Monday, 21 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 21.08.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२१ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

बैलपोळा सण आज साजरा होत आहे. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावल्यानं बैलपोळ्याचा उत्साह दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काल बैलांच्या खांदेमळणी परंपरा उत्साहात साजरी झाली.

****

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतींमधल्या सदनिका आणि इतर सदनिका, या दोन्हीच्या दर्जात मोठी तफावत असते, भारतीय रिपब्लिकन पक्ष हा दुजाभाव सहन करणार नाही, असा इशारा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. ते काल मुंबईत झोपडपट्टी हक्क परिषदेत बोलत होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किमान साडेचारशे चौरस फूट जागा मिळावी, यासाठी आपला पक्ष संघर्ष करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नाशिक मधल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं संकेतस्थळ हॅक करून काही मोटारींची प्रमाणपत्र परस्पर देण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी नाशिकच्या सायबर क्राईम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात असलेल्या स्वयंचलित मोटार चाचणी केंद्रात मोटार तपासूनच प्रमाणपत्र दिलं जातं, मात्र केंद्रात तपासणीसाठी न आलेल्या मोटारींना परस्पर प्रमाणपत्र दिल्याचं  मोटार वाहन निरीक्षकांना आढळलं, त्यानंतर ही तक्रार करण्यात आली.

****

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी कॉंग्रेसनं धरसोड वृत्ती सोडण्याची गरज आहे, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर टीका करताना, पवार यांनी कर्जमाफीचे निकष आपल्याला अद्यापही समजलेले नाहीत असं नमूद केलं.

****

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन येत्या बुधवारी साजरा होत आहे. या निमित्त आज दुर्मीळ ग्रंथांचं दोन दिवसीय प्रदर्शन आणि उद्बोधन कार्यक्रमाचं उद्द्घाटन होणार आहे.

****




No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...