Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 AUG. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
****
न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी आज देशाचे
४५वे सरन्यायाधिश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, विधी आणि न्याय
मंत्री रविशंकर प्रसाद, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. सरन्यायाधिश
दीपक मिश्रा यांचा कार्यकाळ १३ महिन्यांचा असणार आहे. सरन्यायाधिश जे एस खेहर उद्या
सेवानिवृत्त होत आहेत.
****
तामिळनाडूच्या ऑल इंडिया अण्णा द्रमुक
मुनेत्र कळघम - एआयएडीएमके पक्षातून सचिव शशिकला आणि दिनकरन यांची हकालपट्टी करण्यात
आली आहे. उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या पक्षाच्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय अन्य तीन ठराव यावेळी पारित करण्यात आले. शशिकला
आणि दिनकरन यांनी पारित केलेले सर्व आदेश अवैध ठरवण्याचा ठरावही यावेळी एकमतानं मंजुर
करण्यात आला, तसंच पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्याचंही यावेळी ठरवण्यात
आलं.
****
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी
पणजी विधानसभा मतदरासंघाची निवडणूक जिंकली आहे. पर्रिकर यांनी काँग्रेसचे उमेदवार गिरीष
चोडानकर यांचा चार हजार ८०० मतांनी पराभव केला. तर वाल्पोई मतदारसंघातून भाजपचेच विश्वजित
राणे विजयी झाले.
****
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम
रहीम सिंग याला बलात्कार प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज तुरुंगातच न्यायालय भरवून
शिक्षा सुनावणार आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा आणि पंजाबमध्ये तणावपूर्ण स्थिती असली
तरीही प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. डेराचं
मुख्यालय असलेल्या सिरसा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, पंचकुला, सिरसा, मनेसर
या शहरात लष्करास पाचारण करण्यात आलं आहे.
****
बिहारमधल्या बूढी गंडक आणि करीह नद्यांनी
धोक्याची पातळी ओलांडल्यानं समस्तीपूर, मुजफ्फरपूर आणि दरभंगा जिल्ह्यात पूर परिस्थिती
गंभीर बनली आहे. पुराशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या ४९३
वर पोहोचली असून, एक कोटी ७० लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. बचावकार्य
सुरु असून, साडे आठ लाखहून जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशातही सुरु असलेल्या मुसळधार
पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराशी संबंधित घटनांमध्ये १०४ जणांचा मृत्यू
झाला असून, २५ जिल्ह्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
****
पतसंस्थांमधल्या ठेवींना
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधल्या ठेवींप्रमाणे संरक्षण देण्यासाठी सकारात्मक विचार
करण्यात येत असून, याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेणार
असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. राज्यातल्या नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण
बिगरशेती सहकारी पतसंस्थांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी पुणे इथं आयोजित बैठकीत
ते बोलत होते.
****
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत
शालेय शिक्षण विभाग राज्यातल्या शाळांमध्ये स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणार आहे. स्वच्छता
हे काम नसून ती एक चांगली सवय आहे या भूमिकेतून येत्या एक
सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
कन्नड तालुक्यातल्या वाकीच्या शिवेश्वर संस्थानचे नारायणदेव बाबा वाकीकर यांचं आज पहाटे
वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्यावर दुपारी वाकी इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
शासनाच्या विविध
योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी औरंगाबाद इथं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीनं
गणेशोत्सवाच्या काळात ‘संवाद पर्व’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत
वस्तु आणि सेवा कर या विषयावर जीएसटीच्या सहआयुक्त दीपा मुधोळ या व्यापाऱ्यांशी संवाद
साधून, त्यांच्या शंकांचं निरसन करणार आहेत. हा कार्यक्रम आज दुपारी चार वाजता सिडकोतल्या
कुलस्वामीनी मंगल कार्यालयात होणार आहे.
****
सिकंदराबादकडून
मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमधल्या आरक्षित स्लीपर कोच मधल्या एका सीटखालून
२५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात
आली.
****
जर्मनीतल्या हॅम्बर्ग
इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अमित फंगल उपान्त्य
फेरीत पोहोचला असून, या स्पर्धेत उपान्त्य फेरीपर्यंत मजल मारणारा तो पहिला भारतीय
खेळाडू ठरला आहे. दुसऱ्या फेरीत ४९ किलोग्रॅम वजनी गटात अमितनं इक्वाडोरच्या कार्लोस
क्विपोचा पराभव केला.
****
नेपाळमधल्या काठमांडू
इथं झालेली १५ वर्षाखालील दक्षिण आशिया फुटबॉल फेडरेशनची स्पर्धा भारतानं जिंकली आहे.
अंतिम सामन्यात भारतानं नेपाळचा दोन-एक असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment