Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** मुस्लिम धर्मातली तिहेरी तलाक पद्धत घटनाबाह्य, अवैध आणि अमान्य; सहा महिन्यांत
कायदा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
** कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत १५
सप्टेंबरपर्यंत वाढ
** सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा विलीनीकरणाच्या विरोधातला देशव्यापी संप
यशस्वी
आणि
** रिओ
पॅरालिम्पिक स्पर्धेत भाला फेकीत सुवर्णपदक पटकावणारा देवेंद्र झांझरिया आणि हॉकीपटू
सरदार सिंग यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर
****
मुस्लिम धर्मातली तिहेरी तलाक पद्धत सर्वोच्च न्यायालयानं काल घटनाबाह्य, अवैध
आणि अमान्य ठरवली आहे. पाच न्यायाधिशांच्या पीठानं तीन विरूद्ध दोन अशा बहुमतानं निर्णय
देतांना ही पद्धत कुराणाच्या मूळ तत्त्वांविरूद्ध असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात
केंद्र सरकारनं सहा महिन्यांत संसदेत कायदा करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी असेल, जर सहा महिन्यात सरकारने
कायदा केला नाही, तर ही बंदी पुढे कायम राहिल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. राजकीय
पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवत यासंदर्भातला कायदा तयार करण्यास केंद्र सरकारला मदत
करावी, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा हा
निर्णय ऐतिहासिक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. महिला सक्षमीकरणाच्या
दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असून, यामुळे मुस्लिम महिलांना समान अधिकार प्राप्त झाला
असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
अखिल भारतीय मुस्लिम महिला
वैयक्तीक कायदे मंडळ आणि अखिल भारतीय शिया वैयक्तीक कायदे मंडळांनीही न्यायालयाच्या
या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा निर्णय म्हणजे देशातल्या मुस्लिम महिलांचा आणि इस्लामचा
विजय असल्याचं मुस्लिम महिला वैयक्तीक कायदे मंडळाच्या अध्यक्षा शाइस्ता अंबर यांनी
म्हटलं आहे. तर यामुळे मुस्लिम महिलांचं शोषण थांबवण्यास मदत होईल, असं शिया वैयक्तीक
कायदे मंडळाचे प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अखिल भारतीय मुस्लिम
वैयक्तिक कायदे मंडळाचे महासचिव मौलाना वली रहमान यांनी यावर कोणतीही टिप्पणी करण्यास
नकार दिला असून, मंडळाच्या बैठकीत पुढचा निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी
सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरायची मुदत येत्या १५ सप्टेंबरपर्यंत
वाढवली असून एक ऑक्टोबरपासून कर्जवाटप प्रक्रिया सुरु होईल. मंत्रीमंडळ उपसमितीच्या
काल मंत्रालयात झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख
यांनी सांगितलं. सरकारनं कर्जमाफी अंमलबजावणीसाठी या उपसमितीची स्थापना केली आहे. आतापर्यंत
२२ लाख ४० हजार ९४३ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. इ-सुविधा
केंद्रांवर अर्ज भरायची प्रक्रिया मोफत उपलब्ध आहे. मात्र केंद्रांवर अर्ज भरताना शेतकऱ्यांकडून
पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा केंद्रांवर कारवाई करण्याचे तसंच
बंद केंद्र तात्काळ सुरु करण्याचे आदेश या बैठकीत दिल्याचं सहकार मंत्र्यांनी सांगितलं.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विलीनीकरणाच्या विरोधात पुकारलेला देशव्यापी
संपा यशस्वी ठरल्याचा दावा, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं केला आहे. सार्वजनिक बँकांची
थकीत कर्ज वसूल करण्यासाठी कडक पावलं उचलावीत तसंच सामान्यांचा पैसा सामान्यांच्या
कल्याणासाठी वापरला जावा अशीही संघटनांची मागणी आहे. या संपामुळे काल सार्वजनिक क्षेत्रातल्या
सर्व बँकांचे व्यवहार ठप्प झाले होते.
बँक कर्मचाऱ्यांनी काल विविध
शहरात निदर्शनं तसंच अन्य मार्गांनी आपला निषेध नोंदवला. लातूर इथल्या गांधी चौकात
बँक कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी आंदोलन केलं. बँक संघटनेचे नेते धनंजय कुलकर्णी यांनी
हा संप ग्राहकांच्या हितासाठी असून सेवा शुल्काच्या माध्यमातून बचत खात्यातून पैशांची
वसुली थांबवण्यासाठी तसंच बँक ठेवींवरच व्याज करमुक्त करण्यासाठी हे आंदोलन असल्याचं
सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व राष्ट्रीयकृत बँकांमधल्या ८००
कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता. त्यामुळे ३०० कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
प्रदूषण नियंत्रणासाठी राज्य
सरकारनं विविध उपाययोजना केल्या असल्याचं सांगत, पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे
पाटील यांनी, २०२२ पर्यंत राज्य प्रदूषण मुक्त करण्याचं आवाहन केलं आहे. ते काल मुंबईत
पर्यावरण विभागानं आयोजित केलेल्या ‘शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र २०२२’ या एकदिवसीय
परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. समाजात प्रदूषणाविषयी जागरुकता होण्याची, तसंच
सांडपाणी, कचरा यांची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातल्या
निकृष्ट हवा असणाऱ्या शहरांची यादी यावेळी जाहीर करण्यात आली, यात मराठवाड्यातल्या
औरंगाबाद, जालना आणि लातूर या शहरांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या विविध जिल्ह्यांतल्या
ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्यानं अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या २३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक
आयुक्त जे एस सहारिया यांनी मुंबई इथं ही घोषणा केली. या ग्रामपंचायतींमध्ये जालना
जिल्ह्यातल्या ४०, हिंगोली जिल्ह्यातल्या १३, औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या चार,
तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या
क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली असून, या निवडणुकांसाठी चार ते आठ सप्टेंबर या कालावधीत
सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रं दाखल करता येतील, असं सहारिया यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत
भाला फेकीत सुवर्णपदक पटकावणारा देवेंद्र झांझरिया आणि हॉकीपटू सरदार सिंग यांना राजीव
गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेट
खेळाडू हरमनप्रीत कौर यांच्यासह १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय
सात जणांना द्रोणाचार्य तर तीन जणांना ध्यानचंद पुरस्कार घोषित झाला आहे. येत्या २९
ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार
आहे.
****
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द
कराव्यात या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मराठवाड्यात काल ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबाद इथं या मागणीसह शेतकरी कर्जमाफी
संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सहकार
विभागाच्या उपनिबंधक अधिकाऱ्यांना निवेदन
देण्यात आलं. हिंगोली इथं जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आलं,
आठ दिवसांच्या आत या याद्या प्रसिद्ध न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाचे
जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी दिला. जालना इथंही पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक
अधिकाऱ्यांना घेराव घालून विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं.
****
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीचा ७० आणि ३० टक्के हा विभागवार नियम रद्द करावा,
तसंच वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा -नीट मधील विद्यार्थांना गुणवत्ता यादीनुसार प्रवेश द्यावा अशी मागणी करणारी
याचिका काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली. यासंदर्भात
केंद्र आणि राज्य सरकारसह वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला न्यायालयानं नोटीस
बजावली असून आपलं म्हणणं सादर करण्यास सांगितलं आहे.
****
औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न
बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव काल मंजूर झाला.
औताडे यांच्याविरुद्ध गेल्या ११ ऑगस्टला भारतीय जनता पक्षानं अविश्वास प्रस्ताव दाखल
केला होता. काल झालेल्या विशेष बैठकीत १३-० अशा मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला.
****
उत्पन्नाच्या तुलनेत ६१ लाख रूपयांची बेहिशोबी संपत्ती जमा केल्याप्रकरणी नांदेडच्या
गटविकास अधिकारी शांता सुरेवाड यांच्याविरूद्ध
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला
आहे. २०१४ मध्ये त्या उमरी इथं बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याविरूद्ध
लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी
केली असता त्यांच्याकडे ६१ लाख रूपयांची बेहिशोबी संपत्ती असल्याचं उघडकीस आलं, यामुळे
त्यांच्यासह त्यांच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment