Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी
असलेल्या क्रिमिलेयर मर्यादेत दोन लाख रूपयांनी वाढ
** दोनशे रुपये मुल्याची नोट चलनात आणण्याबाबतची अधिसूचना
केंद्र सरकारकडून जारी
** राज्यातल्या बिगर आदिवासी क्षेत्रातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये
ग्राम बाल विकास केंद्र स्थापन होणार
आणि
** शिक्षण व्यवस्थेचं वेळोवेळी परीक्षण होणं आवश्यक -
निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचं मत
****
इतर मागासवर्गीय - ओबीसी प्रवर्गासाठी असलेली क्रिमिलेयरची
मर्यादा दोन लाख रूपयांनी वाढवण्यास काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अर्थमंत्री
अरूण जेटली यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. यापूर्वी
वार्षिक सहा लाख रूपयांची असलेली ही मर्यादा आठ लाख रुपये करण्यात आली आहे. आल्याचंही
जेटली यांनी सांगितलं.
याचबरोबरच ओबीसीच्या केंद्र सरकारच्या यादीतल्या
जातींच्या वर्गीकरणाचं परिक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं
मान्यता दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेतल्याचं
जेटली यांनी सांगितलं. संसदीय स्थायी समितीनंही अशाच प्रकारच्या शिफारशी केल्या होत्या.
यामुळे इतर मागासवर्गीयांमधल्या उपगटांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू
होईल, असंही जेटली यांनी सांगितलं. या समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर १२
आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या एकत्रीकरणाच्या
आराखड्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. याबाबतची अधिसूचना भारतीय रिझर्व्ह बँकेशी
सल्लामसलत करुन जारी केली जाईल, असं जेटली म्हणाले.
मुंबईतल्या गोराई इथल्या ४० एकर जमिनीच्या बदल्यात भारतीय विमानतळ प्राधिकरणाची
दहिसर इथली ४० एकर जमीन मुंबई महानगर प्राधिकरण- एमएमआरडीए कडे मेट्रो शेडसाठी हस्तांतरित
करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या व्यवहारामुळे एमएमआरडीएला मुंबई मेट्रो प्रकल्प पूर्ण करता
येणार आहे.
****
केंद्र सरकारनं दोनशे रुपये मुल्याची चलनी नोट जारी
करण्याबाबतची अधिसूचना काल जारी केली. भारतीय रिजर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार
ही नवी नोट चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, दोन हजार रूपयांच्या नोटा बंद होणार असल्याची शक्यता अर्थमंत्री जेटली
यांनी फेटाळून लावली आहे. या नोटा बंद करण्याची अशा प्रकारची कोणतीही योजना नसल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य सरकारनं एक एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६
या कालवधीतल्या पीक किंवा मध्यम मुदत कर्जापैकी ३१ जुलै २०१७ अखेर मुद्दल आणि व्याजासह
थकबाकी असलेलं दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफीस पात्र ठरवलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या
काल झालेल्या बैठकीत, सरकारनं यासंदर्भात वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांना मंजुरी देण्यात
आली. यामध्ये कर्जाची रक्कम दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास, एकरकमी परतफेड योजनेनुसार
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. पुनर्गठीत आणि फेरपुनर्गठीत कर्जाचाही
दीड लाख रुपये मर्यादेत समावेश करण्यात आला आहे.
कृषी पंपांना सध्याच्या आठ तासांऐवजी १० ते १२ तास
वीज पुरवठा करण्यासाठी संबंधित जिल्ह्यांत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
करण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुरेशा
पावसाअभावी पिके करपण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यात यंदा
पावसाळा सुरु झाल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही. त्यामुळे
शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिके पुरेशा पावसाअभावी करपण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर
पावसाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेतीपंपांना जादा तास वीजपुरवठा करण्याची
मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातल्या
बिगर आदिवासी क्षेत्रातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन
करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. त्यानुसार राज्यात एकूण ३० हजारांहून अधिक केंद्र
स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातल्या आदिवासी भागातल्या अंगणवाड्यांमध्ये यापूर्वीच
ग्राम बाल विकास केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत.
शिर्डी इथल्या विमानतळाचं नामकरण “शिर्डी ग्रीनफिल्ड
इंटरनॅशनल एअरपोर्ट” ऐवजी श्री साईबाबा इंटरनॅशनल
एअरपोर्ट म्हणजेच श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यासाठी केंद्र शासनाकडे
शिफारस करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
****
उत्तर प्रदेशात गेल्या आठवडाभरात झालेल्या दोन रेल्वे
अपघातांची नैतिक जबाबदारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्वीकारली आहे. प्रभू यांनी
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, आपण ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं सांगितलं.
या अपघातामुळे आपल्याला अत्यंत दु:ख, वेदना झाल्या असल्याचं प्रभू यांनी ट्वीटर संदेशात
म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या आझमगडहून दिल्लीकडे जाणाऱ्या कैफियत एक्स्प्रेसचे दहा
डबे काल पहाटे रुळावरुन घसरुन अपघात झाला होता, तर गेल्या शनिवारी मुजफ्फरनगर जिल्ह्यात
खतौली इथं पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून २३ प्रवाशांचा मृत्यू
झाला.
दरम्यान, या अपघातांची जबाबदारी स्वीकारत रेल्वे
मंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिला आहे, त्यांच्या जागी अश्वनी लोहानी यांची नियुक्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मान्यता
दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
भारतीय जनता पक्षानं केवळ पैसा आणि जैन मुनींच्या बळावर मीरा भाईंदर महापलिकेत
बहुमत मिळवलं असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. पक्षानं राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत
तक्रार केली आहे. निवडणुकीत जैन मुनींनी पक्षाचा प्रचार केल्याचं शिवसेनेनं म्हटलं
असून हे प्रचारक म्हणजे इस्लामचा प्रचार करणाऱ्या झाकीर नाईक यांच्यासारखे असल्याचं
प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटल आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षानं मात्र हे आरोप फेटाळून लावत, पराभवाबद्दल शिवसेनेनं
आत्मपरीक्षण करावं असं पक्षानं म्हटलं आहे.
****
समाजातल्या सर्व घटकांना समान आणि गुणवत्तापूर्ण
शिक्षण मिळणं गरजेचं असून, त्यासाठी शिक्षण व्यवस्थेचं वेळोवेळी परीक्षण होणं गरजेचं
असल्याचं मत निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद
इथं काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त
विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त
करताना ते बोलत होते. यावेळी शिक्षण आणि समाज कार्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड, विधी सेवेसाठी
न्यायमूर्ती सी. एल. थुल, पत्रकारितेसाठी मुरलीधर शिंगोटे, शिक्षण आणि संशोधनासाठी
जगन्नाथ पाटील यांनाही कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान
करण्यात आले. यावेळी बोलताना संशोधक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी, समाजातली आर्थिक विषमता
कायम असल्याचं मत व्यक्त केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथल्या भवानी अर्बन को
ऑपरेटीव्ह बँकेच्या मुख्य शाखेचे प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ
घाडगे यांच्या घरावर काल पहाटे सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी घाडगे आणि त्यांच्या
पत्नीची हत्या केली. लाखो रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेल्याचं, या बाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे. घाडगे यांच्या दोन्ही मुलींनाही दरोडेखोरांनी धारदार शस्त्रानं मारहाण
केली असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
स्काटलंडमधल्या ग्लासगो इथं सुरु
असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं स्वित्झर्लंडच्या
सबरीना जॅक्वेटवर २१-११, २१-१२ अशी मात करत उप उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
पुरूष एकेरीत बी.साई प्रणीतनं इंडोनेशियाच्या अॅन्थोनी सीनी सुकावर १४-२१, २१-१८, २१-१९ असा सरळ सेटमध्ये तर किदांबी श्रीकांतनंही फ्रान्सच्या लुकस कोर्वीचा २१-९, २१-१५ असा पराभव करत उप उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट
सामना आज श्रीलंकेत पल्लेकेले इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला
सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून, भारत एक - शून्यनं
आघाडीवर आहे.
****
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीतला नवी मुंबईतल्या
तळोजा तुरुंगातून काल जामिनावर मुक्त करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं त्याना २००८
सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. ते गेल्या नऊ वर्षांपासून
तुरुंगात होते.
****
चालू वर्षात तंत्रनिकेतन पदविकेच्या प्रथम आणि थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थिनींसाठी येत्या २८
ऑगस्ट रोजी प्रवेशासाठीची अतिरिक्त फेरी घेण्यात येणार आहे. लातूर इथल्या शासकीय
निवासी महिला तंत्रनिकेतन इथं या फेरीत सहभागी होण्यासाठी
इच्छुक विद्यार्थींनीनी आज सायंकाळपर्यंत प्रवेशासाठी ऑनलाईन नाव
नोंदणी करणं आवश्यक आहे.
****
No comments:
Post a Comment