदनात नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, कंधार, मुखेड तसंच देगलूर तालुक्यात अल्प पाऊस झाला असून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी पिक विमा योजनेअंतर्गत २५ टक्के रक्कम त्वरीत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

****

बैल पोळ्याचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात करण्यात आला. ठिकठिकाणी बैलांचे पुजन करून त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मराठवाड्यातही पावसाचं दमदार पुनरागमन झाल्यामुळं पोळ्याच्या सणात शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह दिसला.

****

परभणी महानगरपालिकेच्या जाचक कर वाढीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. आमदार राघव पाटील यांनी काल वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. महापालिकेनं शहरातल्या नागरिकांना करवाढीसंदर्भात नोटीसा जारी केल्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे. टप्प्याटप्प्यानं करवाढ करताना प्रथम नागरी सुविधा देणं आवश्यक आहे. असं मतही पाटील यांनी व्यक्त केल.

****


No comments: