Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 23 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय
यादीतल्या उपगटांचं परिक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं
आज मान्यता दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेतल्याचं
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्ली इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी
बोलताना सांगितलं. संसदीय स्थायी समितीनंही अशाच प्रकारच्या शिफारशी केल्या होत्या,
असं ते म्हणाले. इतर मागासवर्गीयांमधल्या उपगटांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये
आरक्षण लागू होईल, असंही जेटली यांनी सांगितलं. या समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती
झाल्यानंतर १२ आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
इतर मागासवर्गीयांसाठीच्या क्रिमिलेयरच्या
उत्पन्न मर्यादेतही वाढ करण्यात आली असून, ती सहा लाखांवरुन आठ लाख रुपये करण्यात आल्याचंही
जेटली यांनी सांगितलं.
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या
एकत्रिकरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. याबाबतची अधिसूचना भारतीय रिझर्व्ह
बँकेशी सल्लामसलत करुन जारी केली जाईल, असं ते म्हणाले.
****
उत्तर प्रदेशात या आठवड्यात झालेल्या
दोन रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्वीकारली
आहे. यासंदर्भात प्रभु यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, आपण जबाबदारी
स्वीकारत असल्याचं सांगितलं. रेल्वे अपघातामुळे प्रचंड दु:ख, वेदना झाल्या असल्याचं
प्रभू यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या आझमगडहून दिल्लीला रवाना
झालेल्या कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरुन आज पहाटे अपघात झाला, तर गेल्या
शनिवारी मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली इथं पुरी-हरिद्वार
उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून अपघात झाला. यात २३ प्रवाशांचा मृत्यू झाला.
या अपघातांच्या पार्श्वभूमीवर
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनीही आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.
****
केंद्र सरकारनं दोनशे रुपयांची
नवी नोट जारी करण्याबाबतची अधिसूचना आज काढली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या
शिफारशीनुसार ही नवी नोट चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
कृषीपंपांना सध्याच्या आठ तासांऐवजी
१० ते १२ तास वीज पुरवठा करण्यासाठी संबंधित जिल्ह्यांत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
समिती स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये
पुरेशा पावसाअभावी पिके करपण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी
राज्यातल्या बिगर आदिवासी क्षेत्रातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र
स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. त्यानुसार राज्यात एकूण ३० हजारांहून
अधिक केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातल्या आदिवासी भागातल्या अंगणवाड्यांमध्ये
यापूर्वीच ग्राम बाल विकास केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत.
शिर्डी इथल्या विमानतळाचं नामकरण
“शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट” ऐवजी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असं
करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णयही आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत घेण्यात आला.
****
आगामी बकरी ईदचा सण शांततेत,
सौहार्दपूर्ण तसंच सलोख्याच्या वातावरणात साजरा करावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबई इथं बकरी
ईद निमित्त कायदा सुव्यवस्था तसंच इतर सोयी सुविधांचा आढावा घेताना बोलत होते. याकाळात
राज्यातल्या नागरिकांच्या मदतीसाठी पंचाण्णव शून्य तीन एकावन्न अकरा शून्य शून्य ही
हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
समाजातल्या सर्व घटकांना समान
आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं गरजेचं असून, त्यासाठी शिक्षण व्यवस्थेचं वेळोवेळी
परिक्षण होणं गरजेचं असल्याचं मत निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी व्यक्त
केलं आहे. औरंगाबाद इथं आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५९ व्या
वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर
मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी कुलकर्णी यांच्याबरोबर शिक्षण आणि समाज कार्यासाठी
डॉ. विश्वनाथ कराड, विधी सेवेसाठी न्यायमूर्ती सी. एल. थुल, पत्रकारीतेसाठी मुरलीधर
शिंगोटे, शिक्षण आणि संशोधनासाठी जगन्नाथ पाटील यांनाही कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्या
हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना संशोधक डॉ. जगन्नाथ पाटील
यांनी, समाजातली आर्थिक विषमता कायम असल्याचं मत व्यक्त केलं.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा दुसरा
एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या श्रीलंकेत पल्लेकेले इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार
दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. दांबोला इथं झालेला पहिला सामना नऊ गडी राखून
जिंकल्यानं पाच सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment